Wednesday, February 29, 2012

इभ्रत-खून ( Honor killing)


औंध येथे आशा शिंदे या तरूणीची तिच्या वडीलांनी लोखंडी कांबीने मारून हत्या केली. ती वडीलांनी आणलेल्या मुलांना नाकारत होती, तिला तिच्या पसंतीच्या परजातीतल्या मुलाशी लग्न करायचे होते. मुलीची हत्या केल्यावर वडिल स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले, त्यांना केल्या कृत्याचा पश्चाताप होत नव्हता.
**********

ही बातमी आपल्याला भयंकर वाटते कारण जीवन अमूल्य आहे आणि कुणालाही स्वत:ची किंवा दुसर्‍या कुणाची हत्या करायचा अधिकार नाही, यावर आपला विश्वास आहे.

********

 आपल्या समाजात आजूबाजूला हे काय घडतं आहे? यापूर्वी अशा बातम्या हरीयाणा, पंजाबातून यायच्या. एका बापाने प्रत्यक्षात केलं म्हणजे कितीतरी बापांच्या सूप्तपणे हे मनात आहे.
 हा केवळ जातिव्यवस्थेचा पगडा नाही, त्यासंबंधी तर आपण वाचतोच कुठे, कुठे,
समाजातली सगळीचं माणसं जातीचं, धर्माचं, वर्णाचं, वंशश्रेष्ठत्वाचं, खोट्या प्रतिष्ठेचं.... कसलं कसलं ओझं घेऊन जगत असतात!
आपल्याला विचारांचं स्वातंत्र्य हवं आहे.
इथे खून करणारा एकटा बाप दोषी नाही. त्याच्या मुलीने परजातीत लग्न केले तर त्याला समाजाच्या चौकटीत प्रतिष्ठितपणे जगू न देणारा आजूबाजूचा समाजही दोषी आहे.
 मुलीला, क्वचित प्रसंगी मुलालाही अशा प्रकारे मारलं जातं.
 आपल्या मर्जीने लग्न करू इच्छिणं/करणं हा इथे "जगणं नाकारणारा" गुन्हा ठरू शकतो.
पुरूषसत्ताक पद्धतीतल्या उतरंडीत, पुरूष असोत की बायका, निव्वळ प्यादी असतात. जंगलचा कायदा आणि चौकटीबाहेर गेलं की गोळी!
आतमधे खोलवर हे सगळं नासलेलं आहे, या लढाया विचारांनी लढायला हव्या आहेत. आजूबाजूला चार गुण्यागोविंदाने जगणारी आंतरजातीय लग्नं दिसली असती तर कदाचित हे पाऊल उचललं गेलं नसतं.
या हत्येने आपल्या आवडणार्‍या मुलाशी/मुलीशी लग्न करू इच्छिणार्‍या भवतालच्या शंभरेक मुलामुलींची भावविश्वे उध्वस्त झाली असतील.
उद्या नावडत्या माणसाशी लग्न करून त्यांची कलेवरे जगत राहतील.

************

 कुटूंब / घर ही सुरक्षित जागा आहे, अशा सार्वत्रिक समजाला छेद देणार्‍या ज्या अनेक हिंसाचाराच्या घटना घडत असतात त्यातली ही अत्यंत दु:खदायक घटना आहे.
 मुलीला स्वत:ला आवडलेल्या मुलाशी लग्न करायचा अधिकार नाही, आपलं शरीर वापरायचा अधिकार नाही, तिला स्वत:चं मूल स्वत:च्या मर्जीने जन्माला घालायचा अधिकार नाही, कुठल्या पुरूषाचं मूल वाढवायचं आहे, हे ठरवण्याचा अधिकार नाही. तिच्या पावित्र्याची चिकित्सा करायला पावलोपावली लोक बसले आहेत.
 पोस्टमार्टेम नंतर ती दोन महिन्यांची गर्भवती होती असे जाहीर केले गेल्यावर, लोकांनी तरीच वगैरे प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली....

**********

यातला महत्त्वाचा धागा मला वाटतो तो असा की आईवडीलांचा आपली मुलं ही आपल्या मालकीची आहेत असाच समज असतो.
आपलं आपल्या मुलांवर विनाअट प्रेम नसतंच. ती स्वतंत्र आहेत, त्यांच्या मर्जीने जगू देत ना, त्यांना! चुकू देत, शिकू देत.

 खलील जिब्रानचं एक काव्य आहे, "तुमची मुलं तुमची नसतात "
Your children are not your children.
They are the sons and daughters of Life's longing for itself.
They come through you but not from you,
And though they are with you yet they belong not to you.

You may give them your love but not your thoughts,
For they have their own thoughts.
You may house their bodies but not their souls,
For their souls dwell in the house of tomorrow,
which you cannot visit, not even in your dreams.
You may strive to be like them,
but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with yesterday.

You are the bows from which your children
as living arrows are sent forth.
The archer sees the mark upon the path of the infinite,
and He bends you with His might
that His arrows may go swift and far.
Let our bending in the archer's hand be for gladness;
For even as He loves the arrow that flies,
so He loves also the bow that is stable.

********

Saturday, February 11, 2012

वारीस, एफजीएम आणि आपण -- २


 जहाल स्त्रीवाद्यांची भूमिका टोकाची आहे असं मला वाटतं, अजूनही वाटतं. वारीसची गोष्ट वाचल्यावर पहिल्यांदा मला ती कळू शकली. पुरूष विविध मार्गांनी स्त्रीवर सत्ता प्रस्थापित करतात. हिंसा, ताकद वापरून किंवा प्रेम वापरून. त्यातल्या काहींनी म्हंटलं आम्हांला पुरूषांशी संबंधच नकोत. आमच्या लैंगिक गरजा देखिल आम्ही आपसात भागवू, आम्ही निसर्गाविरूद्ध जावू. वंशसातत्याचं हत्यार कुणी आमच्याविरूद्ध वापरू नये, आम्ही प्रयोगशाळांमधे मुलं तयार करू, थोडे शुक्राणू साठवून ठेवले की झालं! पण या पुरूषांशी आम्हांला कुठल्याही प्रकारचे संबंधच नकोत.
 खरं आहे. शोषणाच्या अशा प्रथा अस्तित्वात असतील तर कुणीतरी अशी टोकाची भूमिका घ्यायला हवीच होती.
..........

 पुरूष ही जमात कायम घाबरतच आली आहे स्त्रिला, तिच्यातल्या नवनिर्मितीच्या क्षमतेला..... स्त्रियांना घाबरून आधीच आपली बाजू सावरण्याचे हे प्रयत्न आहेत. यावरून असं दिसतंय की स्त्रियांच्या लैंगिक क्षमतेलाही पुरूष घाबरताहेत. स्त्री हवी तर आहे, विशेषत: तिचं गर्भाशय हवंच आहे. ते तेव्हढं वापरून घेऊ. आपल्या शरीरसुखासाठी ती आहे, तिला आपण सुखी करू शकू याची खात्री नाही. म्हणून तिच्या अपेक्षाच कापून काढायच्या! कसला न्याय आहे!

  पुरूषांना कधी कळलाच नाही, बायकी समजल्या जाणार्‍या भावनांमधील आनंद! देण्यातला आनंद! त्यांची कीव येते, त्यांना युद्धाचीच भाषा कळते, त्यांच्यासाठी प्रेम, सुख या देखिल जिंकायच्या गोष्टी आहेत! सहकार्य, दुसर्‍याचा आनंद त्यांना कुणी शिकवलाच नाही, ते लढतच असतात मग ते युद्धभूमीवर असोत की शय्यागृहात असोत! बिच्चारे!
 समाजपद्धतीत पुरूषांना वाढवण्यातल्या या चुका आहेत.

 लग्नाच्या पारंपारीक नात्यात दोघांनी एका पातळीवर असण्यातला, मैत्रीतला, चुकतमाकत शिकण्यातला, एकमेकांबद्दलचा आदर आणि एकमेकांचं स्वातंत्र्य जपण्यातला, एकमेकांचं शरीरसुख शोधण्यातला, आनंद जर कळू शकला तर पुरूषही युद्धाचे पवित्रे सोडून देतील.

******

Tuesday, January 31, 2012

वारीस, एफजीएम आणि आपण -- १

मागासलेल्या आफ्रिकी जमातींमधे अशी समजूत आहे की जर मुलींची नीट लग्ने व्हायला हवी असतील तर त्यांची सुंता केलीच पाहिजे. मुलगी वयात येण्यापूर्वीच लग्न व्हायला हवे. सुंता न केलेल्या मुलीशी कोण लग्न करणार? विवाहाविना राहणारी स्त्री म्हणजे चेटकीण. तिला हालहाल करून, दगडांनी ठेचून वा जिवंत जाळून मारलं जायचं. स्त्री म्हणजे पापाचं आगार. तिच्या दोन मांड्यांमधे दडलेला योनिमार्ग म्हणजे नरकाचं प्रवेशद्वार, त्या दाराची योग्य साफसफाई, योग्य वयात केली तरच ती पापमुक्त होऊन विवाहास योग्य ठरते.  मुलीची सुंता करण्याचं काम पुरूषांना ठाऊक असलं तरी ते त्यांच्या नजरेआड करणं आवश्यक असतं. ही साफसफाई अत्यंत गुप्त रितीने पार पाडण्यात येते.
  या प्रथेला कुराणातून किंवा कुठल्याही धार्मिक ग्रंथातून अधिकृतता मिळालेली नाही. पण वर्षानुवर्षे ही प्रथा चालू आहे. वारीसने ही जगासमोर आणली. 
 भयंकर आहे! 
 भारतात ही प्रथा अस्तित्वात नाही म्हंटलं तरी चालेल,  बोहरी मुस्लिम समाजात अल्प प्रमाणात मुलींची सुंता करतात.

पण हे नसलं तरी अमानुष प्रथांच्या बाबतीत भारत मागे नाही. कधीकाळी, थोडक्या समाजासाठी का असेना , सतीप्रथा अस्तित्वात होतीच ना! आपणही नवर्‍याच्या माघारी बाईचं जगणंच नाकारत होतो! 

अश्विनी आणि दीपाने लिहिलंय ते खरंच आहे. पुरूष सुखी -- जग सुखी.....  कसं नां?  ..... मुलींना वाढवलं जातं तेच त्यांचं शरीर हे कुणा पुरूषासाठी आहे, हे बिंबवत. असं थेट कुणी सांगत नाही, पण तसंच असतं ते! मुलींचं दिसणं, तिचं शरीर, तिचं नटणं, तिचे कपडे, तिचं वावरणं हे कुणा एका पुरूषासाठी आहे, इतरांपासून तिने सावध राहायचं आहे. 
  आपण मुलींना हे कधी शिकवणार? तुझ्या आयुष्याची तू मालकीण आहेस. तू स्वत:साठी जग. 
 स्त्री जर स्वत:च्या शरीरसुखाचा विचार करायला लागली तर ती वेश्या. बायको ही केवळ मुले जन्माला घालण्यासाठीच! वेश्येला घर आणि गृहिणीला शृंगार नाकारलेलाच होता! 
 सगळ्या प्रकारच्या पुरूषांसाठी वेश्या कायमच उपलब्ध होत्या. समाजाचा हिस्सा होत्या. 
 बायका स्वत:च्या सुखाचा विचार करायला लागल्यावर पुरूषवेश्या अधिकृतपणे अस्तित्वात आले असावेत!
सैनिकांच्या सोयीसाठी वेश्या पुरवल्या जाण्याचे पुरावे इतिहासातही दिसतात पण त्यांच्या घरी राहिलेल्या बायकांनी काय करायचे? तर चॅस्टीटी बेल्ट! 
********

Sunday, January 15, 2012

वारीस आणि एफजीएम -- २


वारीसने मोठमोठ्या कंपन्यांसाठी मॉडेलिंग केलं. लवकरच तिने न्यूयॉर्क, पॅरीस, रोम, व्हेनिस उथे घरे घेतली, कितीक नव्या बनावटीच्या गाड्या घेतल्या, फ्रान्सच्या अध्यक्षांना, इंग्लंडच्या राणीला , अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखांना तिला भॆटायचं होतं.
 सगळ्या जगाला तिच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. वेगवेगळ्या वृत्तपत्रांना, मासिकांना, चॅनेल्सना तिच्या मुलाखती हव्या होत्या.
............................
एका आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मासिकाला मुलाखत देताना तिने तिची व्यथा सांगितली.......
 वारीस पाच वर्षाची झाल्यावर एके दिवशी तिची आई तिला जिप्सी लोकांच्या तळावर घेऊन गेली. तिथे तिला एका दगडावर झोपवण्यात आलं, तिचे हातपाय बाजूच्या चार दगडांना बांधले, तिला काही कळेना, एक धिप्पाड जिप्सी बाई अर्धवट तुटलेला वस्तरा घेऊन आली, आधी ती त्या वस्तर्‍यावर थुंकली आणि पूर्वी पडलेल्या रक्ताचे ओघळ साफ केले. वारीसच्या डोळ्यांना पट्टी बांधण्यात आली, ...... त्या बाईने तिचे ठरलेले काम केले, वारीसची सुंता केली. वेदनांचा आगडोंब उसळला... वारीसची शुद्ध हरपली, त्यानंतर त्या बाईने काट्याने भोकं पाडली, दोर्‍याने खालचा भाग शिवून टाकला, लघवी बाहेर पडण्यापुरती जागा ठेवली.
  नंतर अनेक दिवस वारीस तिथेच जिप्सींच्या तळावर पडून होती. जंतूंची विषबाधा झाली होती. तीस-पस्तीस टक्कॆ मुली या काळात सेप्टीकने मरून जातात. ज्यांच्या अंगात प्रखर प्रतिकारशक्ती असते त्या वाचतात. वारीस वाचली.
 आफ्रिकेतल्या अनेक देशांप्रमाणे सोमालियातही ’फिमेल जेनायटल म्युटिलेशन - एफजीएमची ’ प्रथा आहे.
स्त्रीच्या योनीमार्गात क्लायटॉरीस नावाची सूक्ष्म मज्जातंतूंची जाळी असते. ती संवेदनशील असते. कामतृप्ती, संभोगसुखाचा आनंद तिला यामुळे मिळतो. स्त्रीची सुंता करताना ही क्लायटॉरीस कापून काढतात. आणि बाहेरचे लेबिया मेजोरा शिवून टाकतात जेणेकरून तिला हा आनंद मिळू नये.
 वारीसच्या बाबतीत फारच वाईट परीस्थिती होती. त्या जिप्सी बाईनं वारीसचा योनिमार्ग जवळजवळ शिवूनच टाकला होता, केवळ काड्यापेटीतील काडीचं टोक जाईल इतपतच छिद्र ठेवलं होतं. मासिक पाळीच्या काळात रक्तस्त्राव नीट बाहेर येऊ शकायचा नाही. तिला इन्फेक्शनचा त्रास होई. तिच्या पोटात प्रचंड दुखत असे, कळा येत, लघवी करताना, आग जळजळ व्हायची...... असा असह्य त्रास ती काही वर्षे सहन करत होती, वेदनाशामक गोळ्या घ्यायच्या आणि कामाला लागायचं असं तिचं असे. मावशी डॉक्टरकडे जाऊ द्यायची नाही, ”तिथे जाऊन आपली बेअब्रू करून घ्यायची का?” ती म्हणे.
  लंडनमधे एकटी राहात असताना वारीसने डॉक्टरांना दाखवून शस्त्रक्रिया करून घेतली. त्यामुळे तिच्या वेदना थांबल्या. आता तिला मुले होऊ शकणार होती पण संभोगसुखाचा आनंद ती कधीही मिळवू शकणार नव्हती. तिच्याकडे प्रसिद्धी, पैसा, वैभव सारं होतं...... माणूस म्हणून जो आनंद मिळवायचा तिला हक्क होता, तो मात्र तिच्यापासून हिरावून घेतला गेला होता.
  तिच्या एकटीपासून नव्हे जगातल्या हजारो, लाखो स्त्रियांपासून...

 या मुलाखतीनंतर एक वादळ उठलं.
वारीसनं या अन्यायकारक दुर्दैवी प्रथेला वाचा फोडली.  याचं अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना कौतुक वाटलं, गावोगावी वारीस फॅन क्लब स्थापन झाले, टाईम मासिकाने मुखपृष्ठावर तिचं छायाचित्र टाकून, जगावर प्रभाव टाकणारी व्यक्ती म्हणून तिची मुलाखत प्रसिद्ध केली. युनोनं या प्रथेला आळा घालण्यासाठी जनजागरण मोहिम हाती घेतली, याच्या नेतृत्वाचा मान वारीसला देण्यात आला. बीबीसीच्या चॅनेल फोरने वारीसवर लघुपट तयार करायचा ठरवलं, हवं तितकं मानधन देण्याची तयारी दर्शविली. वारीसने ते अफाट मानधन युनोच्या एफजीएम प्रतिरोधक समितीला दान करून टाकलं.
 वारीस म्हणजे वाळवंटातलं फूल, तिने स्वत:च्या आत्मचरित्राला तेच नाव दिलं ’डेझर्ट फ्लॉवर’
त्यावर नुकताच गेल्यावर्षी एक चित्रपट निघाला आहे.

********


********

(संदर्भासाठी डॉ. श्रीकांत मुंदरगी यांच्या ’वाळूत उमललेलं फूल’ या चंद्रकांत दिवाळी अंकातील लेखाचा उपयोग झाला आहे. )

*****

Saturday, December 31, 2011

वारीस आणि एफजीएम -- १


पिरेल्लीची कॅलेंडर्स जगतविख्यात आहेत. या कॅलेंडर्सवर सुपरमॉडेल्स आणि सुपरस्टार्स झळकतात. त्यांनाही या कॅलेंडरवर आपली छबी झळकणं म्हणजे आपला बहुमान आहे असं वाटत असतं. पिरेल्ली च्या मोजक्या १५ - २० हजार प्रती काढल्या जातात. त्या विक्रीसाठी ठेवल्या जात नाहीत. पिरेल्लीची बडी गिर्‍हाईकं आणि जगातल्या काही नामांकीत व्यक्तींनाच ती भेट म्हणून दिली जातात. ऑस्करच्या कार्यालयात, युनोत, बिल गेटस च्या कार्यालयात किंवा मुकेश अंबानीच्या कार्यालयात .... ही झळकलेली दिसतात.
 १९८७ मधे पिरेल्ली कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर छापलं गेलेलं जिचं छायाचित्र होतं. ती होती.... वारीस डियरी! हा फॅशन जगतातला सर्वोच्च बहुमान समजला जातो. तोवर वारीस ही फॅशन विश्वाला अज्ञात असलेली तरूणी होती.
  काय आहे तिची कहाणी? ती इथवर कशी पोचली?
 वारीस सोमालियातल्या एका खेड्यात जन्मली आणि वाढली. सोमालिया दुष्काळग्रस्त आणि कुपोषित. तिही एका खायप्यायची वानवा असलेल्या घरात जन्मली. सोमालियात घरगृहस्थी चालवतात स्त्रिया, पुरूष कधीतरी शिकार करतात आणि ऎरवी दारू पिऊन पडून राहतात. पण घरावर अधिकार असतो अर्थातच पुरूषांचा!
 थोडसं कळू लागल्यावर वारीस शेळ्या राखण्यासाठी जाऊ लागली. दिवसा तापलेल्या वाळूतून ती वणवण फिरायची रात्र होताच कडाक्याची थंडी पडायची, उशीरा ती घरी परते. अनेकदा अर्धपोटी राहावं लागायचं तर कधी कधी दोन दोन दिवस उपास घडे. तिथे कुणाला शाळेचं नावदेखिल माहीत नाही. या काळात निसर्गच तिचा सखासोबती होता. प्राण्यांसारखं तिही पाणी दिसताच पिऊन घ्यायची.
 दिवस असे जात होते, ती मोठी होत होती.... एक दिवस तिच्या बापाने तिच्यासाठी एका म्हातार्‍याचं स्थळ आणलं. वारीसचं रूप पाहून म्हातार्‍याने तिला मागणी घातली होती, त्याबदल्यात तो तिच्या बापाला पाच उंट आणि पंचवीस शेळ्या देणार होता. वारीस आईजवळ रडली, म्हणाली यापेक्षा तू मला मारून का टाकत नाहीस?
 मध्यरात्री आईने वारीसला हळूच उठवले आणि म्हणाली, " सूर्य उगवतो त्या दिशेने पळत जा. तिकडे मोगादिशू आहे, कदाचित तिथे तुझी बहीण भेटेल. आता पळ... तू आणि तुझं नशीब."  वारीस जिवाच्या आकांतानं पळात राहिली, काही वेळाने पाहिलं तर बाप मागून येत होता... तिला त्याच्यापेक्षा जास्त वाळवंटाची सवय होती... केंव्हातरी बाप थकला थांबला..... चारपाच दिवसांनी ती एका सडकेपाशी पोचली. मग बसवाल्याच्या कृपेने मोगादिशूला... मोगादिशू सोमालियाची राजधानी आहे...... काही दिवसांनी अचानक तिला तिची बहीण अमन भेटली.... मग तिच्याकडे राहिली..... अमनही तिच्याकडून भरपूर कष्ट करवून घेत असे..... मग मावशीकडे गेली.... योगायोगाने एका मावशीचा नवरा राजदूत होता .... मग घरकामात मगत करायला म्हणून त्यांच्याबरोबर लंडनला आली..... त्यांच्याकडे मोलकरीण म्हणूनच राहिली..... तीन वर्षांनी ते कुटूंब सोमालियात परत जाताना त्यांच्याबरोबर परत गेली नाही. लंडनमधेच कुठे कुठे कामे शोधत राहिली.
 तिचं रूप आणि बांधा कुणाच्याही नजरेत भरेल असाच होता. एका फोटोग्राफरने तिचे फोटो काढले पण बदल्यात काहीही पैसे दिले नाहीत. तिला धड इंग्लिश बोलता यायचं नाही. कुठूनतरी तोडकं मोडकं शिकली. ती मॅकडोनाल्डस मधे बशा धुवायचं, फरशा आणि भिंती धुवायचं काम करत होती. तेव्हा तिला डोनोव्हान या फोटोग्राफरचा फोटो काढायला ये म्हणून निरोप मिळाला. जावं की नाही , ती विचार करत होती. जाऊन तर पाहू, असे ठरवून गेली.
  टेरेस डोनोव्हान जागतीक किर्तीचा छायाचित्रकार होता. त्याने तिला ठरलेले हजार पौंड दिले आणि तिचे फोटो काढले. त्यावर्षी पिरेल्लीची थीम होती, ’ब्लॅक ब्युटी’ आफ्रिकन तरूणींचे फोटो कॅलेंडरवर झळकणार होते. .......... आणि मुखपृष्ठासाठी वारीसच्या छायाचित्राची निवड झाली!
....................................................................................................
वारीस अक्षरश: खोर्‍याने पैसे कमवू लागली..... काही दिवसांतच तिने मर्सिडीज घेतली, लंडनमधल्या उच्चभ्रू भागात एक बंगला घेतला.......
......................................................
 सारेच कसे अविश्वसनीय!

इथून पुढे एखाद्या राजकन्येसारखी वारीसची गोष्ट गेली असती....... पण तिच्या भूतकाळात आणखी काही दडलेले होते!
खरंतर राजकन्येला अप्राप्य ते काय असणार?

(संदर्भासाठी डॉ. श्रीकांत मुंदरगी यांच्या ’वाळूत उमललेलं फूल’ या चंद्रकांत दिवाळी अंकातील लेखाचा उपयोग झाला आहे. )


.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...