Showing posts with label इंद्रधनु -- विद्या. Show all posts
Showing posts with label इंद्रधनु -- विद्या. Show all posts

Saturday, March 7, 2026

.

 .

Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे.

Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान?

त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केलं आहे.

 त्यासाठी रितसर एक व्यवस्था उभी केली. 

 शाळकरी मुली निवडायच्या, त्यांच्या वर अत्याचार करायचा, पैसे द्यायचे आणि एकीला सांगायचं तुझ्या अजून दोन मैत्रिणींना घेऊन ये. त्या दोघी आणखी चार जणींना आणणार.

 हे वर्षानुवर्षे चाललं होतं, यात मुख्य सहभाग होता Ghislaine Maxwell या त्याच्या girlfriend चा.

 ती शाळांबाहेर फिरायची आणि सावज हेरायची.

  असं एक जाळं त्यांनी तयार केलं होतं.

 मग या मुली मोठमोठ्या सेलेब्रिटींना पुरवायच्या. 

 हे नामवंत, विचारवंत, अधिकारी, राजकीय नेते, हे यात सहभागी.


 आपल्याला काहीच कळेनासं होतं.

 यात बिल गेट्स चं नाव आहे, इंग्लंडचा राजा चार्ल्स चा धाकटा भाऊ ॲंड्र्यू आहे, बिल क्लिंटन आहे, विचारवंत चॉम्स्की आहे , डोनाल्ड ट्रम्प आहे.

   

   जेफ्री एपस्टिन हा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला, त्याच्याकडे पदवी नव्हती, खोटी प्रमाणपत्रे देऊन त्याने एका शाळेत नोकरी मिळवली. त्यानंतर तो शेअर मार्केटमध्ये गेला, एका कंपनीच्या खोट्या योजनेत सहभागी झाला. मग बिलिनेअरांचे अर्थकारण सांभाळू लागला, स्वतःची कंपनी सुरू केली आणि अक्षरशः एक साम्राज्य उभं केलं.

  न्यूयॉर्क मधे महाल, फ्लोरीडा मधे प्रचंड मोठं घर, पॅरिस मधे मोठं घर, न्यू मेक्सिको मधे ranch, एवढचं नाही तर एक स्वतःचं स्वतंत्र बेट, स्वतः ची खाजगी विमाने, हेलिकॉप्टरे...

  हे काय आहे?


Ghislaine Maxwell ही Robert Maxwell ची मुलगी. Robert Maxwell हे इंग्लंडमधील बडं प्रस्थ! प्रसिद्ध माध्यम सम्राट! ज्याचे राजघराण्याशी संबंध होते.

  वडिलांच्या मृत्यूनंतर, त्यांचे गैरव्यवहार आणि कर्जबाजारीपणा बाहेर आल्यावर, घिलेन न्यूयॉर्कला आली. ती एपस्टिनच्या संपर्कात आली. ती मोठमोठ्या वर्तुळात वावरलेली होती, त्यातला सहजपणा तिच्यात होता, त्याचा एपस्टिनला फायदा झाला. मोठमोठी लोकं त्याच्या वर्तुळात आली किंवा तो त्या वर्तुळात शिरला. 

 गिलेन ला एपस्टिनची संपत्ती, पैशांचं पाठबळ हवं होतं ते मिळालं.

  तिचे वडील आणि एपस्टिन यांच्यात खूप साम्य होतं. खोटेपणा, अफरातफरी, बायकांचा वापर करणं.

  गिलेन ला एपस्टिनच्या कुकर्मांचं काही वाटलं नाही, तिला आधीपासून घरात सवय असेल.

  आपण चक्रावून जातो, ज्याच्यावर तिचं प्रेम आहे त्या माणसाला ती मुली पुरवत होती!

  

  सत्ता आणि पैसा, यांसाठी ती काहीही करायला तयार होती.


  एपस्टिन आणि घिलेन दोघेही psychopath होते, narcissist होते.

  अशांना समोरच्या माणसाला काय वाटत असेल, हे कळूच शकत नाही, empathy नाही, नसतेच.


  इथे पुरूष बायकांचं शोषण करतो आहे असंच नाही. बाईच बायकांचं शोषण करते आहे.

 

   मला असं वाटतं एका मर्यादेपलिकडे सत्ता मिळाल्यानंतर बाई किंवा पुरुष हा भेद न राहता, दोघेही अत्याचारी झाले तर त्याचा बाई किंवा पुरुष असण्याशी संबंध उरत नाही.


   एपस्टिन आणि घिलेन अक्षरशः या मुलींच्या मनाशी खेळायचे. 

 एक मुलगी म्हणते, " मला माहित होतं की जितका जास्त मला त्रास होईल तितका त्याला आनंद होईल, मजा वाटेल.

   एपस्टिनचं स्वतःचं बेट होतं, इथे तर मुली पूर्णच अडकलेल्या आणि परावलंबी. एक मुलगी समुद्रातून पोहत निसटून जायचा प्रयत्न करते पण सगळीकडे कॅमेरे लावलेले, बरोबर तिला पकडून परत बेटावर आणलं जातं.

   तिथे बेटावर तर कुठलाच कायदा नाही. काय काय चालायचं, असं बोललं जातं, त्यात cannibalism आहे. मुलींना प्रेग्नंट करून त्यांची अपत्ये दिली जायची नाहीत.


एपस्टिन हे इतकं भयंकर, राक्षसी प्रकरण आहे सगळं, ना त्यावरची documentry, बघवते ना काही वाचायची इच्छा होते.


   मुलींना मसाज करायचा म्हणून मसाज रूममधे न्यायचं, जे काही घडायचं ते त्यांच्या अंगावर यायचं.

शाळकरी मुली, ना कुठे बोलू शकायच्या, ना सांगू शकायच्या.


 आपल्या पोटात कसंतरी होतं.


 एवढंच नाही त्या आपल्या मैत्रिणींना घेऊन यायच्या. प्रत्येकीला पैसे मिळायचे.

   शाळकरी मुली जे चाललंय त्याला विरोध करू शकत नाहीत, नाही म्हणू शकत नाहीत, त्यांचा मेंदू तसा तयार झालेला नसतो.

  शिवाय, घिलेन अशा मुली निवडायची ज्या पिडीत आहेत, ज्यांच्या घरी अस्थैर्य आहे, आई वडिलांचं पटत नाही, ड्रग्स घेतात किंवा घरातून पळाल्या आहेत, किंवा बलात्कार झालेला आहे. त्या आधीच मोडलेल्या असतात.


  या मुली वर्षानुवर्षे हा अत्याचार विसरू शकल्या नाहीत, कोणी व्यसनं करायला लागल्या, त्यांचा आत्मविश्वास गेला, त्यांच्यातलं अपराधीपण गेलं नाही, ते घेऊन जगणं अवघड होऊन बसलं. एपस्टिनने त्यांच्यावर अत्याचार तर केलेच पण पुढचं त्यांचं आयुष्य नरक करून ठेवलं.


हे करण्याचा त्याला काय अधिकार होता?

 अशी माणसं स्वतःला कायद्याच्या वर समजतात, ते म्हणतील तो न्याय, त्यांच्या साठी ज्यांची आयुष्य खराब झाली, ती माणसं, त्या मुली केवळ कचरा. माणसं काय ती हीच. त्यांच्याखाली सगळे गुलाम. 

 एपस्टिनला स्वतः ची, उच्च प्रतीची, माणसं तयार करायची होती, त्याच्यापासून मुलं तयार करायची होती, त्यादृष्टीने संशोधन करायला तो प्रोत्साहन देत होता.


    एपस्टिन खूप मोठ्या प्रमाणात देणग्या द्यायचा आणि मोठमोठी शैक्षणिक क्षेत्रातील धेंडं आपल्या बाजूला वळवून घ्यायचा, 

 किती उदार! किती दयाळू!

तो राजकीय कारणांसाठी देणग्या द्यायचा. 

  संशोधन करणाऱ्या संस्थांना देणग्या द्यायचा.

मुळात त्याला वेगळंच संशोधन करायचं आणि घडवून आणायचं असायचं.


    शाळकरी मुली होत्या त्या बळी पडल्या.

  ही मोठमोठी धेंडं कशी त्याच्या जाळ्यात अडकली?


 असं म्हणतात की घिलेन अशा व्यक्तींना एपस्टिन वर्तुळात आणायची.

 प्रिन्स ॲंड्र्यू तिचा मित्र होता. बिल क्लिंटन ला ती ओळखत होती. 


   बेटावर गेलेल्यांच्या यादीत खूप मोठमोठी नावं आहेत. स्टिफन हॉकिंग आहे.

  चॉम्स्की त्याला सल्ला देतो आहे. 


एपस्टिन फाईल्स मधे नाव आहे, म्हणजे ती व्यक्ती दोषी आहेच असं नाही. एपस्टिन हे बड्या वर्तुळातलं मोठं प्रस्थ होतं, काहींना त्याच्या काळ्या बाजूची कल्पना नसेलही.

  असलेल्यांमधेही मोठी नावं आहेत.


   ही माणसंही अनैतिक कृत्य करत होती. एपस्टिनने मुली पुरवल्या, यांनी वापरल्या. 

   आपल्याला आदर्श वाटणारी माणसं ही अशी सडलेली निघावीत? 

   असं का व्हावं?

उंचीवर पोचल्यावर माणसांना मी करीन ते न्याय! मी कायद्याच्या वर आहे, असं वाटायला लागतं की काय?

  

    की प्रत्येक माणसातच हा असा घाणेरडा माणूस लपलेला असतो, तो सुपीक... (सत्ता आणि पैसा, बुद्धिमत्ता...मुबलक...अशा)  वातावरणात फोफावत जातो, याला वेसण घालण्याचं बळ या नामवंतांमधे नव्हतं!!

  यांच्या हाती जगाचा कारभार देऊन कसं चालेल?

    मग कुणाहाती द्यायचा?


  मुली सांगतात की एपस्टिन काय, घिलेन काय, त्यांच्याशी अतिशय मृदूपणे वागत, त्यांना भेटी देत, जणू त्यांची जवळची मित्र - मैत्रीण असावे. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचं आश्वासन देत... मग त्यांच्याशी गैरवर्तन केले जाई.

 आणि असं भासवलं जाई की हे लैंगिक गैरवर्तन जणू नॉर्मल, सामान्य गोष्ट आहे. 

  हे फोडण्याचे कृत्य कुणी करायला गेलं तर धमक्या मिळत.


हे जे काय चालू होतं... वर्षानुवर्षे चालू होतं... याची आपण कल्पना करू शकत नाही.


 हे इतकी वर्षे उघडकीला का आलं नाही? 

   नक्कीच केवळ घिलेन आणि एपस्टिन दोघेच हे असं नेटवर्क विणू शकत नाहीत. अजून कितीतरी माणसं यासाठी काम करत होती. या मुली काही व्यावसायिक शरीरविक्रेत्या नव्हत्या. त्या अठरा वर्षांखालील मुली होत्या. हे काय त्यांना दिसलं नसेल. 

  एपस्टिन कडे पैसा होता, सत्ता होती, तो बड्या वर्तुळातला होता, मोठमोठ्यांशी त्याची मैत्री होती, म्हणून ते दबले? पैशाची गरज म्हणून त्याची नोकरी करत राहिले?


 की अशा अतिश्रीमंतांचं हेच कल्चर आहे?


अनिल अवचटांच्या पुस्तकात निप्पाणीच्या विडी कामगार महिलांवरच्या अत्याचारांबद्दल लिहीलंय ते आठवलं. 

 छोटी-मोठी सत्ता आणि पैसा हातात असला की ती गाजवली जाते पहिल्यांदा बाईवर.


अशी उदाहरणे जगभर असणार.


पण एपस्टिनचं जाळं आणि त्याचा आवाका, त्याचे पोचलेले हात, भयावह आहे.


मती कुंठित होते.

आपण काहीच करू शकत नाही, ही हतबलता भयानक आहे, एक निराशा पसरते आहे. निर्बलता... दुबळेपणा... सगळ्याची किळस येते. उलटी येईलसं होतं. हे काहीही पचवणं शक्य नाही.

 बधीर झाल्यासारखं 

हे आपलं जग नाही.

हे कळलंच नसतं तर बरं झालं असतं.


ज्या मुली समोर आल्या, एपस्टिन आणि घिलेन, विरूद्ध बोलल्या, आपली ओळख उघड केली, त्यांच्या हिमतीचं खूप कौतुक आहे. व्हर्जिनिया रॉबर्ट्स ने प्रिन्स ॲंड्र्यू विरूद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याच्यावर कारवाई केली गेली. ज्युली ब्राऊन या पत्रकार महिलेने या एपस्टिन प्रकरणाचं खोदकाम केलं, लावून धरलं. या संकटातून वाचलेल्या मुलींच्या वकीलांनी धैर्याने मुलींची बाजू लावून धरली.

 आशेचे किरण आहेत.


बेलाट्रिक्सवर हॅरी 'पिडीतो' हा शाप टाकतो तेव्हा तिला काहीच होत नाही.

 ती म्हणते," हॅरी हा शाप लागायचा असेल तर मनातून दुसऱ्या व्यक्तीची तडफड पाहण्याची इच्छा पाहिजे, ती होत असताना आनंद घेता आला पाहिजे तरच तो शाप लागेल."


आपण हॅरी सारखेच असहाय्य आहोत असं वाटायला लागलं आहे. अशा माणसांना 'Crucio - पिडितो' शाप देण्याची खूप इच्छा आहे,पण तो लागायचा नाही. 


  तीच हॅरीची ताकदही होती.

या सगळ्या अंधाऱ्या काळातून, (एकीकडे युद्ध सुरू आहे) , पुढे प्रकाशाकडे जाऊया, मैत्री - प्रेम - विश्वास - हीच आपली ताकद आहे.


    महिलादिनाच्या शुभेच्छा! 🌹🌹

Saturday, March 8, 2025

वाचण्याचा सोहळा

 


हे चित्र मला फार आवडलं आहे.

ही तरुणी पाय पोटाशी घेऊन पुस्तक वाचत बसली आहे.

छान सजून, तयार होऊन बसली आहे.

आपण पुस्तक वाचायला असं सज - धजके बसतो का? नाही.

 जर कुणी पुस्तक वाचण्याचा सोहळा करण्या आधी आवरत असेल तर भारीच!!

  आपण असं तयार कधी बरं होतो? काही सण, समारंभ, कार्यक्रम असेल तर... नवीन कपडे.. सळसळते... नाजूकसा गजरा..अंबाड्याभोवती... हातात बांगड्या, छानशी अंगठी... ओढणी सुद्धा घेतलेली आहे...

 हिच्याही घरी तसंच काही असेल कदाचित , एखादा सण...

 कदाचित तिचं लग्न झालेलं आहे... कदाचित नाही.

 ती कुठल्या जाती, धर्माची आहे? कुठल्याही... महत्त्वाचं.. ती स्त्री आहे आणि ती वाचत बसली आहे.

  नुसती वाचते आहे असं नाही.. शेजारी वाफाळता कप आहे... वाचण्याचा सोहळा सुरू आहे.

 सणादिवशी सगळे जमले आहेत, नातेवाईक.. मित्र - मैत्रिणी... काहीतरी हसणं, खेळणं.. मजा चालू असेल... बाहेरच्या खोलीत, अंगणात...

  हिला मात्र ओढ लागलेली पुस्तकातल्या गोष्टींची.. कदाचित पुढे काय होईल? ची... आपली ही नायिका आहेच नादिष्ट.. मन मानेल तसं करणारी... त्या बाहेरच्या सगळ्यांना सोडून ती आतल्या खोलीत आली आहे... स्वतः च्या, स्वतः ला हव्याशा जागेत... घरातल्या आणि मनातल्याही!! येताना मस्त गरम चहा किंवा कॉफीचा  कप घेऊन आली आहे .

   किती सुंदर चित्र आहे हे!!!


तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना असं आपल्या या नायिकेसारखं, मनाला वाटेल तेव्हा... वाचनाचा सोहळा करता यावा,  याच महिला दिनाच्या शुभेच्छा!! 🌹🌹
- विद्या कुळकर्णी 

( हे बोहो पद्धतीचं चित्र आहे, प्रीती या चित्रकर्तीचं, हे मला नेटवर भेटलं.)

Friday, March 8, 2024

हिरो

 

माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले नाहीत. एकदा एका बाईंचे बरेच पैसे, काही वर्षांचे अडकून होते. तर आपल्या या मैत्रिणीने त्याचा पाठपुरावा करून ते पैसे त्या बाईंना मिळवून दिले. 

 बाई म्हणाल्या," तुम्ही माझं रखडलेलं काम केलंत, तुम्हाला किती देऊ?"

 तर आपली ही मैत्रिण, आपण तिला सुमन म्हणूया. 

सुमन म्हणाली," अहो, हे माझं काम आहे, ते मी केलं, त्याचा पगार मी घेते. मला काही नको."

बाईंनी दोन तीनदा विचारलं. सुमन ठाम होती.

 मग एके दिवशी त्या बाई सोन्याची अंगठी सुमनसाठी घेऊन आल्या, भेट म्हणून.

 सुमन म्हणाली," मला नको."

तिने अंगठी परत केली.

त्या बाई मागे लागल्या, सुमनवर काही परिणाम झाला नाही. 

एके दिवशी सुमन तिच्या जागेवर नाही हे पाहून त्यांनी सुमनच्या टेबलवर अंगठी ठेवली आणि निघून गेल्या.

 सुमन जागेवर आली, तिने अंगठी पाहिली, आता अशी महागाची वस्तू टेबलवर कशी सोडून द्यायची? सुमन अंगठी घेऊन घरी आली, तिला रात्रभर झोप आली नाही, अंगठी परत करायची कशी? हाच विचार.

  दुसऱ्या दिवशी त्याच ऑफिसमधे काम करणाऱ्या माझ्या मैत्रिणीकडे आली आणि तिला काय घडलं ते सांगितलं.

 मैत्रीणीने फोन करून त्या बाईंना बोलावलं, त्या मैत्रिणीच्या ओळखीच्या होत्या, त्यांचे एवढे पैसे सुटले तर, जिने काम करून दिलं तिला काहीतरी दिलंच पाहिजे, असं त्यांना वाटत होतं.

 मैत्रीणीने सुमनलाही बोलवून घेतलं. 

 सुमनजवळची अंगठी घेतली, त्या बाईंच्या हातात ठेवली," ती घ्यायला नाही म्हणते आहे, तुम्हाला कळत कसं नाही? या तुमच्या अंगठीमुळे ती रात्रभर झोपू शकली नाही, ही अंगठी घ्या आणि जा. पुन्हा कधीही सुमनला काही देण्याचा प्रयत्न करू नका."

त्या बाई अंगठी घेऊन निघून गेल्या.

  ही जी सुमन आहे..... ती हिरो आहे!!!

 मला तिचा अभिमान वाटतो! तिचा आणि माझ्या मैत्रिणीचाही!!

आजूबाजूच्या भ्रष्टाचारी जगात असं कुणीतरी ठाम उभं राहणं किती आश्वासक आहे!!

 रोज लोकलने प्रवास करणारी... गर्दीत मिसळून गेलेली सुमन... हिरो आहे!

****

आमच्याकडे अलका मावशी कामाला यायच्या. त्यांचं काम एकदम स्वच्छ. तांब्या, पितळेची सोडाच पण स्टीलची भांडी पण लखलखणार! फरशी अशी पुसून घेतील की पायाला स्वच्छता जाणवेल. हे त्या काही मी सांगते म्हणून, कुणी सांगतं म्हणून करायच्या नाहीत, त्यांना स्वतःलाच जाता येता/ वरवर/ कसंही काम केलेलं चालायचं नाही. अतिशय दर्जेदार काम आणि कामावर निष्ठा! 

  हे एक दिवस, दोन दिवस नाही..

 तब्बल बावीस वर्षे त्या आमच्याकडे यायच्या.

 त्या हिरो आहेत.

कामाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन किती प्रोत्साहक आहे!!

रस्त्यावरून भराभर चालताना त्या दिसल्या तर ओळखू यायच्या नाहीत, बस मिळाली पटकन चढतील..... त्या हिरो आहेत.

****

माझी एक मैत्रीण आहे.. नृत्य तिच्या आवडीचं! अप्रतिम नृत्यांगना आहे. काव्यवेडी आहे, कवितांवर उत्तम कार्यक्रम सादर करते. उत्तम रसिक आहे. नृत्य - संगीत - साहित्य यांचा आस्वादही घेते आणि सादरही करते. एवढंच नाही पर्यावरणाबाबत जागरूक, प्लॅस्टिक वापरणार नाही, पुनर्वापर करेल. वीजेचा, पाण्याचा काळजीपूर्वक वापर करेल, हे अगदी रोज हं!

   केमो करून आली, चार दिवसांचा थकवा गेला की पुन्हा शेजारणींना गोळा करेल, चला गं जरा व्यायाम करू, योगासनं करू, विचार करू, व्यक्त होऊ.

 ती हिरो आहे.

ती कार चालवत असेल, कुठे सिग्नलला ती थांबलेली दिसेल... तुम्हाला कळणारही नाही..ही कोण ते!! .... ती हिरो आहे.

*****

माझ्या एका मैत्रिणीने आंतरजातीय लग्न केलं आहे. समाजाला मान्य नसणारी गोष्ट. नातेवाईकांचा विरोध. 

 तिची आई ठामपणे तिच्यामागे उभी राहिली. मराठवाड्यातल्या एका छोट्या गावातली ही बाई!

 हे ही आज नाही, वीस वर्षांपूर्वी!!

 मुलांच्या बरोबरीने मुलीला वाढवलं, शिकवलं. आनंदाने तिने निवडलेला मुलगा आपलासा केला.

 ती हिरो आहे.

  एखाद्या लग्नकार्यात किंवा नातवांच्या गॅदरिंग मधे तुम्हाला ही आजी भेटेल, हसरी आणि उत्साही! तुम्हाला कळणार नाही... ती हिरो आहे.

*****

या स्त्रिया, या स्त्रियांच्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या.... मला प्रेरणा देत राहिल्या. माझं जगणं सुंदर करत राहिल्या. 

   प्रत्येक जण खास असते. आपल्याला कळत नाही, ओळखू येत नाही..... माझी प्रत्येक मैत्रीण खास आहे. प्रत्येक बाई खास आहे.

 कधीतरी त्या खास असण्यावर कवडसा पडतो आणि ती उजळलेली मला दिसते. तिच्या उजळण्याचा प्रकाश माझ्यावर पडतो आणि माझं असणं मलाच आवडायला लागतं.



****


महिलादिनाच्या शुभेच्छा!! 💐💐

Wednesday, March 4, 2020

एक थप्पड !

थप्पड पाहिला, आवडला. जरूर पाहा.
ज्या संयतपणे आणि संथपणे घेतला आहे, आवडलं.
थप्पड खाल्ली आणि तडकाफडकी माहेरी निघून गेली असं नाही होत.  ती चार दिवस जाऊ देते हळूहळू तिला उमजायला लागतं, मग ती ठरवते हे शक्य नाही. तिची साधी, सोपी , थेट उत्तरे आहेत. " मी जेव्हा आनंदी आहे असं म्हणीन तेव्हा मी आनंदी असले पाहिजे."
" माझं तुझ्यावर प्रेम नाही उरलेलं , मी तुझ्याबरोबर नाही राहू शकत"
 एका थपडेमुळे तिला सगळं दिसायला लागतं, जे की ती चालवून घेत होती.
 तो एक थप्पड मारतो त्यामागे काय काय आहे? तोल गेला, राग आला, म्हणून बॉसला थप्पड नाही मारत, पण बायको आहे तर हक्क आहे , मारू शकतो. बेभान झाला तरी काही भान सांभाळून आहेच!!
 एका थपडेने तिला जागं केलं तसं त्याला केलं नाही, ही खरी शोकांतिका आहे.
 त्याला बिचार्याला काही कळलंच नाही. ना तो विचार करू शकला, ना समजून घेऊ शकला. त्याला साधं नीट सॉरी म्हणायला देखील जमलं नाही.
 सिनेमातला काही ढोबळपणा आवडला नाही काही आवडला. कामवाली बाई शेवटी जेव्हा नवर्याला उलटून थपडा मारते ते पाहायला आवडलं. का? मनात हिंसा चालते का आपल्याला?

 तिने जर भर पार्टीत उलटून नवर्याला थप्पड मारली असती तर काय झालं असतं? गोष्ट कशी बदलली असती?

 आपण एक समाज म्हणून अहिंसेकडे जात असू, जायला हवं, तर मनातल्या " हिंसेचं " काय करायचं? हे आपण शिकायला हवं.

शेवटी एखादी नावडती गोष्ट घडली तर दोघांनीही मिळून शिकायला हवं. लग्नात मिळून शिकणं हवं की नको? नाहीतर लग्न कशाला चालू ठेवायचं? 😊
खरंय!

या येत्या महिलादिनानिमित्त सगळ्या जोडप्यांना मिळून शिकणं जमायला लागो.
त्यासाठी सर्वांना शुभेच्छा!!!
-- विद्या

Friday, March 8, 2019

आतलं स्वातंत्र्य

स्त्री-पुरुष समानता , स्त्रियांचे स्वातंत्र्य हा कायमच माझ्या जिव्हाळ्याचा विषय होता आणि आहे.
आजवर मी बाहेरच्या जगातलं स्त्रीचं स्वातंत्र्य याचाच प्रामुख्याने विचार करत होते.
स्त्रियांच्या जडणघडणीत त्यांना वाढवलं जाण्याचा मोठा हिस्सा असतो , हे मला कळलेलं होतं.

जेव्हा मी माझ्या मुलासाठी son rise program करायला घेतला तेव्हा मला माझ्या आतल्या जगाची जाणीव झाली.
बाहेरची परीस्थिती तितकीशी महत्त्वाची नसते, महत्त्वाचं असतं आत तुम्ही कसे आहात?
आपल्या धारणांनी (Belief) आपल्याला जखडून ठेवलेलं असतं.
आपल्यात असं आहे की बाह्य परीस्थिती ( सामाजिक-राजकीय-कौटुंबीक- आर्थिक) कडे आपलं सगळं नियंत्रण आहे असा आपला समज असतो.
आपल्या आत असणार्य़ा आपल्या क्षमतांची जाणीवदेखील आपल्याला नसते.
 हे स्त्री आणि पुरूष दोघांनाही लागू पडतं.
आपल्या आत आपण कुठले विचार करायचे? कुठली स्वप्नं पाहायची? कसे अर्थ लावायचे? कुठे पोचण्याची तयारी करायची? यावर कुणाचंही कुणाचंही नियंत्रण नसतं. ही किती आनंदाची बाब आहे. आपण जन्मतो तेच मुळी स्वतंत्र!! मग हळू हळू परतंत्र होत जातो.
आपल्या समाजात स्त्रियांना आणि पुरूषांना वेगवेगळ्या प्रकारे परतंत्र केलं जातं
त्यांना विशिष्ट पद्धतीने विचार करायला शिकवलं जातं, कशाला चांगलं आणि कशाला वाईट म्हणायचं हे शिकवलं जातं, म्हणजे धारणांचे चष्मे बसवले जातात.
आपण ते बदलू शकतो याची जाणीव आपल्याला नसते.
स्वातंत्र्य असणं म्हणजे दरक्षणी ’निवडीचं स्वातंत्र्य " असणं. माझ्याबाबतीतले सगळे निर्णय मी घेणार ना की अन्य कुणी व्यक्ती, संस्था अगर मी स्विकारलेल्या धारणा ते ठरवणार. त्यासाठीचं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या धारणा तपासून पाहणं. त्यातल्या कुठल्या ठेवायच्या आहेत आणि कुठल्या बदलायच्या आहेत , हे ठरवणं.
 धारणा तपासताना तरी कुठल्या निकषांवर त्या ठेवायच्या की बदलायच्या? हे ठरवायचं.
तर भीतीने काहीही करायचं नाही तर प्रेमाने करायचं.
भीतीत choice नाही.


स्वातंत्र्य म्हणजे आहे तरी काय?
आपल्याला आपण स्वतंत्र आहोत हे कळणं.
आपल्या हातापायात कुठल्याही अदृश्य शृंखला नाहीत हे कळलं की आपण आपल्याला हवे तसे वाढत जाणार.
जर आतून आपण स्वतंत्र नसू तर बाह्य परीस्थिती कितीही अनुकूल, स्वतंत्र असली तरी आपण स्वातंत्र्य उपभोगू शकत नाही.

आजच्या महिलादिनी,
सर्व स्त्री-पुरूषांना आपल्या "आतल्या स्वातंत्र्याची’ जाणिव होवो" ही शुभेच्छा!!

Thursday, March 8, 2018

आतलं जग



श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल?
असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self love नाही.
तिच्या बाह्यरूपावर प्रेम करणारं तिचं वय धरून ठेवू इच्छिणारं एक बाहेरचं जग आहे.
तिच्या आतलं जग कसं असेल??
जर मी तरूण , स्लिम अशी राहिले नाही तर लोकांना आवडणार नाही.
मला लोकांची आवडती व्हायचं आहे, आवडती राहायचं आहे.
ती जशी होती, सुरकुत्या पडलेली काही केस पांढरे झालेली,,
ती श्रीदेवी , ते स्वत:चं रूप तिला स्वत:ला आवडत नव्हतं.

आपण सगळ्या जगाच्या आवडत्या असू आणि स्वत:ला आवडत नसू,
तर ते काय उपयोगाचं?

जगाच्या आवडीनुसार दिसण्या, वागण्या, जगण्याची कसरत आपण का स्वीकारायची?

श्रीदेवीला ही कसरत करायची असेल का? त्यात काय सुख आहे?
तिला नसणार करायची, पण तिच्यात हिंमत नव्हती स्वत:ला ’आहे तसं’ स्वीकारण्याची.
ते बळ ती नाही मिळवू शकली.
ती बाहेरच्या जगाला घाबरत राहिली आणि आतल्या स्वत:ला कोसत राहिली.

आपल्या जगण्याचे कंट्रोल्स आपल्याकडे असले पाहिजेत.

आपलं वाढतं वय आपण मजेत स्विकारूया.
नुसत्या सुरूकुत्या नाही पडत, नुसते केस पांढरे नाही होत,
अनुभव वाढतो, शहाणपण येतं,,
त्या सगळ्या भेटींसह वय स्विकारूया.

बाईने प्रमाणबद्ध असलं पाहिजे, कांती सतेज असली पाहिजे,
हसणं नाजूक, चालणं डौलदार आणि वगैरे वगैरे
या सगळ्या समाजाच्या अपेक्षांचं ओझं उतरवून ठेवू या.

स्वत:वर जरा ( किंवा पूर्ण :)) प्रेम करू या.

मजेत, आनंदात जगण्यासाठी वयाची अट थोडीच आहे?
त्यासाठी बाहेरच्या जगाकडे डोळे लावून बसलो तर नाही चालायचं,
दृष्टी आत वळवली पाहिजे.
छान असणं जे आहे ते आत असतं.

खरं सौंदर्य स्वतंत्र असण्यात आहे.

आजच्या महिलादिनी आपण ठरवूया की
मी जशी आहे तशी स्वत:ला स्विकारते.
माझ्या गुणदोषांसगट!
मी छान आहे.
मला मी ’जशी आहे तशी’ आवडते.
एकदा मी मला आवडले की जगालाही आवडायला लागेल,
किंबहुना मला त्याने फरकच पडणार नाही.
मी इतरांच्या व्याख्येनुसार स्वत:ला तपासत बसणार नाही.

महिलादिनाच्या शुभेच्छा!


Sunday, October 29, 2017

लुईस

लुईस हे’’ ३० ऑगस्टला वयाच्या नव्वदाव्या वर्षी गेली.
.
.
लुईसची आणि माझी ओळख कशी झाली?
:)
.
.
गौरीताई स्वस्ति ची एक कार्यशाळा घेत आहेत हे मला दीपाकडून कळलं.
मग मी गौरीताईंना फोन केला, स्वत:चा शोध आणि स्वत:ला बरं करण्यासाठीची/ठेवण्यासाठीची काही वैचारिक साधनं, असं त्या कार्यशाळेचं स्वरूप होतं.
स्वत:चा शोध हे माझ्या आवडीचं असल्याने आणि गौरीताई आवडीच्या असल्याने, मी त्या कार्यशाळेला गेले.
ती लुईसच्या विचारांवरची कार्यशाळा होती.
काही गोष्टी कळल्या, काही पटल्या काही पटल्या नाहीत, काही समजून घ्यायला अडथळे येत होते आणि काही गोष्टी मी पूर्वीपासूनच करत होते.
आपल्या सगळ्या प्रतिक्रियांच्या, वाटण्याच्या मुळाशी आपल्या धारणा असतात, त्या शोधायला हव्यात, तपासायला हव्यात. बदलून घ्याव्यात, टाकून नव्या स्वीकाराव्यात किंवा जुन्या चालू ठेवाव्यात. हे मला पहिल्यांदा तिथे कळलं. जाणीवपूर्वक मी कधी हे पाहिलेलंच नव्हतं.
हे तर एक भलंमोठ्ठं :) काम मी घरी घेऊन आले.
त्याशिवायही तिथे खूप काय काय शिकायला मिळालं, पण धारणांसंबंधीचं कळणं क्रांतिकारी होतं.
त्यावेळी खरं मी सन राईज कार्यक्रमाची बांधणी करत होते, पूर्वतयारी करत होते, त्यासाठी स्वत:ला तयार करत होते, याची मला कल्पनाच नव्हती.
गौरीताई खूप छान कार्यशाळा घेतात, समजूतीने शिकवतात, त्यामुळे ज्या गोष्टी आकलनाच्या आणि आपल्या वैचारिक परीघाबाहेरच्या असतात/ होत्या, त्या केवळ गौरीताई आहेत, त्यांना अनुभव आहे, त्यांचा विश्वास आहे तर आपण निदान ऎकून घेऊ या, असं झालं.
लुईसपेक्षा लक्षात राहिल्या त्या गौरीताई!
.
येताना लुईसचं ’ यू कॅन हील युवर लाईफ ’ हे पुस्तक घेऊन आले.
जमेल तसं वाचत गेले आणि लुईसची थोडी थोडी ओळख व्हायला लागली.
तरीही मी या बाईपासून मी लांबच होते.
आपण विचारांनी, विचारांच्या साखळ्या बदलून, मनाबरॊबरच शरीरही तंदुरूस्त ठेवू शकतो आणि मुख्य म्हणजे बिघडल्यास, पुन्हा ठीक करू शकतो, यावर विश्वास ठेवण्यात अडचण येत होती.
.
लुईसला स्वत:ला जेव्हा कॅन्सर झाला तेव्हा डाएट आणि विचार बदलून मुख्यत: सगळ्यांना क्षमा करून, तिने स्वत:ला बरं केलं.
कॅन्सर होण्या आधी ती हे सांगतच होती की विचार बदलून तुम्ही स्वत:ला बरं करू शकता,
जेव्हा तिच्यावर वेळ आली तेव्हा तिने ते करून दाखवलं.
.
आपलं शरीर जेव्हा व्यवस्थित चालत असतं तेव्हा शरीरात किती विविध प्रकारच्या आपण अचंबित होऊ अशा प्रक्रिया घडत असतात आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते, जर शरीर चालवण्याचं ज्ञान शरीरात आहे तर बिघडल्यावर ते दुरूस्त करण्याचं ज्ञानही शरीरात आहे यावर आपण विश्वास का ठेवत नाही? शेवटी याबाबतची आपली धारणा काय आहे? ते महत्त्वाचं असतं.
.
लुईस सांगते की स्वत:वर प्रेम करा, स्वत:चं कौतुक करा, स्वत:ला स्वीकारा, आशादायी राहा, सकारात्मक विचार करा,
जे मिळालंय त्याबद्दल कृतज्ञ राहा. सगळ्यांना क्षमा करा.
तुमचे विचार तुमचं भविष्य घडवतात.
.... या खूप साध्या गोष्टी आहेत पण सोप्या नाहीत, फार अवघड आहेत.
स्वत:वर प्रेम करा... मला वाटलेलं , यात काय सांगायचंय? आपण ते करतच असतो.
पण नाही.  (तरी मी पुष्कळच बरी आहे. :)) खूप लोक असे असतात ज्यांचं खरं स्वत:वर प्रेमच नसतं.
स्वत:च्या दिसण्यावर प्रेम नसतं, स्वत:च्या असण्यावर नसतं, स्वत:च्या वागण्यावर नसतं, विचारांवर नसतं, स्वत:च्या क्षमतांवर विश्वास नसतो,
झाली स्वत:ची चूक की फटकारलं स्वत:ला!, मला हे जमणारच नाही, मला हे झेपणारच नाही, माझी लायकीच नाही, माझ्यावर कुणी का प्रेम करेन?
मी कुणाला का आवडेन?
फक्त तुम्ही स्वत:वर प्रेम करू शकलात तर कितीतरी गोष्टी बदलतील.
स्वत:वर प्रेम करण्यासाठी स्वत:ला स्वीकारावं लागतं,
स्वत:चा पूर्ण स्वीकार ही काही सोपी गोष्ट नाही.
मला तर सारखं स्वत:ला कोरत बसायची सवय आहे,
कुठे कुठे अपुरे पडत असल्याची रूखरूख आहे.
ठीक आहे, स्वत:ची अजून चांगली आवृत्ती हवी आहे, पण आत्ता जशी आहे तशी स्वत:ला स्वीकारायचं आणि तशा स्वत:वर प्रेमही करायचं,
आत्ता समज चौथीत आहे, १० वीतलं येत नाही तर ४ थी तल्या स्वत:ला स्वीकारायला आणि प्रेम करायला अडचण काय आहे? :)
अजून पुढे पुढे तर जातच राहू. :)
यासाठी गरजेचं आहे वर्तमानकाळात राहाता येणं, भूतकाळाचं ओझं नको आणि भविष्यकाळाची चिंता नको.
या सगळ्या एकमेकांशी जोडलेल्या गोष्टी आहेत.
हे सगळं आपल्याला नाटक करायचं नाहीये, हे खरं खरं आतून यायला हवं आहे, त्यासाठी तुम्ही प्रामाणिक असायला हवं.
.
आणखी एक म्हणजे आपला समज असतो की हे सगळं आपण करतोच,
स्वत:वर प्रेम करतोच, इतरांना क्षमा करतोच.
आत खोल खोल जायला लागलं की कळतं,
तसं नाहीये.
स्वत:वर काम करायला लागणार आहे.
मग या साध्या तत्वांचं महत्त्व आणखीनच जाणवायला लागतं.
.
हे सगळं कुणाकुणाच्या आयुष्यात कुठल्या कुठल्या मार्गाने येत असेल, माझ्या आयुष्यात हे लुईसने आणलं.
त्यामुळे मी धारणांवर काम करायला लागले आणि माझी एक मानसिक तयारी सुरू झाली.
जेव्हा माझ्या आयुष्यात सन राईज प्रोग्राम आला तेव्हा तो काही एक कळू शकावा, इतपत काम मी केलेलं होतं.
त्यातही मग आणखी खोल खोल जाण्यासाठी... Acceptanace, non judgemental, Unconditional Love, Hope, be in Present, making happyness the priority.... यावर काम करत, ही वाट समजत गेली.
.
लुईस,
 तू हे सगळं शहाणपण मला देते आहेस,
मी कृतज्ञ आहे.
.
गौरीताई,
हे सगळं तुमच्याकडून आलं, तुम्ही होतात म्हणून मी हे सुरूवातीला गंभीरपणे घेऊ शकले आणि मग मला जमत गेलं, जमतं आहे, करते आहे.
:)
.
.
मी नेटवर कधी फारसं लुईसला शोधलं नव्हतं,
ती गेली आणि मग मी तिचं काय काय यूट्यूबवर पाहात गेले.
आत्ता मी तिला थेट बोलताना पाहिलं.
तिच्या एडस वरच्या कामाबद्दल कळलं,
ती फार खास आहे/ होती.
ती ओघवत्या भाषेत, थेट, ठामपणे, प्रामाणिकपणे, काळजाला हात घालत, ऎकणारांवर प्रेम करत बोलत होती आणि बोलत राहिल. :)
....

Wednesday, March 8, 2017

कहानी - २



कहानी २ ची कहानी बाललैंगिक अत्याचारांवर आहे.
त्यात योगायोगाच्या आणि फिल्मी म्हणाव्यात अशा घटना आहेत.
तरीही योग्य तो संदेश लोकांपर्यंत पोहोचतो असं मला वाटतं.
लहान वय, आजूबाजूच्या जवळच्या, प्रेमाच्या माणसांकडून विश्वासघात, मुलीच्या मनातली भीती, तिचं गप्प गप्प होणं, अशा अनुभवामुळे मोठेपणी पुरूषांची आणि लैंगिक सुखाचीच वाटणारी भीती, याबाबतीत गमावलेला आत्मविश्वास....... कहानी
कहानी आपल्या आजूबाजूला घडणारी आणि आपल्याला माहितच नसलेली, आपण बघू शकत नाही अशी!
पण दुर्गा रानी सिंग? ती बघते, तिला जाणवतं... ती शोधते आणि तडीस नेते.
आपल्या सख्ख्या काकाच्या अत्याचारांना बळी पडणारी छोटी मिनी, काकाच्या बाजूने असणारी सख्खी आजी, त्याच घरात राहण्यावाचून पर्याय नसणारी मिनी.

कहानीत तीन बायका आहेत, एक मिनी, एक तिची आजी आणि एक दुर्गा!
 ( कहानीत एक अत्याचार करणारा काका आहे आणि पहिल्यांदा नाही तरी दुसर्‍यांदा दुर्गाला मदत करणारा पोलीस ऑफीसर आहे. पण आज मला पुरूषांबद्दल बोलायचं नाहीये. )

मिनी लहान आहे आणि आपल्या जवळची माणसे योग्यच वागत असणार अशा भ्रमात ती आहे, तिचे त्रास योग्य आहेत का? ते बोलायला देखील तिला कुणी नसतं.
तिला मग एक दुर्गा भेटते. दुर्गाने लहानपणी हे भोगलेलं आहे. जिवाच्या आकांताने ती मिनीला वाचवू पाहात असते आणि वाचवते.
मिनीत ती छोट्या दुर्गाला पाहात असते. मिनीला ’’ते” आवडतं असं दुर्गाला सांगितलं जातं तेव्हा ती म्हणते की हे कळण्याचं, ठरवू शकण्याचं तिचं वय तरी आहे का? ....
 (.... मुलींना/मुलांना सज्ञान होऊ देत आणि मग काय ते ठरवू देत.)
 मिनीसाठी ती आपल्या प्रियकराला सोडते. अजूनही पुरूषाबरोबर राहण्याची, संसाराची तिला भीती वाटत असते का? ही पळवाट ती शोधते का? प्रियकराला विश्वासात घेऊनही ती हे करू शकली असती.

 यातली आजी जी आहे तिच्या वागण्याने आपल्याला सगळ्यात जास्त धक्का बसतो. ती त्या माकडीण आणि तिचं पिल्लू या गोष्टीतल्या माकडीणीसारखी आहे का? अशा आज्या असत असणार. 'दोघी' मधे आपल्या मुलीला वेश्याव्यवसायाला लावणारी आई आहे. आपल्याला वाटतं कठीण, कसोटीच्या प्रसंगात माणसाने उजळून निघावं. पण माणसं स्वार्थी असतात, भेकड असतात, नैतिकतेची चाड नसणारी असतात, मूर्ख असतात, दुष्ट असतात. अशी माणसं जगायला लायक असतात? की नसतात? सिनेमात जेव्हा ती फिल्मी पद्धतीने मरतात तेव्हा बरं वाटतं.
खरंच बरं वाटतं. वास्तवांत असं घडणं शक्य नाही हे कळत असतानाही बरं वाटतं.

 या प्रश्नात हे महत्वाचं आहे की अत्याचारीत बालकाचं भविष्य त्याच्या भूतकाळातून मोकळं करणं. बालकाचा आत्मविश्वास वाढवणं, त्याच्या/तिच्या मनातला अपराधभाव काढून टाकणं.

 अशा अत्याचारांच्या विरोधात निर्भीडपणे उभं राहायलाच हवं असं आपल्याला आतून जे वाटत असतं, ते दुर्गा करते. ती उजळून निघते. तिच्या आयुष्याचं ध्येय बनवते. एका मुलीला एक सुरक्षित भविष्य देऊ करते. त्या दोघींमधे एक छानसं आश्वासक नातं तयार होतं.
 यातलं दुर्गाचं काम विद्या बालनने फार छान केलं आहे. आपल्या दिसण्याची आणि फिगरची ती अजिबात पर्वा करत नाही. व्यक्तिरेखेशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करते. ती बाई म्हणून उभी आहे किंबहुना तिचं बाईपण दाखवणारा चित्रपट आहे आणि ती कुठेही दुय्यम नाहीये ती ’हिरो’ आहे. नायिका ’हिरो’ असणारे चित्रपट येताहेत आणि यायला हवे आहेत. आपल्या आयुष्यात आपण ’हिरो’ असतो हे आपण बायकांनी मनावर बिंबवायला हवं. :)


 स्त्री आणि पुरूष या नात्यांत भीती आली की ते विद्रूप होतं. भीती म्हणजे धाक नाही, भीती म्हणजे हा आपल्या तनामनावर अत्याचार करेल ही भीती! जेव्हा स्त्रीचं पुरूषाशी भीतीमुक्त नातं असतं.... बहीणीचं भावाशी,  मैत्रिणीचं मित्राशी , आईचं मुलाशी, बापाचं लेकीशी.... ते फार सुंदर असतं.

 पुरूषांबरोबरची अशी सुंदर नाती तुमचं आयुष्य फुलवत जावोत ही आजच्या महिलादिनी शुभेच्छा!


Friday, March 18, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ७

स्वयंपाकात पुरूषांचा सहभाग कितपत असतो?
औरंगाबादला भाजी आणण्याचं काम बाबांकडे होतं.
मेथी निवडणं किंवा क्वचित भाज्या चिरून देणं हे काम ते आवडीने करायचे/करतात.
आई म्हणायची, " तुम्ही राहू द्या. मी करते."
आम्ही वाड्यात राहायचो तेव्हाचं मला आठवतंय, आई म्हणायची, " दार तरी लोटून घ्या."
सगळ्यांनी बाबांना भाजी निवडताना पाहावं, हे तिला चालायचं नाही.
ही पुरूषांची कामं नव्हेत.
ताट,पाट, पाणी घेतल्यावर पुरूषांनी आयतं पाटावर येऊन बसायचं.
जेवण झालं की पाटावरून उठायचं, मागचं सगळं बायका बघतील.

आता हे असं राहिलेलं नाही.
तरीही घराघरांतून स्वयंपाक ही मुख्यत: बायकांचीच जबाबदारी आहे.
पुरूषांचा सहभाग हा लुटूपूटूचाच.
स्वयंपाकघरात सराईतपणे वावरणारे पुरूष मी पाहिलेले नाहीत.
( एखादा सन्माननीय अपवाद वगळता)
स्वयंपाक घरात पुरूष वावरतानाचं शुटींग करून बघायला पाहिजे.
त्यांची देहबोली, त्यांचे हावभाव.
बायकांचंही शुटींग केलं आणि दोन्हींची तुलना केली तर आपल्याला कळेल,
स्वयंपाकघराकडे कोण कसं बघतं?
खरं हा प्रकल्प करायला पाहिजे.
( दीपा, आपण करू या का?)

समज एकजण नोकरी करतो आहे आणि दुसरा घर सांभाळतो आहे,
तर घर सांभाळणारी व्यक्ती (बहुतेकदा बाई) स्वैपाकाचं बघणार हे स्वाभाविक आहे.
रोजचा रोज तोच, तोच स्वैपाक करणं कंटाळवाणं आहे.
मग जो नोकरी करतो आहे, त्याचंही काम तेच तेच आणि कंटाळवाणं असू शकतं.
म्हणजे कंटाळवाणी कामं आपल्याला करायलाच लागतात.
बाहेर नोकरी करणार्‍याला त्याच्या कंटाळवाण्या कामाचा मोबदला मिळतो.
आर्थिक स्वरूपात, नियमीतपणे.
स्वैपाकघर सांभाळणार्‍या घरच्या बाईला काय मोबदला मिळतो?
तिने त्यात समाधान मानायचं असतं.
तिची कर्तव्ये उच्च स्वरूपाची आहेत आणि भावनिक स्वरूपात मोबदला मिळतो.
पैशांसाठी ती मिंधी आहे.
पण तिला आदर आणि प्रेम तरी मिळतं का?
हो काहीवेळा मिळतो, काहीवेळा नाही.
आदर , प्रेम मोजणार कसं?
जे मिळतंय त्यात समाधानी राहायचं हे तिला शिकवलेलं असतं.

ज्या घरांमधे नवरा-बायको दोघेही नोकरी करतात त्यांच्याकडे दोघं मिळून स्वैपाकघर सांभाळतात, असं आहे का?
मुळीच नाही. जबाबदारी बाईवरच आहे.

स्वैपाक ही खूप वेळखाऊ गोष्ट आहे.
प्रत्यक्ष स्वयंपाक करण्यात/ खाण्यासंबंधीची कामं करण्यात समजा रोजचे तीन-चार तास जातात.
स्वैपाकासंबंधीचा विचार करण्यात इतका वेळ आणि मेंदूचा इतका भाग वापरावा लागतो.
तासभर कुठलंही काम केलं आणि संपलं असं ते नसतं.

बर्‍याच बायका स्वैपाक गळ्यात पडला म्हणून निभावतात.
पुरूषांना याची कल्पना असली पाहिजे.
पुरूषांनी कधीतरी स्वैपाक करून बघायला पाहिजे.
आम्ही आमच्या गटात बाबांना त्यांच्या आवडीचे/ त्यांना झेपतील असे पदार्थ करायला प्रोत्साहित केलं.
त्यांनी केलंही.
अर्थात त्यांचं कौतुक खूप झालं. पुरूषांनी क्वचित कधी स्वैपाक केला तर त्यांच्या वाट्याला कायम कौतुक येतं.
तरीही त्यांनी एवढ्या २५ जणांचा स्वैपाक केला हे विशेष आहे.
त्यामुळे त्यांना बायकांच्या कष्टाची जाणीव झाली की नाही कोण जाणे!
त्यातला तोच तोच पणा त्यांच्यापर्यंत पोचला की नाही माहित नाही.

पुरूषाला बाहेर जायला मिळतं, त्याने त्याची वाढ होते.
बाई घरातच राहिली (मनाने घरातच राहिली) की कुंटूंब हेच तिचं विश्व होऊन बसतं,
ती खुरटत जाते. कधी कधी त्रासदायकही होत जाते. स्वैपाकघरावर कब्जा मिळवते, इमोशनली ब्लॅकमेल करू शकते.
आणखी एक वाक्य़, ’ माझं आयुष्य तुमच्यासाठी खस्ता काढण्यात गेलं ’
कुणी सांगितलंय?
समाजाने ठरवून दिलंय......

( क्रमश:)

****

Thursday, March 17, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ६

स्वयंपाक ही खरोखर एक कलाकृती असते.
कलाकाराला दाद मिळाली की पुढच्या कामासाठी प्रेरणा मिळते, उर्जा मिळते.
ज्यांच्यासाठी कलाकृती असते, त्या/ते सुगरणी/सुगरण.
शिवाय
ज्यांच्यासाठी कारागिरी असते अशा बायका.
ज्यांच्यासाठी काम असतं अशा बायका.
ज्यांच्यासाठी ओझं असतं अशा बायका.
अशी बायकांची वर्गवारी करता येईल.
( कुठलीही बाई एका प्रकारात कधी स्थिर नसते.
वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या पदार्थांसाठी प्रकार बदलता असतो.)

जवळपास कुणालाही स्वयंपाक टळत नाही.
कौतुक केलं की त्यांना श्रमांचं चीज झाल्यासारखं वाटतं.
स्वांतसुखाय अशी ही कला नाहीये.
या कलेला बहुतेकदा दाद मिळते.
याला जोडून नावं ठेवणंही खूप असतं.
आपली पद्धत सर्वश्रेष्ठ असा बहुतेकींचा समज असतो.

नावं ठेवणं किंवा नाक मुरडणं म्हणूया , याचा सर्वाधिक त्रास सुनांना होतो.
जे काय स्वैपाकाघरातलं शीतयुद्ध चालू असतं, ते पुरूषांना कळूच शकत नाही.
साधं काकडीच्या चकत्या करायच्या किंवा दाण्याचा कूट करायचा यात इतके पाठभेद असतात.
साल काढून की ठेवून? कूट भरड की बारीक? चकत्यांची जाडी किती असावी? दाणे कितपत भाजावेत?
या खरंच महत्त्वाच्या गोष्टी असतात का?
हे वेगळ्याच कारणांसाठीचे मतभेद आणि मानसिक असुरक्षितता बाहेर पडण्याचे मार्ग असतात.
याकडे बायकाच बायकांच्या शत्रु असतात इतक्या सरधोपटपणे बघायला नको आहे.
पुरूषसत्ताक समाजरचनेतील जी सत्तेची उतरंड आहे, ती हे करायला भाग पाडते.

मानवी संबंधांमधे जर सत्तेची वर्तुळं, जबाबदार्‍या आणि कर्तव्ये यात स्पष्ट्ता असेल तर ते संबंध अधिक सौर्हादपूर्ण होऊ शकतात.
संदिग्धतेचा प्रदेश अधिक असेल तर गडबड संभवते.
जबादार्‍यांविषयी नाराजी असेल तरी ती बाहेर पडायला वाट शोधत असते.

स्वैपाकघर ही जर एकत्र काम करण्याची जागा असेल तर हे घडणारच.
बायकांच्या आयुष्यातील स्वयंपाकाचं महत्त्व जसंजसं कमी होत जाईल तसं तसं नावं ठेवणंही कमी होत जाईल.

आता अगदी वेगळंच सांगू का?
नावं ठेवायला मजाही खूप येते.
तो एक कॅथर्सिसचा प्रकार आहे.
आपण खरोखरच करण्याच्या पद्धतीला नावं ठेवतो का?
नाही. आपल्याला त्या व्यक्तीला नावं ठेवायची असतात.
जर आपण व्यक्ती आणि रीत यांत फरक करू शकलो,
आणि केवळ पदार्थाची/ रितीची मजा घेतोय असं असलं तर दोन्ही बाजूंना मजा येऊ शकते.
मैत्री असेल तर हे घडतं.
:)

मैत्रीपूर्ण वातावरण तयार झालंय तर पुढचं सांगते. :)
एका एका प्रदेशाची किंवा त्या प्रदेशातील विशिष्ट समाजाची स्वयंपाकाची काही एक रित असते,
काही एक ठरलेले पदार्थ असतात.
इकडे पुण्यात मटार उसळ, अळूचं फतफतं, गोडसर भाज्या, उकडीचे मोदक, गूळपोळी हे प्रतिष्ठेचे पदार्थ आहेत.
हे सगळे पदार्थ मी पूर्वी खाल्लेले नव्हते. खाल्ले तेव्हा मला आवडले नाहीत.
मी म्हणजे एकटी मी नाही, आमच्या भागातला समाज माझ्यासारखा आहे, असणार.
मटार आम्ही सोलून कच्चे खातो.
अळूला आम्ही म्हणतो चमकोरा आणि त्याची भजी करतो.
मोदक आम्ही तळतो.
आणि तिळगुळाची पोळी करतो.
इकडची साधी मऊसूत पोळीसुद्धा आम्ही म्हणतो की तोंडात घोळत राहते, अशी पोळी नको.
आता काय करायचं?
इथल्या सगळ्यांचा समज हाच की उकडीचे मोदक आवडत नाहीत म्हणजे काय?
क्षूद्र माणूस तो! ( गाढवाला गुळाची वगैरे... :) )
कोण स्वत:हून स्वत:ला गाढव म्हणून घेणार? :)
इकडच्या नातेवाईंकांत काय, किंवा आमच्या गटात काय, मी अल्पसंख्याक!
किती वर्षे मी खुलेपणाने माझ्या नावडी आणि आवडीही सांगू शकत नव्हते.

मी कायम आपल्या देशात, आपली भाषा बोलणार्‍या माणसांत, आपल्यासारखे धार्मिक संस्कार असणार्‍या माणसांत राहिले आहे.
कायम बहुसंख्यकांच्या बाजूने असण्याची मला सवय होती, यामुळे मी अल्पसंख्याकांच्या अनुभवाची थोडीशी कल्पना करू शकते.

( क्रमश:)

अक्कणमाती चिक्कणमाती -- ७

****

Monday, March 14, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ५

चार कोसांवर भाषा बदलते असं म्हणतात.
पदार्थांचंही तसंच आहे.

माणूस शेती करायला लागला, स्थिरावला.
खाण्यायोग्य किती किती फळं, पानं, मुळं, खोडं त्याने शोधून काढली.
शिवाय वेगवेगळे प्राणी खाऊन बघितले असणार.
भाजणे, शिजवणे, वाफावणे, वाळवणे अशा प्रक्रिया शोधून काढल्या असतील.
कशाबरोबर काय, कशापद्धतीने, हे ही शोधलं असेल.
मग आपल्या ज्ञानाचा ठेवा पुढच्या पिढीकडे सूपूर्द केला असेल.
.
.
आणि मग ते आपल्यापर्यंत आलेलं आहे.
मी जो स्वैपाक करते ते मुख्यत: आईचं पाहून, शिकून शिवाय आत्यांचं आणि आणखी कुणाकुणाचं पाहून शिकले.
आई, तिच्या आईचं, मोठीआईचं पाहून, आईला सासू नसल्याने बाबांनी जे आणलं असेल ते पाहून शिकली.
मोठीआई तिच्या आईचं पाहून ती विदर्भातली होती शिवाय तिच्या मामेसासूचं पाहून, ती केरळातली होती.
स्वत: मोठीआई तेलंगणात राहिली, तिच्या सूना तिथल्याच.
त्यामुळे मी जी खाद्यसंस्कृती घेऊन पुण्याला आले ती अशी तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, केरळातली अशी असणार.
मी जे करते त्यात गुंतपांगाळू/भोंगराळू, मेथीचा घोळाणा, काकडीची थालीपीठं, चिंचेचं सार, आंबट वरण.... असे पदार्थ आहेत.
 आंबट वरणाचं एक मजेशीर गाणं आमच्याकडे आहे.
आंबट वरणा
तुझीया चरणा
करोनी नमस्कार
सख्या भेट दे लवकर!
:)
कुणीतरी दूरदेशी जाऊन केलेलं गाणं असेल. :)
आम्हांला आंबट वरण अतिशय प्रिय आहे.
त्यामुळे जगात कुठेही गेले तरी मी आंबट वरण बरोबर नेणार हे नक्की होतं.
अर्थात मला जगात कुठेही जायचं नव्हतं, भारतात म्हणू या.
भारतातही नाही, महाराष्ट्रात, मराठी बोलणार्‍या माणसांत,
आणि महाराष्ट्रात मला औरंगाबादलाच राहायचं होतं.
औरंगाबादला नसणारच राहायला मिळत तर मग पुण्याइतकं छान  शहर नाही. :)

ठरल्याप्रमाणे आंबट वरण - भात तर मी घेऊन आले.
मीच स्वैपाक करायचे म्हणून पहिल्यांदा मी आंबटवरणाची स्वैपाकघरात प्रतिष्ठापना केली.
मिलिन्द आधी भात खायचा नाही, माझं भाताशिवाय व्हायचं नाही.
सवयीने तो थोडा भात खायला लागला.
हॉस्टेलवर राहिलेला असल्याने त्याला वेगळं खाण्याची सवय होती.
माझ्या पद्धतीच्या भाज्या त्याला आवडल्या नसतील/नाहीत, त्याने चालवून घेतलं.
माझं म्हणणं होतं की त्याच्या पद्धतीचा स्वैपाक हवा असेल तर त्याने तो करावा.
तुझ्या पद्धतीच्या भाज्या कर, आयतं मिळणार असेल तर मला चालेल.

जेव्हा लग्न होतं तेव्हा दोन खाद्यसंस्कृती एकमेकांना भिडत असतात.
मुलींनी सासरचं वळण अर्थात ती खाद्यसंस्कृती स्विकारावी असंच त्यांना शिकवलं जातं.
सासरच्या पद्धतीच्या, नवर्‍याला आवडणार्‍या भाज्या शिकाव्यात/कराव्यात हे अपेक्षित असतं.
ते नाही का? सुप्रसिद्ध वचन! ’ नवर्‍याला जिंकायचा मार्ग त्याच्या पोटातून जातो.’
कशी क्रियापदे वापरली जातात ते पाहा. जिंकणे वगैरे, लग्न हे एक युद्ध आहे याची भाषेला पुरती जाणीव आहे. :)

नवर्‍याला जिंकायचं म्हणजे जिंकून त्याच्यावर राज्य करायचं असं नाही,
त्याची सेवा करायची, त्याने आपली सेवा कबूल करावी हे पाहायचं.
( त्याने दुसर्‍या स्त्रीकडे बघू नये, असंही अपेक्षित आहे की काय?!)

लेकी माहेरघरी येतात तेव्हा आया त्यांच्या आवडीचं करून घालतात/घालत असत.
( आता परिस्थिती थोडी बदलली आहे.)
कारण हा पदार्थ या पद्धतीने सासरी मिळत नाही, तो तर करतच नाहीत म्हणून.

माझ्य़ा माहेरच्या आणि सासरच्या खाद्यसंस्कृतीत बराच फरक आहे, दोन्हीकडे शाकाहार असला तरीही.
आमच्याकडे भाज्या-वरणात, पोहे-उपम्यात कशातही साखर घालत नाहीत.
भाज्यांमधे साखर घातली की त्या चविष्ट होतात की साखर न घालता अधिक चांगल्या लागतात?
हे कसं ठरवणार? आपल्या सवयींवर असतं.

भाजीवरण-उपमापोहे यात कशातही मी साखर घालत नाही.
( सासूबाई किंवा नणंदा आल्या तर त्या घालतात, पण त्या आलेल्या असतानाही मी माझ्या पद्धतीने करते, त्यांनी समजा केले तर त्या घालतात.)
मिलिन्दला गोड पदार्थ जरा गोSड लागतात. हा बदल मी केला आहे, मलाही आता त्याची सवय झालीय.
पोळ्या आमच्याकडे जरा जाड असतात. पूर्वी मी मिलिन्दच्या पातळ आणि माझ्यासाठी जाड लाटायचे. :)

साध्या साध्या गोष्टी असतात.
म्हणजे भात. भातात काय फरक? असं वाटू शकतं.
आमच्याकडे मोकळा करतात तर मिलिन्दकडे आस्सट! म्हणजे मऊ.
लग्न झाल्यावर सुरूवातीला एकदा मी संगमनेरला कुकर लावला आणि मोकळा भात केला.
मिलिन्दच्या आत्या आलेल्या होत्या, त्या म्हणाल्या, "भाताची शितं मोजता येतील. पाणी मोजून टाकलं नाहीस का?"
:)
मला तर वाटत होतं की किती छान मोकळा भात झालाय! माझ्यामुळे सगळ्यांना त्यादिवशी मोकळा भात खावा लागला.
आमच्याकडे आई काय सांगायची, असं पाणी बेताने टाकायचं, गिच्च गोळा भात करायचा नाही, मोकळा झाला पाहिजे.
:)
सुनांनी काय करायचं? तर सासरची रीत शिकून घ्यायची.
माझ्या पाहण्या-ऎकण्यात एकही असा जावाई नाहीये, जो सासरी गेल्यावर सामान्य परिस्थितीत, सहज अगदी सहज कुकर लावतो आहे किंवा पोळ्या लाटतो आहे. कुणाला माहित असेल तर कळवा.

मला काय कळलं? कुठल्याही प्रकाराला हा जास्त चांगला असं म्हणता यायचं नाही, सवयीवर आहे.
माझ्या सासरच्या माणसांना माझ्या माहेरच्या पद्धतीचं जेवण आवडणार नाहीये. माहेरच्यांना सासरचं आवडत नाही.
आमच्याकडे लग्नाच्या जेवणात तर जाड जाड आणि खूप मोठ्या पोळ्या लाटतात मग त्याचे उलथन्याने तुकडे करून वाढतात.
सासरच्यांना नसेल आवडलेलं.
याच्या उलट माझे मामा इकडच्या लग्नाला आलेले, गोडसर भाजी-वरण ते वैतागले ते म्हणाले मला जरा मिरचीचा ठेचा आणा.
ठेचा आणला तर काय? त्यातही साखर!
:)

आमच्या घरात या आघाडीवर आम्ही/ मी काय केलं? बरेचसे तह केले. रोजचे भाजी-वरण माझ्या पद्धतीने, गोड अधिक गोड मिलिन्दच्या पद्धतीने, पंजाबी ,गुजराती, दाक्षिणात्य पदार्थ शिकले तसे तसे, बाकीचे बाहेर जाऊन.
या युद्धात काही पदार्थ शहीद झाले.
त्यात एक कढी! आमच्यापद्धतीची जरा आंबट कढी मला खूप आवडते. मिलिन्दकडची साखर घातलेली गोडसर त्याला खूप आवडते.
माझी कढी बाजूला काढून मग त्यात साखर घातली तरी त्याला आवडत नाही.
त्याच्या पद्धतीने करून साखर घालण्याआधी बाजूला काढली तर ती मला आवडत नाही.
कढी आम्ही आमच्या आमच्या माहेरी जाऊन खातो.

(लग्नाआधी किंवा एकमेकांबरोबर राहण्याआधी एकमेकांना हे सांगावं की तुझ्या आवडीचे चार पदार्थ तू शिकून घे.)


( क्रमश:) 

अक्कणमाती चिक्कणमाती -- ६

******

Friday, March 11, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ४


स्वयंपाक करताना मजा येत नाही, असं आहे का?
तर नाही, मजा येते.
स्वयंपाकघर ही खरोखर प्रयोगशाळा आहे.
रंग, रस, गंध, स्पर्श आणि ध्वनी पंचेन्द्रियांना आवाहन आहे.
पहिले म्हणजे गंध, स्वैपाकघरातून काय मस्त मस्त वास येत असतात.
भाज्यांचे वेगवेगळे मुख्यत: हिरव्या रंगछटेतील रंग, रंगीबेरंगी कोशिंबीर,
डाळीचा पिवळा, पोळ्यांचा गव्हाळ, भाताचा पांढरा, लोणच्याचा लाल...
रंगाच्या दृष्टीने पाहिलं तर ताट कसलं भारी दिसत असतं.
साध्या पोळीचाही प्रवास पिठाचा रंग ते भाजलेल्या पोळीचा रंग असा बदलत असतो.
फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं की ते प्रसरण पावतं. हळू हळू वास यायला लागतो.
मोहरी तेलात भिजू न देता परफेक्ट टायमिंग साधत टाकली की ती तडतडते,
ती जळण्याच्या आत मिरची हिंग पडायला पाहिजे, मग भाजी!
बरेचदा मी मिरचीऎवजी लाल तिखट वापरते.
यात वेळेचं महत्त्व फार आहे.
पोह्यांमधला शेंगदाणा किंवा पुलावातला काजू विशिष्ट रंगात तळला गेला तरच मस्त लागतो.
तर स्वैपाकाचा एक माहोल तयार झालेला असतो.
कणीक छान मळली की हाताला तिचा स्पर्श कसा सुखावतो.
छान भूक लागलेली असली आणि असे गंध आणि रंग!
जेवायला मजा येते.
लहानपणापासून ज्या पद्धतीचं जेवण आपण करत आलेलो असतो त्यात तृप्त करण्याची क्षमता असते.
म्हणजे चायनीज किंवा थाई किंवा पिझा खाऊन पोट भरतं, चव कळते. ते आवडतंही.
तृप्त होतो का?
मला शंका आहे.
आपली मुळं खूप खोलवर गेलेली असतात.
आपल्या बालपणात, आपल्या मातीत.
तृप्तीशी आपल्या भावना निगडीत असतात.
आपल्या ओबडधोबड मूळ गावी कशी एक आतून प्रसन्नता आणि स्वस्थता येते.
आपण फिरायला जातो तेव्हा ते श्रीमंत आणि सुबक गाव आपल्याला आवडतं, आपण भारावतो पण आपली नाळ ही शेवटी आपल्या गावाशी जोडलेली असते.
तसंच जेवणाचंही असतं.

स्वैपाक करणं माझ्यासाठी कायम कंटाळवाणंच होतं का? नाही.
मला मजा आलेली.
खाणारांनी शाबासकी दिल्यावर, खूप मार्क्स मिळावल्यावर कसं भारी वाटतं,
तसं मला वाटलेलं आहे.

बहुदा मी अकरावीत होते,
विश्वास पुण्याहून आलेला.
कशी कोण जाणे, मी पोळ्या करत होते.
पोळी अशी ट्म्म फुगली, तो म्हणाला, " वा!"
जमताहेत की तुला"
मग म्हणाला, " ही जी पोळी तू लाटते  आहेस ती जर अशीच फुगली तर मी तुला काहीही देईन."
" एवढं काय? फुगतात माझ्या पोळ्या "
आणि तीही पोळी फुगली, तो म्हणाला, "माग काय हवं ते! काहीही, मागे पुढे पाहू नकोस ."
" काय बरं मागू? ड्रेस? पुस्तक? "
" काहीही पटकन सांग. पुढची पोळी होईपर्यंत, नाहीतर संधी गेली."
आई गं! खरंच संधी गेली! :(
मला काही ठरवताच आलं नाही.
आपल्याला काय हवं आहे ते आपल्याला बरेचदा माहितच नसतं.

बाबा आणि मी मिळून स्वैपाक करायचो तर काय मजा यायची.
बाबा काय सुंदर कणीक मळून द्यायचे!
सोबतीला त्यांच्या गप्पा!
बाबा त्रिकोणी पोळ्या करत आणि बर्‍यापैकी जाड करत.
मी आणि विश्वास कधी कधी म्हणायचो, "बाबा, पोळी जरा जास्तच जाड झाली आहे."
" जाडी काय बघता? लुसलुशीत किती झाली आहे बघा. पापुद्रे कसे सुटले आहेत तुमच्या आईला सुद्धा अशी पोळी करायला जमणार नाही." :)
आम्ही गप्प बसत असू.
भाज्या पण कायच्या काय करायचे, वरणात दाण्याचा कूट घालायचे, काहीही!
वर आम्हांला त्यामुळे चव कशी बदलली आहे, छान झाली आहे, ते पटवून द्यायचे.
ते आम्हांला पटायचंच असं नाही पण आम्ही त्यांच्या प्रयोगांना शरण जात असू. :)
ते पसारा इतका करून ठेवत, वर याचे हात त्याला,
आईने जर पाहिलं असतं तर काही खरं नव्हतं.
आईचं शिस्तीच्या स्वैपाकघरात नुसता गोंधळ करून ठेवत.
दोन चार दिवस मजा यायची मग आईची वाट पाहणे सुरू होई.

मी नाट्यशास्त्राचा कोर्स करत होते तिथे एक पाककृतींची स्पर्धा ठरली.
माझ्या गटाला सुरळीच्या वडीची चिठ्ठी आली होती.
आमच्या तिकडे हा पदार्थ करत नाहीत,
आत्यांना फोन करून विचारलं.
आदल्या दिवशी घरी करून पाहिल्या,
आणि मग दुसर्‍या दिवशी तिथे बनवल्या आणि चक्क पहिला नंबर!

मिलिन्दच्या बाबांचे मामा संगमनेरला आले होते तेव्हा मी गुलाबजाम करून घेऊन गेलेले,
त्यांना खूप आवडले.
मग साताठ वर्षांनी मी त्यांच्याकडॆ गेले तेव्हा त्यांच्या सूनेने सांगितलं तुझे गुलाबजाम छान असतात ना?
:)
असं कुणी म्हंटलं की छान वाटतंच.
मी काही सुगरण नाही. हाताला चव वगैरे कॅटॅगरीतली तर अजिबात नाही.
कुठल्याही बाईला येतात तसे चार पदार्थ मलाही चांगले जमतात.
इतकंच

एकदा गंमत झाली.
मिलिन्दची आतेबहीण आली होती,
सखुबद्दा चाटून खाल्ला आणि म्हणाली, " तुझ्याकडून शिकून मीपण करते.
माझ्या भाच्यांना फार आवडतो, ते या लोणच्याला मावशीचं लोणचं म्हणतात,
मी म्हणते अरे, ते माझं नाही, विद्याने शिकवलेलं लोणचं आहे. तुम्ही याला मिलिन्दचं लोणचं म्हणा."
:) :)
मिलिन्दचा काय संबंध?

मी आईकडून शिकले. ती तिच्या आईकडून शिकली.
खरं कुठले कुठले पदार्थ आपण कुठून कुठून शिकतो, कशात भर घालतो,
त्यातले काही आपल्या घरात रूजतात.
पदार्थांचंही लोककथांसारखं असतं.
वर्षानुवर्ष लोकांनी लोकांना सांगितलेल्या तसे वर्षानुवर्षे लोकांनी (बायकांनीच मुख्यत:) लोकांसाठी करत आलेले पदार्थ.
कुठल्या पदार्थाची जननी कोण आहे ते ओळखणं अवघडच!
पदार्थाच्या माध्यमातून आपण समूहाशी जोडलेलो असतो.
लोकांचं शहाणपण त्यातही उतरलेलं असतं.

( क्रमश:) 

Thursday, March 10, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ३

घराघराचा अन्नाकडे, जेवणाकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन असतो.
आमच्याकडे औरंगाबादला असं आहे की ताजं आणि गरम जेवावं.
चवीपेक्षा वेगवेगळे प्रकार खायचेच, असं आहे.
रूचकर नसेल पण ते आरोग्यदायी असेल तर ते खायला हवं.
जेवण ही शरीरक्रियांसाठी, उर्जेसाठी आवश्यक बाब आहे.
तेवढंच महत्त्व त्याला आहे, जीभेवर ताबा महत्त्वाचा आहे.
आपण काहीही ( व्हेज) खाऊ शकतो, हे आम्हांला भारी वाटायचं.
बाबा कधीतरी कडुनिंबाच्या पानांचा कुटून रस काढत आणि ग्लासभर रस सहज पीत.
आमच्यासाठी अर्धा ग्लास असे. तो चेहरे वेडेवाकडे न करता प्यायला आम्ही शिकलो.
न आवडणार्‍या चवीची भाजी असेल तर ती संपवणं आम्हांला आव्हानात्मक वाटायचं.
आम्ही ती संपवायचो.
ताटात काहीही टाकायचं नाही.
हवं तितकंच वाढून घ्यायचं.
काहीही वाया घालायचं नाही.
आई आमच्याकडे पत्ताकोबीच्या दोन भाज्या करत असे,
पानांची एक आणि मग खालच्या खोडाच्या भागाची एक.
कोथिंबीरीच्या काड्यांची चटणी किंवा त्यांची मोळी बांधून आई वरणात सोडत असे,
नंतर ती काढून टाकायची मस्त स्वाद उतरतो, थोडीशीच पानं टाकली तरी चालतात.
यामागचं एक कारण काटकसर हे ही होतं.

माझ्या सासरचं थोडं वेगळं आहे.
तिथे चवीला महत्त्व आहे.
जे काय घरात असेल त्यात, याच्याऎवजी ते, वापरून आई पदार्थ करते.
आत्यांचं तसं नाही. त्या ठरल्याप्रमाणे करतात.
त्या पदार्थांवर जास्त मेहनत घेतात.
तेल, तूप सढळ हस्ते वापरत, पदार्थ नटवतात.
त्यांचे पदार्थ रूचकर असतात.
त्यांनी पदार्थाचा एक दर्जा ठरवलेला असतो,
तसा त्यांना व्हायला हवा असतो.
नाही झाला तर त्यांचा मूड जातो.
चवीला महत्त्व असल्याने, पदार्थ अधिकाधिक चविष्ट करत जाणे, हे घडतं.
ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे.
बाकी त्यांच्यासाठी अंदाज, वाया न जाणं हे फारसं महत्त्वाचं नाही.
शिळं अशी काही संकल्पना नाही.

अन्नासंबंधीचं आपलं जे वागणं असतं ते आपल्या डोक्यात असतं,
आपल्या विचारात असतं.
आपण काय विचार करतो आणि का करतो? हे प्रत्येकाने पाहायला हवं असतं.
जगभरात असा कुठलाही पदार्थ नाही की जो रूचकर आहे असं जगातली प्रत्येक व्यक्ती सांगेल.
आपल्या सवयी असतात, आपल्या भावना असतात, आपल्या आठवणी त्याच्याशी निगडीत असतात.
आपल्या घराच्या म्हणून परंपरा असतात, इतिहास असतो.
संगमनेरला नरकचतुर्दशीच्यादिवशी सकाळी फोडणीचे पोहे करतातच,
सगळे फराळाचे पदार्थ असतात तरीही. कारण मिलिन्दची आजी तसं करायची म्हणून आत्या करतात.
छान वाटतं.

माझा अन्नासंबंधीचा विचार काय आहे?
मुख्यत: तो औरंगाबादच्या घरासारखा आहे.
पण विशिष्ट पदार्थासाठी विशिष्ट साहित्य, ठराविक प्रमाणात घ्यायचंच,
आणि तो पदार्थ आपल्याला हवा आहे तसा करायचा.
चवीकडेही लक्ष पुरवायचं हे मी वाढवलेलं आहे.

स्वयंपाकघर सांभाळणारी/ चालवणारी म्हणून माझी काय जबाबदारी आहे, असं मी मानते?
घरातल्या सगळ्यांना आणि आल्या गेल्यांना वेळच्यावेळी पोटभर जेवायला घालणं ही माझी जबाबदारी आहे.
त्यासाठीचा कच्चामाल आहे ना? हे पाहणं. पथ्यपाणी असेल तर ते सांभाळणं.
स्वयंपाकात वैविध्य आणणं. प्रत्येक सदस्याच्या आवडीनिवडीचा विचार करणं.
आपण " समतोल आहार " करतो आहोत ना? हे पाहणं.
त्यासाठी तेलातूपाचा , गोडाचा अतिरिक्त वापर न करणं.
मुलांच्या मनात अन्नाविषयीचा एक दृष्टिकोन तयार करणं.
स्वयंपाक करायचा म्हणजे काय काय करावं लागतं, हे मुलांपर्यंत पोचवणं. :)

( क्रमश:)

**********

Wednesday, March 9, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- २

सकाळी मिलिन्दला मी चहा करून देत असे, अगदी तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत हे चालू होतं.
तो स्वत: चहा करत नाही/तेव्हा करायचा नाही.
वास्तविक शिकेल नाहीतर चहा न घेता जाईल असा मी विचार करायला हवा ना?
मला उशीरापर्य्ंत झोपायला आवडतं आणि तेवढा चहा करून देण्यासाठी मी उठत असे,
फार लवकर नाही, सव्वासातला. :)
माझ्या मनात कुठेतरी हे आहेच की जर मी नोकरी करत नाही तर स्वैपाकघर सांभाळलं पाहिजे.
त्याच्या बरोबरीने नोकरी केली असती तर मी याबाबत आग्रही राहिले असते.

सवयीने मी स्वैपाक करत असले तरी ते काही माझ्या आवडीचं काम नाही.
जुजबी आणि आवश्यक तेवढाच स्वैपाक मी करते.
वरण-भात-भाजी-पोळी- कच्चं- इतकाच.
दोन -तीन भाज्या किंवा साईड डीश असं काही नाही.
मी केवळ भारतीय पदार्थ करते.
माझं वाहवत जाणं थांबलेलं आहे.
चायनीज, थाई, इटालियन असे कुठलेही पदार्थ मी करत नाही.
ते बाहेर इतके सुंदर मिळतात, जीभ त्याला सोकावली आहे,
हवे तेव्हा आम्ही बाहेर जाऊन खातो.
मुळात मिलिन्दला कुठे कुठे जाऊन काय काय खाण्याची आवड आहे,
म्हणून हे जमतं.
अशावेळी तो बिलाकडे पाहात नाही, मला हे जमलं नसतं. :)

पण स्वैपाकातले माझे काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत.
माझा अन्नाकडे पाहण्याचा काही एक दृष्टीकोन आहे.
फार प्रकार नसतील तरी चालणार आहे पण ताजं आणि गरम खावं.
माझा अंदाज परफेक्ट असतो.
आमच्याकडे फार क्वचित शिळं उरतं.
महिन्यातून एक-दोनदा इतकं ते प्रमाण कमी आहे.
फ्रिज मला लागत नाही अशी परिस्थिती आहे.
मधे बंद पडलेला तेव्हा ९ - १० महिने आमच्याकडे फ्रिज नव्हता.
मी म्हणत होते, घ्यायलाच नको.
शेवटी उन्हाळ्यात आईसक्रिम ठेवण्यासाठी म्हणून घेतला.
मी स्वैपाक करून ठेवत नाही.
कुकर लावते, कणीक भिजवते, भाजी फोडणीला टाकते,
भाजी होईस्तोवर कुकर झालेला असतो, वरण फोडणीला टाकते,
कोशिंबीर किंवा कच्च्या चकत्या, की आम्ही पानं घेतो.
वरण गरम, भात गरम, भाजी गरम...
मी पोळ्या करायला घेते आणि तव्यावरची पोळी ताटात!
शेवटची तव्यावरची पोळी मी घेते आणि जेवायला बसते.
साधारण तासभर स्वैपाकाला आणि अर्ध्या तासात आम्ही तो संपवतो.
अर्थात भाजी कुठली आहे आणि कशी करायची आहे त्यावर वेळ ठरतो.
गेली दोन वर्षे माझ्याकडे पोळ्यांना मावशी आहेत, त्यामुळे तास - दोन तास शिळ्या पोळ्या आम्हांला खायला लागतात.
त्यापूर्वीपर्यंत जवळ जवळ अठरा वर्षे मी हे करत होते.
याकाळात पुन्हा गरम करण्यासाठी लागणारा गॅस वाचलेला आहे.
अन्न वाया घातलेलं नाही.
ताजं- गरम- सकस अन्न खाल्लेलं आहे.
हे मी माझ्या आईकडून शिकले आहे.

मी पोळ्या करते, त्यामुळे साहजिक मी शेवटी जेवते,
मिलिन्द करत असता तर तो जेवला असता.
मिलिन्दला गरमच पोळ्या हव्यात, असं त्याचं नव्हतं.
मध्यंतरी मी डाऎट करत होते, मी माझ्या दोन पोळ्या करून आधी जेवून घेत असे,
मग सगळ्यांना करून घालत असे.

( क्रमश:)  

अक्कणमाती चिक्कणमाती -- ३

****

Tuesday, March 8, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- १

महिलादिनाच्या शुभेच्छा!

सध्या मी पूर्वी जसं नियमीतपणे महिन्यातून दोनदा लिहित असे तसं लिहित नाही.
थोडा काळ विश्रांती! :)
पण ८ मार्च च्या निमित्ताने स्वयंपाकावर लिहायचं राहिलेलं, ते लिहिते आहे.

*******

स्वयंपाक हा कधी माझ्या आवडीचा विषय नव्हता.
आमच्या वाड्यात सगळे मुलगे आणि मी एकटी मुलगी त्यामुळे असेल, मी भातुकली कधी फारशी खेळले नाही.
दोन -चारदा असेल.
सांगायचा मुद्दा खेळातही कधी मी स्वयंपाकाकडे ओढली गेले नाही.
स्वयंपापाकात आईला मदत करणे हे ही मी केलेलं नाही.
ते ( न करणं) आईने मला करू दिलं.

सातवी-आठवीत मी कुकर लावायला शिकले, नंतर पोळ्या - भाजी हे ही शिकले.
पण ते केवळ अडीनडीला. रोज केलं पाहिजे असं काही नव्हतं.
माझ्या मैत्रिणी काय काय नविन शिकत होत्या, मी त्यात नव्हते.
मावशीला सांधेदुखीचा खूप त्रास होता आई तिच्या मदतीला कधी कधी नांदेडला जाई, तेव्हा मी, विश्वास आणि बाबा मिळून स्वैपाक सांभाळायचो.
बाबांना सगळा स्वैपाक येत असल्यामुळे मी त्यांची मदतनीस असंच असे.
आई बाबा जेव्हा यात्रा वजा सहलीला जात असत तेव्हा दोन- तीन आठवडे स्वयंपाकघरासह सगळं घर मी सांभाळत असे.
अर्थात तेव्हा मी एकटीच घरी असे.

मुलगी म्हणून मला स्वैपाक आलाच पाहिजे, हे शिकून घे - ते शिकून घे असं आईने कधी केलं नाही.
" काय एवढं स्वैपाकाचं? अंगावर जबाबदारी पडली की जमतो’ असं ती म्हणत असे.
आणि मला वाटत असे की मी काही स्वैपाकघराशी बांधून घ्यायची नाही.
लग्नाआधी मी काही फारसे नवनविन पदार्थ करून पाहिले असं झालं नाही, चार दोन केले असतील.

मी बाहेरची कामं सांभाळत असे. म्हणजे काय काय आणून दे, बिलं भर असली कामं करत असे.
आत्ता कळतंय की त्याने बाबांना मदत होत असे, आईला नाही.

लग्नं झालं. मला स्वैपाक येत होता. मिलिन्दला येत नव्हता.
मी नोकरी करत नव्हते. मिलिन्द करत होता.
अर्थात स्वैपाकाची जबाबदारी माझ्याकडे आली.
ही दोघांची मिळून जबाबदारी आहे, हे माझ्या मनात पक्कं होतं.

स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा असते.
ती माझ्या ताब्यात आली.
माझ्याकडे वेळ होता.
काय काय करून बघायची सुरसुरी मला आली.
माझ्या सासूबाईंनी रूचिरा हे पुस्तक मला दिलं होतं.
टिव्ही वरचे कुकरी शोज मी पाहायचे.
वेगवेगळ्या साप्ताहिक, मासिक, वर्तमानपत्रातली स्वयंपाक विषयक सदरे आवर्जून वाचायचे. :)
पाककृती लिहून ठेवण्यासाठी एक वही केली होती.
मी वाहावत चाललेले :)
त्याचं एक कारण वाहवा हे ही होतं.

मी लग्नानंतर दोनेक महिन्यांत असेल,
आंब्याच्या वड्या केलेल्या त्या इतक्या छान झालेल्या, नंतर नारळाच्या केल्या त्या पण मस्त जमल्या.
वड्या करून कुठे कुठे पाठवणे असं सुरू झालं.
अनिल अवचटांच्या पुस्तकात वड्या जमणं म्हणजे स्वैपाकातली कशी वरची पायरी आहे हे वाचलं होतं.
त्यामुळे मलाही भारी वाटत होतं.
मग भातांचे प्रकार शिकले,
दाक्षिणात्य पदार्थ शिकले,
पंजाबी भाज्या वगैरे शिकले,
पोळ्यांचे प्रकार शिकले.
गोडाधोडाचे शिकले.
वेगवेगळ्या प्रकारची आईसक्रिम्स शिकले, ( कोर्स करून नव्हे असंच, आधी महाजन मावशींकडून शिकले.)
वर्षाची लोणची घालायला शिकले. ( हे मामींकडून)
रुचिरा घेऊन प्रत्येक पदार्थाला टीक करणे,
आणि अभ्यासाला असल्यासारखं पुस्तक संपवणे असा संकल्प मी केलेला आठवतो आहे.
आई कडून शिकले, आत्यांकडून शिकले आणखीपण कुणाकुणाकडून शिकले.

कोणीही पुण्यात आलं की त्यांना जेवायला बोलवायचं असं माझं असायचं.
काही जण आमच्याकडेच उतरायचे.
१५-२० माणसांचा स्वैपाक मी एकटी करू शकत असे.
माणसांची आवड होती.
माझ्या बाजूचे नातेवाईक तर जाऊदे, मिलिन्दकडच्याही सगळ्या नातेवाईकांना मी आग्रहाने बोलावत असे.
कोणाला काय आवडतं, मागच्या वेळेस काय केलं होतं, आता वेगळ काय करूया?
कशाशी काय जाईल?
विचार करून मेनू ठरवणे यातही माझा बराच वेळ जात असे.
मला या सगळ्यात कायम मजा यायचीच असं नाही.
मला ते काम खूप व्हायचं असंही होतं.
पण आले गेले नावाजत हे एक आहे.
आणि दुसरं मला वाटे आपण संसार थाटला आहे,
तर आल्या गेल्याचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे.
आपण साधं जेवायला घालू शकत नाही?
एवढं तर एका घराने करायलाच हवं.
वेळी अवेळी आलेल्या कुठल्याही माणसासाठी आपल्या घराचं दार उघडं असलं पाहिजे.
किमान त्याला जेवू घातलं पाहिजे.
जे करायचं ते आनंदाने केलं पाहिजे.

जी दाद मला मिळायची ती स्वैपाकाला असेच पण त्याहून अगत्याला असे, असं आज मला वाटतं.
मिलिन्दच्या मावशींना मी म्हणालेले, " मावशी, एवढं काय! तुम्ही होतात, तुमचीपण मदत झालीच की!"
त्यावर त्या म्हणाल्या होत्या," काम तर आपण करतो आणि रोज खातोही. वेगवेगळे पदार्थ केलेस त्याचं वाटलंच
पण तुझं अगत्य, आपलेपणाने करतेस ते जास्त आवडलं. "
त्यांची प्रतिक्रिया माझ्या लक्षात राहिली आहे. त्याने मला एक वेगळा कोन मिळाला.
पुढे कधीतरी मी शिकले Attitude किती महत्त्वाचा असतो ते!

कधी कधी मला कंटाळा येतो मग वाटतं,
माझ्या आईने हे वर्षानुवर्षे केलेलं आहे, मला का जड जावं?

न सांगता, मला गृहित धरून कोणीही आमच्याकडे आले तरी
मी कधीही आलेल्या माणसांवर नाराजी दाखवली आहे, वैतागले आहे किंवा आदळाआपट केली आहे असं झालेलं नाही.
मी त्यांच्याशी नीट बोलले नाही असंही केलेलं नाही.
वरकरणी आनंदानेच मी केलं, आत मला कंटाळा येत असला तरीही.
अजूनही मला तेच वाटतं.
एकतर नीट करावं , जमणार नसेल तर थेट सांगावं.

लग्नानंतर सुरूवातीच्या दिवसांत मी स्वैपाकाची जबाबदारी घेतली तरी ती मी एकाहाती सांभाळायची असं नव्हतं.
मिलिन्दनेपण केलं पाहिजे हा आग्रह मी धरत असे.
त्याला पोहे शिकव, उपमा शिकव हे केलेलं आहे.
मी त्याला गरम डोसे करून वाढायचे आणि म्हणायचे की मलाही गरम हवे आहेत, तू करून वाढ.
खिचडी कर.
हे प्रयत्न कधी बंद पडले हे आता मला आठवतही नाहीये.
त्याला आवड नाही.
मी म्हणायचे , " मलाही आवड नाही पण करत्येय ना? कुणीतरी केलं पाहिजे ना?
मीही तुझ्याइतकीच शिकले आहे शिवाय स्वैपाकही शिकलेय. तू काय शिकलास?"
मिलिन्द म्हणाला, " तुला आवडत नाही तर तूही करू नकोस "
" मला असं म्हणून चालेल काय?"
एकदा जोरदार भांडण झालं.
मिलिन्द म्हणाला, " आपण पुण्यासारख्या शहरात राहतो, इथे काहीही मिळू शकतं.
मला चहा आला नाही तरी चालणार आहे. बाहेरचं खाणं म्हणजे निसत्व, अस्वच्छ असं आता राहिलेलं नाही."
मी म्हणाले, " तरीही रोज?"
तो म्हणाला, "रोज!. घरात स्वैपाकघर असलं पाहिजे असंही काही नाही."
"काय?"
"हो"
" अरे, आजारी माणसं असतात, तान्ही बाळं असतात. त्यांच्या खाण्याचं, पथ्याचं काय करायचं?"
" सगळं बाहेर मिळू शकतं."
" असं आहे? स्वैपाक ही इतकी बिनमहत्त्वाची गोष्ट आहे.? मी काय करत बसले आहे? गेली ८-१० वर्षे मी काय करते आहे?" ( तेव्हा आमच्या लग्नाला तेवढी वर्षे झालेली. :))
मी भयंकर चिडलेले.
मी त्याला मुदत दिली म्हणाले, " आठ दिवसांनी नीट विचार करून सांग, आपल्या घरात स्वैपाकघर हवं की नको?
माझी १० वर्षे मी यात घालवलेली आहेत. तुझं उत्तर आलं की मी ठरवीन काय ते."
स्वैपाकघर ही घराला एकत्र जोडणारी जागा आहे.
जेवताना आपण किती मजा करतो.
मिळून जेवण , जेवतानाच्या गप्पा हा दिवसातला आनंददायी वेळ असतो.
आणि ते करताना घरातली बाई/पुरूष (जर कुठल्या घरात असेल तर) किती खपत असतात.
तिच्या श्रमांविषयी आपल्याला आदर असला पाहिजे.
नुसता आदर नाहीच कामाचा, मदत करायला हवी.
स्वैपाकघरातलं काम जर घरातल्या सर्वांनी मिळून केलं तर ते तितकं कंटाळवाणं राहणार नाही.
असो.
दोन दिवसांनी विचारलं, " सांग, घराला स्वैपाकघर पाहिजे की नको?"
अजूनही त्याचं काही आवश्यकता नाही असंच उत्तर होतं.
आठ दिवसांनी शेवटी त्याने " पाहिजे " असं उत्तर दिलं.
कदाचित मी जिद्दीला पेटले म्हणून असेल. :)
आपल्या विचारात जर एवढी तफावत असेल आणि मी जी वर्षे स्वैपाकघरात घालवली त्याबद्दल तुला काहीच वाटत नसेल,
तर मी तुला सोडून देते, असंच मी म्हणत होते.

त्यानंतर ताईचं आजारपण झालं, सुहृदची पथ्ये, हे सगळं काय बाहेरून आणता आलं असतं?
स्वैपाकघर नसतं तर कसं जमवणार होतो?

पण आज वाटतं मीही जरा जास्तच करत होते,
स्वैपाकघर नाही ही कल्पना इतकी काही टोकाची नाही.
सर्वसाधारण परिस्थीतीत अशक्य नाही.
हॉस्टेलमधे राहायचोच ना?

 स्वैपाक करणारी व्यक्ती एकटीच तेच तेच करत्येय असं असायला नको.
ज्यांना स्वैपाकाची खरंच आवड आहे, त्यांनाही रोज रोज तेच तेच करायला आवडतं का?
स्वैपाकाला दाद मिळाली की माणूस ( बाईमाणूस :)) त्या मोहात पडतो आणि वाहवत जातो.
सुगरणींनी सुद्धा यावर विचार करायला हवाच आहे.

एकूणच बाई स्वैपाकघरात कशी अडकत जाते, याचा मला चांगलाच अनुभव आला होता.
मला कंटाळाही यायला लागलेला.

मी स्वैपाक केला पाहिजे अशी सक्ती मिलिन्दने कधीही केली नाही.
आलेल्या माणसांना बाहेर जेवू घालायची त्याची तयारी असे.
मलाही तो कशाला दमतेस? असंच म्हणत असे.
भाज्या बाहेरून आणू, गोड बाहेरून आणू,
पण मलाच ते सगळं घरी करायचं असे.
आता मी अशी बाहेरची मदत घेते.

माझ्या जेवणाची जबाबदारी तुझ्यावर आहे असं समजू नकोस,
हे मिलिन्दने मला लग्न झाल्या झाल्याच सांगितलेलं आहे.
मी जेव्हा माहेरी जात असे म्हणजे आजोळी जात असे,
’तू इकडे आल्यावर आता मिलिन्दच्या जेवणाच्ं काय?" हा प्रश्न मला हमखास विचारला जाई.
मी जरा चिडत असे. "इतकी वर्षे तो जेवायचा ना? बघेल त्याचं तो."
" आता लग्न झालंय"
" पुण्यात सोय होते, चांगलं मिळतं जेवायला आणि त्याला आवडतंही बाहेर जेवायला,
मी नसले की त्याच्या आवडीचं नॉनव्हेज खाता येतं."
माझी असली उत्तरं त्यांना आवडत नसत. :)


( क्रमश:)

अक्कणमाती चिक्कणमाती -- २


****

Sunday, July 19, 2015

गोधडी



लेकीची गोधडी फाटली होती आणि मलाही माझ्यासाठी एक हवी होती.
लहानपणी माझी माझी एक गोधडी होती आणि ती मला फार प्रिय होती.
कुशनसाठी कापड पाहात होतो तर तिथे गोधडी पाहिली, रजई / रजईत आत कापूस असतो ना?
ती वापरा आणि टाकून द्या प्रकारातली होती, सवलतीतील किंमतही मला जास्त वाटली,
म्हणून घेतली नाही.
आणि एकदम मला आठवलं की अरेच्चा! मला तर घरी गोधडी शिवायची होती!

हं!

आई बाबा येणारच होते, आईला म्हणाले की तुझ्या जुन्या सुती साड्या घेऊन ये.
आई साड्या आणि जुनी शालही घेऊन आली.

इंटरनेटवर गोधड्या पाहायला सुरूवात केली.
भारतातल्या  गोधड्या पाहिल्या.
नीलिमा मिश्रा सर्च देऊन पाहिल्या.
गोधड्या आहेत पण खूपच्या खूप नाहीयेत.
तेच जर क्विल्ट सर्च दिला तर आहेत.
अमेरीकन क्विल्टचे खूप प्रकार दिसतात.
मागे चार-सहा वर्षांपूर्वी जेव्हा मला गोधडी शिवायची होती, तेव्हाही मी बरेच प्रकार पाहिलेले.

यावेळी माझं क्विल्ट नाही हे नक्की होतं.
माझ्या परंपरेतली माझ्या मातीतली डिझाईन्स मला हवी होती.

बरेच क्विल्टचे प्रकार पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्हांला मोहवून टाकण्याची शक्ती क्विल्ट्मधे आहे.
अनेक प्रकार! वेगवेगळ्या रंगसंगती, छोट्या छोट्या तुकड्यांची असंख्य कॉम्बीनेशन्स!
डोळे फिरावेत इतकी कामातली सफाई!

मी त्या सगळ्या प्रकारांना म्हंटलं, नाही!
मला माझी साधीसुधी गोधडीच हवी होती.
माझ्या आजीला,पणजीला तिच्या आजीला ज्यांनी ऊब दिली ती गोधडी!

खाली एक सुती, मांजरपाटाचं कापड अंथरलं. (तीनदा धुवून आता आकसणार नाही याची खात्री झाली.)
त्यावर आईची सुती साडी, त्यावर शाल, त्यावर पुन्हा सुती साडी,
यावर आता मला घरचे माझ्या शिवणकामातले तुकडे जोडायचे होते!

रंग जाऊ नये म्हणून ते कपडे आधी केमिकलमधे टाकून, मग धुवून वाळवले.
त्यांच्यावरून इस्त्री फिरवली.
मोठ्या सुया, गोधडीचा दोरा आणलेलाच होता.
पहिले ३/ ४ तुकडे लावले. आणि मनातल्या मनात कुठे कुठले तुकडे असतील असं करत गोधडी पूर्ण करत आणली!
आई गं!
बसूनच राहिले.
मी काय आरंभलं आहे याची मला जाणीवच झालेली नव्हती.
मी सहज अगदी सहज सुरूवात केलेली!
पण बाई गं! कुठे कुठले तुकडे जोडणार आहेस? माहित आहे का तुला?
हरक्षणी डिझाईन बदलणार आहे.
कुठे लाल घेऊ? कुठे पिवळा घेऊ? कुठे काळा घेऊ?
तुकडा बदलला की गोधडी बदलणार होती.
गोधडी म्हणजे एक चित्र आहे, हे मला पहिल्यांदा आतून कळलं.
माझ्यासमोर कोरा कॅनव्हास होता आणि रंगांचा ब्रश दोन ठिकाणी टेकवून मी नुसती बसून राहिलेले.
काय करू? कशी करू?
क्विल्ट त्यामानाने खूप सोपं आहे, एक भौमितीक रचना मनात धरून ती रिपीट करत राहायची!
काय तयार करायचंय हे पूर्ण मनात तयार असलेलं. त्यात कलेपेक्षा कुसर अधिक आहे.
गोधडी या माध्यमात प्रचंड ताकद आहे.
त्यात कुठलाही फॉर्म / रचना ठरलेली नाही.
तुकड्यांची लांबी रुंदी, रंग काय हवं ते तुम्ही ठरवायचं आहे.
खूपच मोकळीक दिलेली आहे.
अधिक स्वातंत्र्य त्यामुळे अधिक जबाबदारी!
मनात येईल ते करण्याची पूर्ण मुभा आहे!
पाहणाराला त्यात तुमचं व्यक्तीमत्व दिसणार आहे.
डोळे या गोधडी नावाच्या कलाकृतीवरून कसे फिरणार हे मी ठरवणार आहे.
आहे का मला तितकी रंगांची जाण?
मी अक्षरश: काहीही म्हणू शकते, व्यक्त होऊ शकते यातून.
समोरच्याला ते कळेल की नाही, माहीत नाही.
माझा आतला प्रवाह यातून वाहू शकणार आहे.
गोधडीने मला दिलेली सगळी उर्जा हातात धरून मी बसून राहिले होते.

माझ्याकडे मोजके, शिवणकामातून उरलेले तुकडे होते,
त्यांनीच मला माझं काम करायचं होतं.

माझ्या आजी/पणजीकडे तर याहून कमी तुकडे असतील.
त्यातच तिने ठरवलं असेल, इथे हा तुकडा लावू, तिथे तो, मग पुन्हा हा.
शिवून झाल्यावर तिला किती समाधान मिळालं असेल.
तिच्या किती दु:खांचा निचरा झाला असेल.
तिघीचौघींनी मिळून गोधडी केली असेल आणि मग कुणी कुणी ती पांघरली असेल.
त्या मायेने आत आत ऊब निर्माण झाली असेल. काय काय झाकलं गेलं असेल.

त्या माझ्या आज्या/पणज्यांनी मला बळ दिलं.
" अशी बसून काय राहतेस? घे करायला. जे होईल ते तु्झं असणार आहे."

आई होतीच. आई- मी आणि माझी लेक अशा तिघींनी मिळून गोधडी पूर्ण केली.
मला खूप आवडलीय. अगदी प्राथमिक आहे तरीही.

अजून दोन करायच्या आहेत, त्यात आणखी रंगांचे प्रयोग करता येतील.

गोधडीने मला तिचं गूज सांगितलंय.
मला जितकं जमेल तितक्या छान गोधड्या मी करीन.

Tuesday, June 2, 2015

उमा ..... बारी चाय्याची!

आम्ही सुट्टीत चार दिवस कूर्गला गेलो होतो.
तिथे मला भेटली उमा.
कोडगू चं इंग्रजांनी केलं कूर्ग
कोडगू हा कर्नाटकातील एक नितांत सुंदर जिल्हा आहे.
तिथले स्थानिक हे कोडवा, ही लढवय्या जमात आहे.
उमा आणि तिचा नवरा रमेश हे कोडगू जिल्ह्यातील एका खेड्यात किंवा वस्तीवरच म्हणू या, राहतात आणि पर्यटकांची घरगुती राहण्याची सोय करतात.

आम्ही त्यांच्याकडे उतरलो होतो.
दोघांनांही गप्पांची आवड. उमाला खूपच.
त्यांच्या कुटुंबाची तिथे पन्नास एक एकर जमीन आहे. कॉफी हे मुख्य उत्पादन!

दोघांमधेही लोकांना आपलंसं करण्याची कला आहे.
अगत्य, आग्रह आणि गप्पा जणू कुणा आप्तांकडॆच उतरलो आहोत असं वाटत होतं.
यजमान आमच्याबरोबर एकाच टेबलावर नाष्ट्याला, जेवायला बसत आणि भरपूर गप्पा होत.

आम्ही पोचलो तेव्हा आमच्या आधी राहायला आलेला ओयोन आणि उमाच्या गप्पा रंगलेल्या होत्या.
ओयोनची बायको उर्मीमाला या दोघांना गप्पा मारायला सोडून खोलीत आराम करत होती.
उमाने आमची चौकशी केली मग आमची आणि ओयोनची ओळख करून दिली, रमेश बाहेर गेल्याचं सांगितलं.

आल्यावर रमेशनेही सगळी चौकशी केली. रात्री जेवताना भरपूर गप्पा झाल्या. ओयोन आणि उर्मीमाला त्यांच्या कुंटुंबाचेच घटक झाले होते.
मग त्यात आम्हीही सामावले गेलो.
गाणी झाली, गप्पा झाल्या , सांस्कृतिक देवाण-घेवाण वगैरे! :)
मुक्ताने एक कन्नड, एक बंगाली आणि एक मराठी गाणं म्हंटलं.

उमा मला आवडूनच गेली.
सकाळी मी तिच्या घराचं चित्र काढत होते, दोघांनांही उत्सुकता कुठवर आलंय? कसं होतंय?
संध्याकाळी ते चित्र त्यांनांच दिलं. इतकी हरखून गेली ती! एखाद्या लहान मुलीसारखी! :)
चित्राने आम्हां दोघींना आणखीनच जवळ आणलं.
आमची गट्टीच जमली.

एक दिवस आम्ही कुठे बाहेर भटकायला गेलो नव्हतो, मग काय? भरपूर गप्पा.
ऎरवीही जेवणाच्या टेबलाशी तास दीड तास गप्पा!
सुरूवातीला मुलंबाळं काय करतात ते सांगून झालं.
घर सांभाळणं, शिक्षण वगैरे बायकी गप्पा!

तिला विचारलं की तुझं लग्न कसं जमलं?
ठरवून लग्न!
रमेश माझ्या भावाबरोबर एकाच कंपनीत काम करायचा.
एकदा त्याचा निरोप घेऊन घरी आला.
सकाळी सातला.
मी दार उघडलं, मला त्याने पाहिलं आणि मी त्याला आवडले.
नऊ वाजता एका मित्राला घेऊन आला, मी ज्या मुलीशी लग्न करणार आहे, ती बघ, म्हणून.
नंतर माझ्या भावाला सांगितलं की त्याला माझ्याशी लग्न करायचयं.
मी म्हणाले, " म्हणजे लव्हमॅरेजच झालं!"
" हो. त्याच्याबाजूने. मी नाही म्हणाले, मी फक्त अठरा वर्षांची होते. मला नव्हतं लग्न करायचं. हा आमच्याकडे येत राहिला, आईबाबांना हा आवडायचा. नंतर शेवटी मलाही आवडायला लागला. बावीसाव्या वर्षी मी लग्न केलं."

" तुमच्या लग्नाचे फोटॊ मला दाखव."
" नाही दाखवणार."
" का?"
" अजिबात नाही!"
" पण का?"
" अगं, माझी एक कझीन आहे, तिने मला मेक अप केलेला, ते फाऊंडेशन अन काय काय, डोळ्यांवर काय काय, ती म्हणालेली की लग्नात तर मेक अप करायचाच असतो. सगळा वेळ मी तो मेक अप सांभाळून होते, आमच्यात घुंगट घेतात, पारदर्शकच कळतं कोण कोण भेटायला आलेत. नंतर रूममधे नवर्‍याने घुंगट उचलायचा आणि दुध पाजायचं असं असतं. याने घुंगट उचलला आणि त्याचा चेहरा पाहून मला कळलं मी कशी दिसत असणार ते! भीतिदायक!"
तिकडून रमेश म्हणाला, "घोस्ट!"
आम्ही खळखळून हसलो.
त्या आठवणीने ती पुन्हा हिरमुसली. तिच्यात एक छोटी मुलगी आहे.
" मग मी आरशात पाहिलं आणि चेहरा धुवून काढला! तर ... असं दुधाळ पाणी!" :)

" पण कोडवा पद्धतीने साडी नेसल्यावर घुंगट कसा घेता येईल?" त्या पद्धतीत निर्‍या मागे असतात आणि पदर मागून पुढे घेऊन त्याला पिन लावून टाकतात.
" अगं , ओढणी असते ती वरून घेतात, साडीचा पदर नव्हे. आमच्यात नवरा मुलगा आणि मुलगी दोघांनांही ती पांघरतात. त्या उत्तरीयाचा रंग लालच असायला लागतो. मुलीची साडी पण लाल असावी लागते. हल्ली मुली केशरी किंवा मरून अशी घेतात, पण लालपैंकीच हवी.

"तुमच्यात लग्न कसं लागतं?"
रमेश पुढे सरसावला, म्हणाला, " लग्नाचे विधी असे काही नसतात. अग्निभोवती फेरे वगैरे काही नाही. जस्ट सेलिब्रेशन! मुला मुलीचे आईवडील ते साजरं करतात."
" हार वगैरे घालतात की नाही?"
" तेवढंच असतं. जेवण, खाणं /पिणं नाच!"
" लग्नगीतं असतात?"
" गाणी नाहीत, केवळ म्युझिक!"
" कसं नाचता?"
"बल्ले बल्ले स्टाईल! हात वर करून" उमा म्हणाली.
" मंगळसूत्राचं काही महत्त्व नाही. काही घातलं तरी ते आई घालते ना, दोघांची लग्नं तशी आपापल्या घरी, आपापल्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लागतात. म्हणजे माम्या, मावश्या, आत्या, काकू वगैरे मिळून आंघोळ घालतात. मग नवर्‍याकडचे नातेवाईक नवर्‍या मुलाला घेऊन मुलीकडे येतात. नवरा मुलगा म्हणतो, ’मला तुमच्या मुलीशी लग्न करयचयं.’ मुलीकडचे म्हणतात,’ आम्ही नाही देणार आमची मुलगी!" मग थोडावेळ गमतीशीर बोलाचाली होते, मुलीचं लग्न करायला तयार होतात. मुलीकडचे सांगतात, " केळी कापून आत या" अशी मोठमोठी केळीची खोडं असतात. कोयत्याने एका वारात ती कापायची असतात. थोडक्यात, मुलाकडच्यांनी आपलं शौर्य दाखवायचं असतं. मुलाकडचा कोणीतरी पुरूष हे करतो. मग दोघं एकमेकांना हार घालतात.
मुलाकडे आल्यावर मुलीने नारळ कोयत्याने फोडायचा असतो. "
" एका वारात?"
" पूर्वी यायचे मुलींना, हल्ली नाही. उमा वीस पंचवीसदा मारून फोडायचा प्रयत्न करत होती. :) "
तो पुढे सांगायला लागला, " नारळाचं पाणी विहिरीत घालतात मग त्या विहिरीतून कळशीभर पाणी काढून नवर्‍या मुलीने कळशी डोक्यावर घ्यायची. नाचत- गात- पीत ही वरात नवच्या घरी येते. एवढंसं अंतर कापायला तीन- चार तास लागतात. "
" मुलीची मान अवघडत असेल."
" हो. मुलीकडच्या स्त्रिया हात लावतात. कोणी घाई केली तरी तरूण मुलं ऎकत नाहीत, त्यांना नाचायचं असतं."
उमा म्हणाली, " अगं आमच्यावेळी पहाटेचे साडेचार वाजलेले. तेव्हा रूममधे जायचं आणि साडेसहाला बाहेर आलंच पाहिजे! :) "
नंतर मजा मजा चालते.
उमा म्हणाली, एका आत्याबाईने तिची पेटी उघडली आणि त्यातली एक एक वस्तू, साड्या उचलून सगळ्या बायकांना दाखवू लागली, सगळ्या नुसत्या हसत होत्या.

........ हे ऎकत असताना मला वाटून गेलं की कशा वेगवेगळ्या पद्धती असतात ना! जी त्याच सांस्कृतिक परिसरातील मुलगी असेल ती याची मजा घेऊ शकेल. पण समज कुणी पाश्चात्य मुलगी लग्न करून आली तर या प्रथेचा तिला किती धक्का बसेल! तिची बॅग, तिच्या स्वत:च्या वस्तू, कपडे सगळ्यांना दाखवण्यात, काय मजा आहे! तो तिचा अपमान आहे असं वाटेल तिला. काय मागासलेले लोक आहेत असं वाटेल... ........ काय बरं असेल या प्रथेमागे? रॅगिंग? .... मुलीला सामावून घेण्याचीच एक रांगडी पद्धत?..... आपण आपल्या सांस्कृतिक परीघाबाहेर पडून अशा गोष्टींकडे बघायला पाहिजे. आपल्या मोजपट्ट्या न वापरता.... एका अख्ख्या जमातीला बोल न लावता याकडे बघायला पाहिजे.... उमालाही ते नव्हतं आवडलेलं बहुदा, तिच्या सुरावरून, किंवा सुनांना अशी चेष्टा नसेलच आवडत.... ती शहरात, बंगलूरात जन्मलेली आणि वाढलेली मुलगी आहे. आपल्या सुनेच्या वेळी ती ही प्रथा बदलेल का? कोण जाणे. सांस्कृतिक अभिसरणात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टी प्रतिष्ठेच्या समजल्या जात असतात. काही वर्षांपासून.... तरी तीस- चाळीस, लग्नानंतर केक कापणे ही प्रथा त्यांच्यात सुरू झालेली आहे, पूर्वी ती नव्हती.

 अमेरिकेतल्या भटजी बोलावून अगदी मराठी पद्धतीने केलेल्या लग्नातही आता केक कापणे + किस हे वाढवलेलं आहे. संस्कृतींच्या सीमारेषेवर हे बदल होत असतात.

उमाच्या मुलाचं लवकरच लग्न आहे. लग्न होईपर्यंत तिने गोड खाणं सोडलंय. असं असतं का त्यांच्याकडे? कोण जाणे.
मुलाने स्वत:च लग्न ठरवलंय, सून मल्याळी आहे.
तिचा फोटॊ दाखवला, तिला केलेले दागिने घातलेला फोटो होता.
म्हणाली, " आमच्या इकडच्या बायका म्हणाल्या की दागिने निवडायला सुनेला कशाला न्यायचं? आपल्याला आवडतील ते करायचे. मी तसं केलं नाही. आपले दागिने तिला आवडले नाहीत तर ती घालणार नाही, तसेच ठेवेल आणि मी गेले की विकून टाकेल, त्यापेक्षा तिच्या पसंतीने घेतलेले चांगले, ती वापरेल. मला मुलगी नाही, ती माझ्या मुलीसारखी रा्हील."

 तिच्या घराच्या खालच्या बाजूला तिचे सासूसासरे राहतात. त्यांचं घर काहीच्या काही सुंदर आहे. उमा म्हणाली की त्या घराचं खरं सौंदर्य म्हणजे माझी सासू आहे. ८६ वर्षांची आहे, कायम व्यवस्थित असते, एखाद्या राणीसारखी राहते. कूर्ग पद्धतीची साडी नेसते, (उमा कायम पाश्चात्य पेहरावत असते.) तिची स्किन बघ तू, कशी ठेवलीये. अगदी ताठ चालते. स्वत:च्या आणि नवर्‍याच्या आरोग्याची खूप काळजी घेते. तिला अजूनही तिचं वय कुणाला कळू द्यायचं नसतं. :)
 सासूबाईंना भेटायचं राहूनच गेलं.

 रमेश आधी टाटा टी त होता. मग त्याने बंगलुरूला व्यवसाय सुरू केलेला. दहा वर्षांपूर्वी तिचे दीर अचानक वारले. मग सासूसासर्‍यांकडे बघायला कोणी नव्हतं. दर आठवड्याला रमेश बंगलुरूहून यायचा. वर्षभर त्याने असं केलं.
 उमा सांगत होती, " एके दिवशी एकदम रमेश म्हणाला की आपण कोडगूत आपल्या खेड्यात राहायला जातोय. माझ्यासाठी तर धरणीकंप झाला. एका बाईचं विश्व कुठलं असतं? तिचं घर, तिचा नवरा, तिची मुलं. बायकांना कसं पुढचं दिसत असतं ना? मला माझं घर विखुरलेलं दिसायला लागलं. मोठा मुलगा तेव्हा मॉडेलिंग करायचा, मला त्याला एकट्याला त्या क्षेत्रात सोडणं रिस्की वाटत होतं. धाकट्याची दहावी झालेली, त्याच्याकडे बारावीपर्यंत तरी पाहायला हवं होतं. मी रमेशला म्हणाले की मला दोन वर्ष दे, मी मुलांपाशी राहते. दोन वर्षे मी इथे जाऊन येऊन होते. रमेशने त्याचं काम सुरू केलं. मी इथे येऊन आचारी शोधून त्याला सगळं शिकवलं, इथलं बस्तान बसवून दिलं. इथल्या आजूबाजूच्या बायका म्हणायच्या ’तू तर नवर्‍याला इथे ठेवून बंगलुरात मजा करते आहेस.’ मजा? मी घर सांभाळत होते, पोरं सांभाळत होते, धाकटा चांगला हुशार पण खेळात मग्न, त्याच्या ताणात होते. मग एकदा मी एकीला म्हणाले तू पण एकटी बंगलूरात ये आणि मजा कर.
धाकटा मेडीकलला लागला. मग तो हॉस्टेलला गेला. मोठ्याने त्याची कंपनी सुरू केली( कदाचित रमेशची चालवायला घेतली.) मी इथे राहायला आले."
" इथे, या खेड्यात राहायचं कसं जमवतेस?"
" हं. जमवते. दर दोन महिन्यांनी बंगलुरला जाते. एक दिवस खरंच मजा करते. आम्ही सगळ्या मैत्रिणी भेटतो. दुपारी बाराला जेवायला जमतो. बाहेर जेवतो. मग क्लबात जातो आणि सात वाजेपर्यंत गप्पा गप्पा गप्पा! कुणाचं काय चाललंय?, हिच्या तिच्या सासूची गार्‍हाणी, नवर्‍याची गार्‍हाणी, मजा येते."
 उमा सुगरण आहे. खास कोडवा (कूर्ग) पद्धतीचं अप्रतिम जेवण तिने आम्हांला खिलवलं.
शेवटच्या दिवशी रात्री तिच्याकडून पाककृती उतरवून घेतल्या.

तिने खास कोडवा पद्धतीचा जॅम दिला, शिवाय मिरे, घरचे पेरू... आई गं! निरोप घेतला, पुन्हा येईन म्हणाले.
दुसर्‍या दिवशी पहाटे साडेचारला निघणार होतो, आम्हांला वाटले हाच निरोप!
पण नाही.
सकाळी साडेचारला केवळ आम्हांला निरोप द्यायला दोघेही उठले होते.
उमाने मिठी मारली आणि आता खरंच निरोप घेतला.
या चार दिवसांत मी काही कोडवा शब्द शिकले आणि ती काही मराठी शब्द शिकली.
बारी चाय्याची -- छान वाटलं....

पुन्हा येईन.... नान पुना बप्पी!


.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...