Showing posts with label इंद्रधनु -- वैशाली. Show all posts
Showing posts with label इंद्रधनु -- वैशाली. Show all posts

Wednesday, May 13, 2015

स्वयंपाक

स्वयंपाक हा खरोखरच बायकांच्या दृष्टीने खूपच महत्वाचा विषय आहे. 
म्हणजे वेगवेगळ्या अंगांनी त्याबाबत विचार होऊ शकतो. जसं अत्यंत आवडीने करणं, पर्याय नाही म्हणून करावा लागणं, ते आपलं कर्तव्य आहे असं समजून करणं, किंवा अगदी टोकाचा भाग म्हणजे रोज हॉटेलात जाणं शक्य नाही म्हणून इलाज नाही म्हणून करणं.
स्वयंपाक करणं ही प्रामुख्याने बाईची जबाबदारी आहे अशी एक सर्वमान्य धारणा आहे. म्हणजे घरी जेवायच्या वेळा झाल्या की घरच्या बाईकडे "हे काय अजून जेवायच तयार नाही" हे जितकं हक्कानं बघितलं जातं तितकं पुरुषा कडे बघितलं जात नाही. 

..............................................................................................


मला लग्न होईपर्यंत प्राथमिक स्वरुपातच स्वयंपाक येत होता. म्हणजे उपाशी राहणार नाही एवढ्यापुरता. पण त्यामुळे एक फायदा असा झाला की को-या पाटीमुळे सासरकडील चवीचे पदार्थ त्यांच्या पध्दतीप्रमाणे शिकण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्वयंपाक घरात सासू सुनेमधे तुझी माझी पध्दत अशी येणारी टसल आलीच नाही. एखादा पदार्थ आयता मिळत असेल तर त्याच्या चवीला फारसे प्राधान्य माझ्या लेखी नव्हते. त्यामुळे केलेल्या स्वयंपाकाचा मनमुराद आस्वाद घ्यायचा आणि जाताजाता थोडं फार शिकायचं या भूमिकेत मी असायचे. घरात कुटुंबही लहान असल्याने माझी अंदाजक्षमता जास्तीजास्त ४-५ माणसांपर्यंत मर्यादित असायची. माझ्या परिचयाच्या काही जणी आहेत. त्यांचा स्वयंपाकाबाबतचा आत्मविश्वास मला नेहमी न्यूनगंड देणारा आहे. म्हणजे. मी १५-२० माणसांचा स्वयंपाक कसा झटपट करु शकते ते सुध्दा कुठल्याही पदार्थाची चव न घेता हे मला मोठ्या दिमाखात ऎकवतात. (एथे चविष्ट पदार्थ करण्याच्या संकल्पनेला फारसं महत्व नसावं हे मला नंतर जाणवायचं.) 

आनंदला स्वयंपाकातील पदार्थ करण्याची आवड आहे. पण  नोकरीच्या व्यापामुळे रोजचा रोज सहभाग जमत नाही. सुट्टी च्या दिवशी मात्र तो आवर्जून एखदा पदार्थ करण्यात  सहभाग घेतो. 

स्वयंपाकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आवड म्हणून करणं आणि इलाज नाही म्हणून करणं ह्यामुळे येणा-या मानसिकतेबाबत घरातील सगळ्यांनाच त्याची जाणीव असेल, त्यासाठी सहकार्य असेल तर मग  "स्वयंपाकघर - एक भन्नाट प्रयोगशाळा" म्हणून त्याची मज्जा घेताच येईल.

Saturday, June 28, 2014

माझ्या सासूबाई

माझ्या सासूबाई - सुमती भिडे. आधीच्या सुधा आठवले.त्यांनी  मला कधीच प्रत्यक्ष पाहिलं नाही. कारण त्या आमच्या लग्नाच्या आधी काही वर्ष दृष्टीहीन झाल्या होत्या.
.........

लग्नाच्याबाबतीत निर्णय घेताना माझ्या मनावर ताण आला.
त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. हे गृहित धरुन मगच "हो" असा निर्णय घ्यायचा आणि एकदा "हो" असा निर्णय घेतल्यावर मग त्याचा व्यवस्थित स्विकार करायचा हे मी मला सांगत होते.

हो असं ठरलं.

माझ्या लग्नाच्या सर्व खरेदी साठी त्या आमच्याबरोबर आल्या. प्रत्येक खरेदीच्यावेळी त्यांचं असं मत होतं. अगदी डिझाईन, रंग इ... बाबत. त्यांच्या दोघी बहिणींच्या मदतीने त्यांनी संपूर्ण कार्य पार पाडलं.

आता माझा खरा कसोटीचा काळ चालू झाला.
मला स्वयंपाकाची सवय नव्हती. भाज्या फारशा येत नव्हत्या. पण आता ही आपलीच जबाबदारी आहे असं होतं त्यामुळे ताण होता. मी नोकरी करत होते. सकाळी नऊ वाजता जायचे ते संध्याकाळी सहा वाजता यायचे.

लग्नानंतर नोकरी चालू झाली. पहिल्या दिवशी सकाळचं करुन कामावर गेले. संध्याकाळी घरी आले तर सगळा स्वयंपाक तयार. अगदी कुकर सुध्दा. मला म्हणाल्या अगं माझा वेळ जात नाही कंटाळा येतो. मी करत जाईन संध्याकाळचं. तूही दमतेस. मला फक्त पोळ्या नाही जमत. लाटताना पोळपाट कुठं संपतो त्याचा अंदाज नाही येत. पोळ्या बाई करतील, बाकी मी करेन. त्यांनी ते ठरवूनच टाकलं होतं. 

हळूहळू जरा आमची एकमेकींशी ओळख झाल्यावर मला त्यांनी वेगवेगळ्या भाज्या शिकवायला सुरुवात केली. भाजी शिकून झाली की मला ती लिहून ठेवायला सांगायच्या. प्रमाण सुध्दा अचूक असायचं. त्यांचं माहेर नागपूरचं असल्याने पदार्थ पण चमचमीत असायचे. मला म्हणायच्या सगळ्या गोष्टी तू एकदा शिकून घे. मग आवडल्या तर कर. मग माझी एक पाककृतीची वही तयार झाली.
घराची स्वच्छता, आवराआवरी त्याच करायच्या. किराणा सामान संपत आलं की त्यांनी मनात यादी केलेलीच असायची. ती फक्त कागदावर उतरवायची मदत मी करायचे.

दिवाळी मधे मला म्हणाल्या आनंदला तू तेल लाव आणि तुला मी लावते. कदाचित स्पर्शातून त्यांना मला पाहिचं असेल.
दिवाळीत फराळाच्या गोष्टी करण्यासाठी त्यांची मदत होणार नव्हती. त्यामुळे त्यांनी मला स्पष्टपणे सांगून टाकलं, काहीही घरी करण्यात कष्ट करु नकोस. सरळ चितळ्यांकडून विकत आण. मला एकदम हलकच वाटलं.

उन्हाळाच्या सुट्टीत मला म्हणाल्या साखर आंब्याच्या कै-या आणून दे. मी त्यांना सामान आणून दिलं. एक दिवस कामावरुन घरी आले तर साखर आंबा तय्यार. असच लोणचं पण घातलं. 

आमची ओळख अजून विस्तारली. जवळीक वाढली. तशी त्यांनी मग मला संसाराच्या व्यवस्थापनाबाबत टीप्स द्यायला सुरुवात केली. गुंतवणूक, बचत याबाबत सल्ला दिला. मला माझं स्वत:च स्वतंत्र बचत खातं उघडायाल सांगितलं. म्हणाल्या तुझे तू स्वतंत्रपणे पैसे ह्यामधे ठेव. घरात खर्च करुन टाकू नकोस.

घरी एकटं बसून त्यांना कंटाळा यायचा. मग कधी कधी गावात बहिणीकडे जायच्या. एकट्य़ा जायच्या. मी सोडू का असं विचारल्यावर म्हणायच्या कशाला तुझा वेळ घालवते मला माहिती आहे रस्ता. एक दिवस मी त्यांच्या बरोबर गेले. तेव्हा बघितलं त्या सतत रिक्षावाल्यांशी बोलत होत्या. कुठल्या भागात आलो आहोत हे तपासत होत्या. शेवटपर्यंत त्यांनी अचूक ठिकाणं सांगितली. नगरला सुध्दा मोठ्या मुलाकडे त्या कधीकधी एकट्य़ाने प्रवास करुन जायच्या. 

टि व्ही वरच्या सिरीयल, बातम्या, इतर कार्यक्रम त्या आवडीने बघायच्या. हो बघायच्याच. मी घरी आले की कार्यक्रमाची सविस्तर माहिती द्यायच्या. 

त्यांना आता नातवंड येण्याकडे डोळे लागले होते. माझ्यावर त्यांच बारीक लक्ष असायचं. प्रत्येक महिन्यात पाळी येऊन गेली का ते विचारायच्या. मग हळूहळू कळलं की मला औषध - उपचाराची गरज आहे. दवाखान्याच्या वा-या, मनावरचा ताण हे सगळं सुरु झालं. त्यांना ते जाणवत होतं. एक दिवस मला म्हणाल्या, एक लक्षात घे मुलं झाली म्हणजे आकाशाला हात टेकले असं अजिबात नाही. मुलं झाली की संसार परिपूर्ण असं नसतं. शेवटी माणुसकी महत्वाची.
त्यानंतर त्यांनी मला कधीच त्याबाबतीत विचारलं नाही.
.............

त्यांचा संसार खूप खडतर झाला.
आनंदच्या जन्मानंतर डायबेटिस झाला. पण संसारच्या जबाबदारीमुळे कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि त्याचा परिणाम दृष्टी जाण्यापर्यंत झाला.

नव-याच्या व एका मुलाच्या अकाली निधनाने खचून न जाता त्यांनी त्यांच्या जबाबदा-या खंबीरपणे पार पाडल्या.

"त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. " हे माझं मत पूर्ण चुकीचं ठरलं. मी मात्र छोट्य़ा छोट्य़ा गोष्टींसाठी त्यांच्यावर अवलंबून रहात असे.

खूप स्वाभिमानाने त्या जगल्या. त्यांना कोणाला सांभाळायची वेळ येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. अचानक एक दिवस रात्री पाठ दुखीचा त्रास सुरु झाला आणि ह्र्दय विकाराच्या झटक्याने त्या सकाळी आम्हाला कायमच्या सोडून गेल्या.
.......

त्यांनी शिकवलेल्या भाज्या मी करते. स्वयंपाघरातील छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाळते. त्या आजही माझ्याबरोबर आहेतच.

Sunday, March 10, 2013

जबाबदारी की ओझं


एकंदरीत आपली समाज रचना, संस्कृती, परंपरा, रितिरीवाज, रुढी, ह्याचा विचार केला तर एखादी स्त्री म्हणून जगताना तिने अनेक ओझ्यांची जबाबदारी घेतली असते अस म्हणता येईल का ?
एकदा क तुम्ही स्त्री म्हणून जन्माला आलात की अनेक गृहितकं तुमच्या बरोबरीनं वैयक्तिकरित्या, कुटूंबाकडून, समजाकडून मान्य केली जातात.

१. मुलगी म्हणून वावरताना रात्री उशिरापर्यंत बाहेर वावरताना येणारं दडपण
२. पत्नीच्या, सूनेच्या भूमिकेत घर, कुटूंबातील माणसं, नाती सांभाळण्याची जबाबदारी
३. आई म्हणून मुलांना, समाजात मान्य होतील असे "चांगले संस्कार" देण्याची धडपड

सर्वसाधारणपणे अनेकजणी वरील तिनही गोष्टींकडे आपली जबाबदारी, आपली कर्तव्य ह्या नजरेतूनच बघतात. हे सगळं काटेकोरपणे पाळलं की आपण सुरक्षित, आदर्श, इतरांकडून स्विकारल्या जाऊ असा समज. मग हे ओझं आहे हा समजत पुसट होण्यापर्यंत त्यांची मानसिकता होते.
.......

वैयक्तिक विचार करता -

मी कॉलेजमधे असताना रात्री बाहेर उशिरापर्यंत वावरणं कधी आपणहून स्विकारलं नाही. घरातून कधी बंधन नव्हतं पण तसं वातावरण पण नव्हतं. त्यामुळे त्या वातावरणाची, त्या नियमाची जबाबदारी मी पाळली.
(माझी बहीण कॉलेजमधे वेगवेगळ्या उपक्रमाच्यानिमित्ताने रात्री उशिरा घरी यायची. त्यामुळे तिला कदाचित ती जबाबदारी न वाटतां ओझं वाटलं असू शकतं)

लग्न arrange marriage  पध्दतीने असल्याने नवीन वातावरणाची काहीच ओळख नव्हती. त्यामुळे सून, पत्नी म्हणून वावरताना सर्वसाधारणपणे समाजाने ठरवून दिलेल्या पध्दतीचा अवलंब केला गेला. मंगळसूत्र घालणे, कुंकू लावणे इ.

नोकरी करत असलेल्या ठिकाणी पॅन्ट, ओढणीविरहीत ड्रेस घालण्याची मुभा नव्हती. म्हणजे तसं सांगण्यातही आलं होतं. कुंकू लावणं पण होतच. आजूबाजूला कामगार लोकांचा वावर सतत असायचा. त्यांची आम्हा मुलींकडे बघण्याची नजर नेहमीच जाचक वाटायची. तेव्हा का कोण जाणे पण हे मंगळसूत्र, कुंकू घतल्यानं बरं वाटायचं. मग ते ओझं म्हणाव तर त्याचा आधार आम्ही घेत होतो का ?
शाळेत असताना कोल्हापूरला सहल गेली होती. माझी पाळी चालू होती. बरोबरच्या मैत्रिणी मला देवळात न येण्याबद्दल सुचवत होत्या. बाईंनीपण मला तसच सांगितलं. मी त्याला विरोध केला. मी ते ऎकलं नाही. ती पण देवीच आहे की ? मग असं का ? असा उलट प्रश्न केला. मी देवळात गेले. निर्धास्तपणे वावरले. तेव्हा मी विरोध केला त्याचं आज पण मला खूप समाधान वाटतं.

जबाबदारी आणि ओझं याची माझ्या मनात गल्लत नाही. मला आवडेल ते कपडे मी घालते.मंगळसूत्र  व कुंकू ह्याचं सौभाग्य म्हणून बंधन ठेवलं नाही. पुण्यासारख्या शहरात राहते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत वावरु शकते. कुटुंबाचं प्रत्येक काम ही आमच्या दोघांची जबाबदारी असते.

...........

कधीतरी वाटतं की समाजाच्यादृष्टीने असलेली ही बंडखोरी मी माझ्या आधीचा घटनामधे, प्रसंगांमधे, नोकरीत दाखवू शकले असते तर......
कदाचित मला ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला वेळ लागला असं मी म्हणेन.

Sunday, November 25, 2012

देवी अंगात येणं......

लहानपणी आमच्या बिल्डिंगमधे खालच्या मजल्यावर राणीच्या आई रहायच्या. कुटूंब मारवाडी होतं. त्यामुळे नवरात्रीचा सण मोठ्या प्रमाणात असे. तेव्हा नऊ दिवस त्यांच्या रोज अंगात यायचं. आम्हा मुलांना त्याबद्दल गंमत, असूया, उत्सुकता, भिती  अशा सगळ्या भावना असायच्या. त्यामुळे ९ दिवस ते बघायला आम्ही संध्याकाळच्या आरतीला जात असू. तिथं आम्हा सगळ्यांना सांभळून उभं रहावं लागे. कारण आरती सुरु झाली की हळूहळू त्या थरथरायला लागायच्या, आणि मग पूर्ण खोलीभर केस सोडलेल्या अवस्थेत पिसाळल्यासारख्या नाचायच्या. साडीचं, पदराचं भान नसायचं. मग त्यांचा छोटा मुलगा पायात आला तरी त्यांच लक्ष नसायचं. समोर पेटलेल्या आरतीवर आपण पडलो तरी ह्याची पर्वा नसायची. नवरा ह्यासगळ्या गोष्टी सांभाळण्यात गुंतलेला. थोड्यावेळाने दमल्यावर त्या शांत व्ह्यायच्या. जमिनिवर निपचित पडायच्या. आम्ही सगळे त्यांना नमस्कार करायचो. ती देवी आहे असं थोडावेळ वातावरण असायचं. दुस-यादिवशी नेहमीप्रमाणे परत रुटिन चालू. काल रात्रीची राणीची आई आणि आत्ताची ह्याचा सुतरामसंबंध नसायचा.
..............

राणीच्या आईविषयी थोडसं.......

नव-याची दुसरी बायको, त्यांच वय २२ होतं तेव्हा नवरा ५० वर्षाचा. पहिली बायको वारली. तिचे २ मुलगे नव्या आईच्या बरोबरीच्या वयाचे. त्यांची लग्नं नुकतीच झालेली. दोघांनाही वेगळं राहण्याखेरीज मार्ग नव्हता. त्यांनी वडिलांवरचा राग आईशी तुसडेपणाने वागून, वाटणी मागून व्यक्त केलेला. राणीच्या आईलाही पाठोपाठची ३ मुलं - १ मुलगी व २ मुलं. सगळी मुलं १० -१२ वयाच्या आसपास आल्यावर वडिलांचं निधन झालं. कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यांच रविवार पेठेत चहाच अमृततुल्या दुकान. उदर्निवाहाच प्रश्न उभा राहिल्यावर राणीच्या आई स्वत: दुकानात जाऊन बसायला लागल्या. पुढ मग आम्ही तिथे रहात नसल्याने संपर्क संपला.
.........

शाळा - कॉलेजमधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी ह्या धार्मिक वृत्तीच्या, रितीरिवाज पाळणा-या, पुरुषप्रधान संस्कृतीला झुकतं माप देण्या-या. माझ्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम का होईना मी काही एक ठोस विचारांनी वावरत होते. मी नास्तिक आहे, मुर्तिपूजा मानत नाही, मी पाळीच्या दिवशीपण मंदिरात जाते, लग्न झाल्यावर पण स्त्री-पुरुष समानतेकडे मी कशी बघेन हे मैत्रिणींशी बोलायचे. तेव्हा अंगात येण्याविषयी बोलणं झालं. मी पटकन म्हणाले तो सगळा ढोंगीपणा आहे. देवीवगैरे असं काही नसतं.
...........

मध्यंतरी असच एकदा कामवाल्याबाईंबरोबर बोलत होते. तेव्हा त्यांच्या वस्तीमधल्या एका बाईंबद्दल त्या म्हणाल्या की तिच्या अंगात येतं. चेष्टेत हसत म्हणल्या "काहीनाही ओ ताई, नुसती नाटकं आहेत ती". मग मी थोडं त्याबाईंबद्दल त्यांना विचारलं. तेव्हा पुढ आलेली माहीती अशी -  नवरा दारु पितो, रोज रात्री वस्तीमधे धुडगूस घालतो. बायकोला मारतो. आधीच्या बायकोच्या वयात आलेल्या मुलींशी नीट वागत नाही.  
...........

एक दिवस मी व माझी बहिण चाललो होतो तेव्हा अचानक राणीच्या आई भेटल्या. त्या माझ्या बहिणीच्या बरोबरीच्या वयाच्या असल्याने तिच्याशी नेहमी मनमोकळेपणाने बोलायच्या. मुलं काय काय करतात, हताशी कशी आली, दुकान कसं बघतात, हे आनंदानं आणि आत्मविश्वासानं सांगितलं.
.........

राणीच्या आईंनी, त्यांची घुसमट, राग, दु:ख नवरात्रीमधले ९ दिवस तरी माझे हक्काचे असं गृहित धरुन अंगात आणून व्यक्त केली. तो नक्कीच ढोंगीपणा नव्हता. वस्तीमधे, ग्रामीण भागात अंगात येण्याच्या प्रकाराची वारंवारिता जास्त. जेव्हा संधी मिळेल, मुभा मिळेल तेव्हा आपला विरोध, संताप, दु:ख व्यक्त करण्याचा तो एक माफक प्रयत्नच. शेवटी परिस्थिशी समझोता हा ह्या बायकांनी केलेलाच असतो. तो नक्कीच नाटकीपणा नाही.

Sunday, March 18, 2012

एक व्यक्ती म्हणून कळत्या समजत्या वयात मला स्वातंत्र्य होतं का ?

माझे आई वडिल म्हणजे मागची पिढी. त्यामुळे सामाजिक, कौटुंबिक दबाव/दडपण या वातावरणातले. पण मुलगी म्हणून भेदभाव, बंधनं, एक स्त्री म्हणून समाजाकडून ठरवलेले नियम लादणं असं कधीच झालं नाही.

लग्न करताना स्थळ निवडीचं स्वातंत्र्य होतं. कशापध्दतीने त्याच्या कडे बघ असं मार्गदर्शन नक्कीच होतं. पण अंतीम निर्णय माझा होता.
लग्ना नंतर परक्या घरात येणं, तेथील रितीरिवाज समजून घेणं, त्याची माझ्या विचारंशी सांगड घालणंही माझी जबाबदारी होती. सुरुवातीला दडपण होतच. सासूबाईंनी एक व्यक्ती म्हणून मला खूप आदराने वागवलं. मंगळसूत्र, बांगड्या घाल्याव्या, कुंकू लावाव ह्या त्यांच्या अपेक्षा होत्याच. पण मग मी त्याकडे माफक अपेक्षा म्हणून बघितलं. कारण त्याबाबत कधीच आग्रह नव्हता.

सणवार, देवपूजा, धार्मिक कार्यक्रम, ह्याबाबत माझं काय मत आहे ते मांडण्याच आणि अवलंबण्याच स्वातंत्र्य मला आहे. ह्याबाबत आनंदबरोबर काही बाबतीत मतभेद आहेत. पण त्याच दडपण कधीच नाही.

मी आर्थिकद्रुष्ट्या स्वतंत्र आहे का ?

ह्याचा दोन पध्दतीने विचार केला.
१. मी स्वत: कमवून पूर्णपणे माझे खर्च, माझं घर चालवू शकते का ? तर नाही
२. आमच्या दोघांच्या उत्पन्नातून होणारे खर्च मी मला हवे तेव्हा हवे तसे करु शकते का ? हो.
घरातील कोणतेही मोठे आर्थिक निर्णय आम्ही दोघे मिळून घेतो.

लैंगिकद्रुष्ट्या मला हो / नाही म्हणण्याच स्वातंत्र्य आहे का ?
हो नक्कीच.

एकंदरीत सर्व पातळ्यांवर एक स्त्री म्हणून मला माझ्याशी निगडीत सर्व लोकांकडून स्वातंत्र्य आहे.

हे स्वातंत्र्य मी एक व्यक्ती म्हणून प्रत्येक ठिकाणी पेलू शकते का ?
घरातील कोणतेही मोठे निर्णय घेताना, कोणत्यानी मानसिक ताणाचा विचार करताना, भविष्यातील काही प्रकर्षाने जाणवणार्या चिंतांचा विचार करताना (तब्येत) मी कमकुवत होते. आणि मग एकट्य़ाने निभावणे, खंबीरपणे त्याकडे बघणे ह्याबाबत मी जवळच्या व्यक्तिचा आधार शोधते.
हे स्वातंत्र्याच्या व्याख्येत बसते का ? मला माहीत नाही.

माझ्याकडे काम करणार्या बाईंशी मी स्त्री म्हणून कशी बघते / वागते ?

कधीही रजा घेताना त्यांनी विचारल्यास नाही म्हणत नाही. (गावी जाणार असल्यास अजून एक दिवस जरुर घ्या असे सुचवते)
न सांगता सुट्टी झाल्यास फक्त कारण विचारते. (इथे आपणही कधीतरी कंटाळा आला म्हणून कामावर काहीतरी सबब सांगून सुट्टी घेतॊ हा विचार करते)
त्यांची तब्येत बरी नसल्यास त्यांना मदत करते किंवा एखाद काम राहू देण्यास सांगते.
एखाद्या मोठ्या सणावाराला जसे दिवाळी, दसरा, पाडवा इ. दिवशी सुट्टी घ्या असे सुचवते.

स्वातंत्र्याची नक्की व्याख्या काय ?

सामाजिक पातळीवर विचार केला तर ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही बर्याचश्या स्त्रीयांना स्वातंत्र्याची व्याख्या काय आहे ह्याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे खूप गोष्टी ह्या प्रथा, पध्दत, संस्कार ह्या शब्दांमधे पाळल्या जातात. आणि मग पुढे हीच स्त्री आपल्या मुलीला तू मुलगी म्हणून कशी वाग असे सांगते. आणि तेव्हाच तिच्या बाबतीतला स्वातंत्र्याचा कप्पा बंद होतो.

वैयक्तिक पातळीवर आपण त्याकडे कसे बघतो हे महत्वाचं वाटतं.
मी एक स्त्री म्हणून माझं आयुष्य समाधानानं जगत आहे. माझ्यातील मुलगी, बहीण, बायको, आई ही सर्व नाती मला खूप बळ देतात.

Friday, May 21, 2010

मी बाई आहे याचा मला अर्थातच आनंद होतो, समाधान आहे.

स्त्रियांच एकंदरीतच समाजातील स्थान मग ते पूर्विच्या काळापासून ते आत्ताच्या आधुनिक काळार्यंत कशाप्रकारे होत/आहे ह्याचा विचार मी स्त्री म्हणून जास्त समजून करु शकते असं वाटतं. परिस्थिती बदली तरी अजूनही कुठल्याना कुठल्याप्रकारे अत्याचार हे वेगवेगळ्या पध्दतीने होतच आहेत ह्याचा खेद वाटतो.

स्त्री म्हणून काही आलेले अनुभव, मनावर कोरल्या गेलेल्या घटना, वाचनातील प्रसंग ह्यातून एक दहशत ही सतत आपल्या बाजूला वावरत असतेच. आताच्या काळात कणखर स्त्री ही त्याला प्रतिकार करुन उभी राहू शकते. पण अजूनही पन्नास टक्के स्त्रीया असहाय्य असतात ह्याची टोचणी सतत मनात जाणवते.
स्त्री व पुरुष यांची निसर्गत:च शारीरिक ठेवण भिन्न असल्यामुळे प्रत्येकाची बलस्थान वेगवेगळी आहेत. ती त्यांच्या क्षमतेनुसार आहेत. मग ती ताकद असो अथवा सहनशीलता. त्यामुळे श्रेष्ठत्वाचा निकष आपण लावू शकत नाही. पण बौध्दिक, मानसिक क्षमता ह्या दोघांच्याही तुल्यबळ आहेत. आणि तरीही ब~याच अंशी अनेक सामाजिक स्तरात स्त्रीच्या ह्या क्षमता स्विकारताना कुठेतरी नकार दिसतॊ ह्याच वाईट वाटतं.

स्त्री होणं किंवा पुरुष होण हे नैसर्गिक आहे. त्याचा फायदा / तोटा असा विचार न करता दोघांनाही समाजाने निर्माण केलेल्या प्रथांना, येत असलेल्या अनुभवांना सामोरे जावेच लागते. मी स्त्री म्हणून माझ्या मनात कायमची भिती, ताण निर्माण करणारे अनुभव खालील प्रसंगातून घेतले आहेत -
- गर्दीतून जाताना - बसमधून प्रवास करताना - रेल्वेतून रात्रीचा प्रवास करताना - N.C.C. मधे जवानांबरोबर वावरताना. त्या त्या वेळी मी प्रतिकार जरुर केला पण एक भिती बाळगूनच. तेव्हा ह्या पुरुष जातीचा खूप संताप आला. ह्या उलट माझ्या संपर्कातील सर्व पुरुष हे अत्यंत संवेदनशील व समानता मानणारे आहेत. दुस~या बाजूने विचार केला तर मी आज स्त्री आहे म्हणून मी माझ्या भावना मोकळेपणाने व्यक्त करु शकते, मात्त्रुत्वाचा सुखद अनुभव घेऊ शकते ह्याचं मला समाधान मिळतं.
ह्या जन्मात मी स्त्री म्हणून जन्मले आणि म्हणूनच मी तिला पूर्णत: समजू शकले. त्यामुळे पुढच्या जन्मी मला पुरुष म्हणून पण अनुभव घ्यायला आवडेल. एकंदरीतच ह्याबाबतीतली नैसर्गिक व सामाजिक रचना जास्त जवळून तपासता येईल असे वाटते.

पण आज मी स्त्री आहे ह्याचा मला अत्यंत आनंद होतो. त्यामूळेच मी खूप समाधानी आहे.

Sunday, January 10, 2010

बालपणीच्या आठवणी......कोल्हापूरची........(२)

मी १ ली मधे व माझी ताई १० वी मधे एकाच शाळेत त्यामुळे बरोबरच जायचो. (वडिल भाऊ म्हणतो तसे ती माझी आई बहिण होती) म्हणजे मला नेण्याआणण्याची जबाबदारी ताईचीच. आमच्या शाळेत एक बकुळीच झाड होत. त्याची फुलं वेचून ती मला त्याचा गजरा करुन घालायची. तिने एक गाणे शिकवले होते ते अजून मला पाठ आहे...

या बाई या, या बाई या,
बकुळीच्या झाडा खाली फुले वेचुया,
ऊन पडले, ऊन पडले पहाटेला सुख देव गाणे बोलले..
रान हालले, रान हालले पाने फुले दिसे कशी गोडगोडुली...

एकदा माझी शाळा लवकर सुटली. ताईची सुटायला वेळ होता, तेव्हा बाई म्हणाल्या "जा तुझ्या बहिणीच्या वर्गात" मी तिकडे गेले. वर्गावरील बाईंना माझी अडचण कळली. त्यांनी मला शाळासुटेपर्यंत मागच्या बाकावर बसण्याची परवानगी दिली. मला कंटाळा येऊ नये म्हणून एक अख्खा खडू चित्र काढायला दिला. "अखख्या खडूने" मला इतका आनंद झाला की मी तो नुसता हातात धरुन शाळा सुटेपर्यंत बसू शकले.

माझी आई पण नोकरी करत होती. त्यामुळे मला सांभाळायची बरीचशी जबाबदारी ताईचीच होती. त्यामुळे ती कुठेही मैत्रिणींकडे गेली तरी माझ पार्सल तिला न्यावच लागे. त्यामुळे अजूनही ’त्या’ मैत्रिणी भेटल्या की त्या अजूनही माझ्याशी बोलताना मला लहान समजूनच बोलतात.
.............................................................................

जाणीव.....

खरतर खूप दिवस झाले. पण दीपाने लिहीलेल्या जाणीवे बद्दलच वाचल्यानंतर माझ्या घरातील एक जाणीव पट्कन माझ्या डोळ्यासमोर तरळून गेली. उशिरा का होईना पण लिहिते.
माझी बहीण लोणावळ्याच्या कॉलेज मधे नोकरी करत होती. तिचे यजमान (पराग) VIT कॉलेज मधे होते. तेव्हा मुलं १ व ५ वर्षांची. त्यावेळी मुलं ही सगळ्यात महत्वाची जबाबदारी असं त्यांनी ठरवून त्याप्रमाणे त्यांच वेळापत्रक बनवलं. ताईची रविवारची सुट्टी, त्यामुळे परागने गुरुवारी सुट्टी करुन घेतली. (नशिबाने तसं शक्य होतं). म्हणजे २ पूर्ण दिवस मुलांसोबत. ताईची ६.१० ची सिंहगड, त्यामुळे सकाळी मुलांकडे बघण्यासाठी परागने कॉलेजची वेळ ११ ते ७ अशी करुन घेतली. त्या सकाळच्या वेळेत पराग मुलांना उठवून, त्यांच सगळं अवरायचा. म्हणजे दात घासणे, शी-शू, अंघोळ, खायला घालणे. एकाला शाळेत पाठवणे, एकाला पाळणाघरात सोडणे आणि मग कॉलेजला जाणे.
तेव्हा आमचे नातेवाईक परागचे कौतुक करायचे. त्या दोघांना मात्र ते फारसे आवडत नसे. कारण त्यांच्यामते ही आमची जबाबदारीच आहे. त्यात विशेष काही नाही.

Tuesday, November 24, 2009

बालपणीच्या आठवणी... (१)

मी अगदी लहान होते. तेव्हा आम्ही कोल्हापूरला एका वाड्यात रहात होते. माझ्याबरोबर खेळायला मालकांचा नातू होता. त्याच्याकडे तीन चाकी सायकल होती. त्यामुळे तो ड्रायव्हर आणि मी कंड्क्टर. (हे ठरलेलेच) मग ताईने उत्साहाने मला गळ्यात अडकवायची तिकीटांची ब्याग करुन दिली. प्रत्येक पैश्यांच्या तिकीटांचा गठ्ठा करुन पुठ्ठ्यावर चिकटवला. (आता एखादे तिकीट जरी हवे असेल तरी शोधावे लागेल.) मग आम्ही तिकीट देत, स्टोप घेत बराच वेळ खेळायचो. तेव्हा पासून तिकडचे परिचीत लोक मला कंडक्टर म्हणून हाक मारायचे.
दोन वर्षापूर्वी पन्हाळ्य़ाला गेलॊ होतो. तेव्हा कोल्हापूरला थांबलो होतो. आवर्जून वाड्याजवळ गेलॊ. वाडा अगदी तसाच. वर जायचा मोह झाला. मालकांच घर पण तसच. आजोबा (वय वर्ष ८८) अगदी तसेच पलंगावर पेपर वाचत बसले होते. मी आत गेले. मी कोण आले आहे हे सांगितल्यावर जोरात म्हणाले, "कंडक्टर ये" आणि मला जवळ घेतलं. मग आनंदला आणि रेणूला आमच्या ड्रायव्हर - कंडक्टर चे किस्से सांगितले. ड्रायव्हर तेव्हा कामावर गेल्याने भेट झाली नाही.
बाहेर पडल्यावर रेणूने विचारले " तू कधीच ड्रायव्हर झाली नाहीस?" मी म्हणलं "नाही, त्याची सायकल होती मग त्यानच ठरवलं" ती लगेचच म्हणाली, "मग तू का नाही तुझ्या आई-बाबांकडून तुला सायकल घेतलीस ?" मी थोडी संभ्रमात पडले. नक्की काय पोहोचतय. अस नकळत ठरवलं जात का, की कंडक्टर होण ड्रायव्हर पेक्षा खालच्या दर्जाच आहे (जस मुलांनी क्रीकेट खेळायच ठरवलं की, ब्याटींग करण्यासाठी भांडणं होतात), का आपल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण झाल्याच पाहिजेत, काही तडजॊड असू शकते हा मार्गच नाही.

Friday, November 20, 2009

एक आठवण...


अश्विनी, तू जेव्हा भूपाळ्या, पाळणे, जयंत्या याबद्द्ल लिहीलंस तेव्हा जाणवलं खरंच असं का ? माझी एक घरगुती आठवण जरा वेगळ्या संदर्भाची मला एकदम आठवली. मी खूपच लहान होते (२-३ री मधे). त्यामानाने बहिण व भाऊ समजत्या वयाचे. तेव्हाच्याकाळी कुठलीही वस्तू एकच आणून सगळ्यांना कशी वापरता येईल असा दृष्टिकोन. (अर्थात परिस्थिती पण नव्हती) सायकल घेतली ती लेडीज. म्हणजे सगळ्यांनाच वापरता येईल. तेव्हा सायकलवर नाव घातलं जाई. त्यावर नाव घातलं "उमेश जोशी". असं का? असा प्रश्न कदाचित ताईला पडला असेल. मी थोडी मोठी झाले तेव्हा एकदा स्त्रीमुक्ती... वगैरे विषय चालला होता, तेव्हा ह्या प्रसंगाला वाचा फुटली. ताई म्हणाली, "बघ वैशाली सायकलवर उमेश जोशी हे नाव, स्वयंपाक घरातील भांडी आई वापरते, पण नाव "वि. पं. जोशी" आई म्हणाली, "तू उगीच वाकडा अर्थ लावतेस. सगळीकडे एकसारख नाव असलं की लक्षात ठेवायला सोपं जातं. (तेव्हा उमेश जोशी हे नाव का हे मात्रा गुलदस्त्यात राहिलं). मग थोडं मागे गेले. आईच्या माहेरी सगळी भांडी, ट्रंका, धान्याच्या कोठ्या इ. बरच काहीवर "बा. रा. जोशी" हे नाव. तसच वडिलांकडे "पं.के. जोशी" हे नाव. (विद्या इथं मला म्हणायच आहे की पूर्वापार प्रथा तश्याच चालू राहतात का कोणी विचारत नाही). माझं लग्न झालं तेव्हा आनंदचं पुण्यातलं घर नविन थाटलेलं.काही मोजकी भांडी व वस्तू. त्यावर सगळीकडे "वि. स. भिडे" असं लिहीलं होतं. सासूबाई म्हणाल्या, "काही भांडी आपण घेऊयात. तुझ्या पसंतीने घ्यायची म्हणून मी थांबले" मग त्यांना जी आवश्याक वाटत होती त्या सगळ्या भांड्यांची खरेदी झाली. त्या म्हणाल्या "सगळ्यावर नाव व तारीख घाल, बरं असतं". मग मी लगेच भांडीवाल्याला सांगितलं, हं घाला "वैशाली भिडे" (आज मी हे लिहील्यावर परत एकदा त्याभांड्यांवरची तारीख बघितली - ४-१-९६)

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...