Wednesday, June 25, 2014

आजी

आजी,
गेले दोन दिवस मी तुझं लिखाण वाचते आहे. तू लिहिलेला चारपाचशे पानांचा गठ्ठा तू गेल्यावर मी माझ्याकडे घेऊन आले. अधेमधे, थोडंथोडं वाचत होते. या दोनतीन दिवसात मात्र ते बरंचसं वाचून काढलं. या तुझ्या लिखाणावरची सर्वात आधीची तारीख २००५ सालातली दिसते आहे. शेवटच्या दोनतीन वर्षात एवढं सगळं लिहिलंयस. तुझं बारीक बारीक अक्षर, लिहिताना कागदावरच्या जागेचा पुरेपूर उपयोग करुन घेण्याची तुझी सवय हे सगळं माझ्या खूप खूप ओळखीचं आहे. वाचतानाही हे सगळं तुझ्या आवाजातच माझ्यापर्यंत पोचतं आहे. अगदी तुझ्या हावभावांसहित. तुझ्या बालपणीच्या, शाळेच्या, लग्नाच्या, वाफेगावच्या लोकांच्या, एवढंच नाही तर तुझ्यापर्यंत कुणाकुणाकडून तुझ्यापर्यंत पोचलेल्या तुझ्या जन्माआधीच्याही गोष्टी यात  आहेत. शंभरेक वर्षांचा कालपट माझ्यासमोर तुकड्यातुकड्याने उलगडतो आहे.
शाळकरी वयातली तू! आई-वडील, काका-काकू, आजी, सोवळी जिजाआत्या, भावंडं, चुलत भावंडं असं मोठं कुटुंब. तुझी आजी म्हणजे घरातलं सर्वात महत्वाचं माणूस. तिची नातवंडांवरची माया, पण त्याचवेळी ती तुझ्या आईला करीत असलेला सासुरवास, तुझी काकू आणि आई यांच्यात ती करत असलेला भेदभाव, तुझ्या आजोळच्या- ग्वाल्हेर, ब्रह्मावर्ताच्या- गोष्टी... आणि तुझ्या सख्ख्या मैत्रिणीबरोबरच्या- शरयू (बावडेकरच ना गं? आपण एकदा गेलो होतो त्यांच्याकडे) बरोबरच्या आठवणी वाचताना तर पाणीच आलं डोळ्यातून. तुम्ही शाळेच्या वाटेवरच्या कबरस्तानातून चिंचा गोळा करयचात आणि मारुतीच्या देवळात बसून खायचात :) भांडणं झाली की तू छोट्या माईच्या हाती शरयूला पाटीवर चिठ्ठी पाठवायचीस आणि तुमची भांडणं मिटवायचीस :) शाळेत जायच्या वाटेवर एकदा तू तुला त्रास देणार्‍या एका मुलाला बेदम मारलं होतंस. हे गुपित फक्त शरयूलाच सांगितलंस कारण घरी सांगितलं तर शाळाच बंद होण्याची धास्ती! तू शाळेत अगदी हुशार विद्यार्थिनी होतीस. सगळ्या विषयात पहिली येऊन महिन्याला बारा आणे शिष्यवृत्ती मिळवणारी! तुला खूप शिकायचं होतं. डॉक्टर व्हायचं होतं. तुझे काका सोलापुरातले सुविख्यात सर्जन. त्यांचा तुला पाठिंबा होता. त्यामुळेच तुला हायस्कूलचे शिक्षण घेता आले. तू तिथल्या सेवासदनात शिकत होतीस. घरी मात्र तुझ्या लग्नाचं बघत होते. तुझ्या आजीची शेवटची इच्छाच मुळी ’सुमतीचं लग्न वर्षाच्या आत करा’ अशी. त्यापुढे काकांचंही काही चाललं नाही. तुला शिकता आलं असतं तर तू सहजच डॉक्टर होऊ शकली असतीस. ती खंत तू तुझ्या संसाराच्या रामरगाड्यातून वेळ काढून होमिओपॅथीचा कोर्स करून पूर्ण केलीस का? बारा बाळंतपणं, आठ मुलं, त्यांची शिक्षणं, लग्नं, दुखणीखुपणी, पै-पाहुणे, दिरांच्या संसारांच्या जबाबदार्‍या, या सगळ्यातून वेळ काढलास तरी कधी? वाफेगावातले लोक किती विश्वासाने तुझ्याकडून औषध घेऊन जायचे. घरच्या गुरांच्या आजारपणात गुरांचे डॉक्टर वाफेगावला येऊ शकले नाहीत तेव्हा गुरांनाही होमिओपॅथीच्या गोळ्यांचा मोठा डोस देऊन बरं करणं म्हणजे मात्र कमाल होती हं :)
तू लिहिलंयस, ’आपल्याला शिकता आलं नाही तर किमान नवरा तरी खूप शिकलेला हवा, आपल्याला पडलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यानं पाच मिंटात द्यावं असं वाटायचं. पण तेही नाही घडलं.’ पण पुण्यात रहाता यावं ही इच्छा मात्र पूर्ण झाली.  (आजी पुण्यातून प्रसिद्ध होणारं ’आनंद’ मासिक वाचायची. त्यात येणार्‍या पुण्याच्या, तिथल्या सांस्कृतिक वातावरणाच्या माहितीमुळे तिची इच्छा होती की लग्नानंतर पुण्यात रहायला मिळावं)
माहेरी लाडाकोडात वाढलेली, खूप शिकायचं स्वप्न बघणारी तू, शिक्षण अर्धवट टाकून वाफेगावसारख्या आडगावी, भल्या थोरल्या वाड्यात, दुसरेपणाची बायको म्हणून आलीस तेव्हा काय वाटलं असेल तुला? लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी, सगळ्या बायका आपापल्या नवर्‍याच्या उष्ट्या ताटात जेवताहेत हे पाहिल्यावर दुसर्‍या दिवसापासून तू पुरुषांची जेवणं झाल्याबरोब्बर चपळाईने सगळ्यांची ताटं घासून टाकलीस आणि पुन्हा कधीही नवर्‍याच्या उष्ट्या ताटात जेवली नाहीस. मला तो प्रसंग वाचताना हसू आलं, पण खरंच, तुझ्यासारख्या बायकांसाठी किती कसरतीचं होतं ना त्या काळात स्वाभिमानाने जगणं? आजोबा सरळमार्गी, समजुतदार, भले होते, ही एक मोठीच जमेची बाब. नाहीतर तिथेही तुला लढत राहावं लागलं असतं. त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने तुम्ही कुठेकुठे फिरलात आणि मग पुण्यात येऊन स्थिरावलात. तुझं ’आनंद’ मासिकातलं पुणं तुला मिळालं. छान वाटलं असेल ना तेव्हा? पुण्यात मुला-मुलींची शिक्षणं होऊन थोडी स्थिरता आल्यावर तुम्ही दोघांनी परत वाफेगावचं घर उघडलंत. पुढे कधीतरी बाबा तिथे आले, मग लग्नानंतर आई, मग मी, अभिजीत. माझी शाळा सुरु होईपर्यंतचा वाफेगावातला काळ अगदी धूसर आठवतो मला. पुढे आम्ही पंढरपूरला गेलो आणि मग वाफेगाव सुट्ट्यांपुरतं राहिलं. त्या घरातली तू जेव्हा डोळ्यासमोर येतेस, तेव्हा कधी चुलीवर दूध आटवत असतेस, म्हशीचं आंबोण करत असतेस, नऊवारी साडीच्या निर्‍या करुन ती गोलगोल फिरवून, तिची गाठ मारत असतेस, संध्याकाळी ओटीवर बसून सातच्या बातम्या ऐकत असतेस, मथणीपाशी उभं राहून ताक करत असतेस, आणि खूपदा रात्रीच्या वेळी उशाला बारीक कंदील ठेवून वाचता वाचता झोपी गेलेली असतेस. तुला कधी पोथ्या पुराणं वाचताना पाहिलं नाही. पण रोजच्या जगण्याशी जोडून घेणारं सगळं तुला वाचायला आवडायचं. वाफेगावच्या घरात दिवाळी अंकांच्या, मासिकांच्या, पुस्तकांच्या थप्प्याच असायच्या. रिकामा वेळ मिळाला की तू वाचत असायचीस. तुला कमी झोप पुरायची. मग रात्री जेव्हा कधी जाग यायची तेव्हा उशाला ठेवलेला कंदील मोठा करून तू वाचत बसायचीस. पुस्तकांएवढीच तुला माणसंही हवीशी असायची. वाफेगावच्या घरात सतत माणसांचा राबता असे. शेतातल्या कामांच्या, गाईगुरांच्या निमित्ताने कोणी येत, कोणी ताक, कोरड्यास मागायला येत, कोणाला औषध हवं असे, कोणी उगाचच टाईमपासला येत. तुझी तासातासाला चहाची फेरी व्हायची. जरा थांबलं की एखादा कपभर च्या त्यांनाही मिळे. रात्रीच्या वेळी तर झोपायला येणार्‍या मंडळींनी ओसरी भरून जाई.
मला तू सांगायचीस त्या गोष्टी आठवतात. तुझ्या गोष्टी म्हणजे बाबा-काका-आत्यांच्या लहानपणाचे मजेमजेचे प्रसंग, तुमच्या पुण्यातल्या घरी येणारे सगळे विचित्र पाहुणे, त्यांना तुम्ही ठेवलेली गंमतीदार नावं, चाळीतल्या गमती, तुझ्या लहानपणच्या आठवणी. ते सगळे प्रसंग पण तू केवढी खुलवून खुलवून सांगायचीस. पुन्हा प्रत्येकाच्या हुबेहूब नकलाही.
एका सुट्टीत आम्ही वाफेगावला आलो होतो आणि मला, शामूला आणि नाश्कूला तिथल्या मुलांसारखी फडक्यात भाकरी-भाजी बांधून शेतात न्यायची होती. तू खूप हसली होतीस पण आम्हाला तिघांना वांग्याचं भरीत आणि भाकरी फडक्यात बांधून दिली होतीस. आणि आपल्या घरच्या मांजरांची गंमत? मांजराच्या डोक्यावर तुपाचा थेंब टाकायचा. त्याला तुपाचा वास कुठून येतो ते कळतच नसे. मग ते आपल्याच डोक्यावर आहे हे कळल्यावर ते आपला पंजा डोक्यावरुन फिरवून पंजा चाटत बसे. आणि आपण सगळे त्याच्या पंजा चाटण्याची नक्कल करत हसत बसायचो.
आम्ही मोठे होत गेलो तसं आमचं वाफेगावला येणंही कमी होत गेलं. कॉलेजात असताना मी एकदा वाफेगावला आले होते. तेव्हा वाफेगावच्या बायकांबद्दल तू मला केवढं काय काय सांगितलं होतंस. समोरची रखमा, शकी-उशी, भामा, गोदाबाई, द्वारका, प्रत्येकीची वेगळी कथा. मी ते ऐकून हडबडून गेले होते. या सोसणार्‍या बायकांच्या कहाण्या तुझ्यापर्यंत पोचत होत्या कारण त्या बायकांना तुझ्याबद्दल विश्वास होता. तू त्यांच्या व्यथा ऐकून घ्यायचीस, जमेल तसा त्यांना मदतीचा हात द्यायचीस. रखमाला कित्येकदा घरी जेवायला द्यायचे नाहीत. ती आपल्या ओसरीवर झोपायला यायची. तू, आईनं कधी तिला उपाशीपोटी झोपू दिलं नाही.  विमलबाई तिच्या छोट्या मुलाला अफूची गोळी देऊन कामाला जायची, तिला तू परोपरीचं सांगून, मुलासाठी दुधाची सोय करून ते बंद करायला लावलं होतंस. हं, पण याचबरोबर तिथल्या तरूण मुलामुलींच्या मुक्त जगण्याच्या गोष्टीही तू सांगितल्या होत्यास....भन्नाट होत्या त्या :)
        धार्मिक रीतीरिवाज, मासिक पाळी अशा बाबतीत तर तुझे विचार बंडखोरच होते. तरूण मुलींनी उपासतापास अजिबात करु नयेत चांगलं खाऊनपिऊन असावं असं तू कितीजणींना सांगायचीस.  आजोबांच्या वर्षश्राद्धालाही कसले विधी वगैरे न करता एका विद्यार्थ्याला तू मदत करायचीस.
  आता तू नाहीस आणि वाफेगावचाही संबंध संपल्यातच जमा. तीन वर्षांपूर्वी तिथे गेले होते तेव्हा आपल्या घराच्या दगडमातीच्या ढिगार्‍यातून फिरून आले. मागच्या दारातला शेवगा आणि सायली सोडता काहीच शिल्लक नाही तिथे.
एकदा तू विचारलं होतंस नवरा कसा हवाय तुला? तेव्हा लग्नाबिग्नाचं काही डोक्यात नव्हतं माझ्या. मी काहीतरी उत्तर दिलं असेल. तू म्हणालीस, ’शिक्षण वगैरे काय गं, ते असणारच. आपल्याकडे लग्नाची मुलं बर्‍यापैकी सुस्थिरही असतात. पण हे थोडं कमीजास्त असलं तरी चालेल. तो माणूस म्हणून कसा आहे त्याची पारख व्हायला हवी, तो निर्व्यसनी आणि निरोगी असायला असावा हे मला फार महत्वाचं वाटतं.’
आमच्या लग्नाला नाही येऊ शकलीस तू. लग्नाआधी दहा दिवस वाफेगावला पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि मग हिंडणंफिरणंच थांबलं तुझं. हट्टी होतीस हं तू. आधीच आली असतीस पळसदेवला तर हे टळलंही असतं कदाचित. पण ऐकलं नाहीस. शेवटची तब्बल नऊ वर्षे तुला तशी काढावी लागली. पुस्तकं तर शेवटपर्यंत होतीच तुझ्याबरोबर. नंतर या लिखाणानंही तुला खूप सोबत केली असणार. तुझ्यासारख्या बाईसाठी ते परावलंबी आयुष्य जगणं किती जड असणार त्याची कल्पना आहे मला. तुझ्या लिखाणातूनही ते डोकावतंय अधूनमधून. त्याबरोबरच आतापर्य़ंत ऐकलेल्या अनेक कौटुंबिक गोष्टींमागची तुझी भूमिका, तुझी बाजूही कळते आहे. या सगळ्यातून माझ्या मनातली तुझी प्रतिमा अधिकच उजळत जाते आहे.
        या लिखाणाच्या माध्यमातून तू अजूनही माझ्याजवळ आहेस हे खूप छान आहे..

-अश्विनी

Sunday, June 15, 2014

नसरीन

मी पहिल्यांदा वसतिगृहात राहायला गेले आणि दुसर्‍याच दिवशी नसरीन गावाहून आली. कोकणात तिचं गाव होतं. तिला वसतिगृहात येऊन महिना होऊन गेला होता.

तिच्या वडिलांचा आणि भावांचा गावी काहीतरी व्यवसाय होता. पुण्यातल्या कुलकर्णी ब्रदर्स नावाच्या अप्पा बळवंत चौकातल्या दुकानाशी त्यांचे व्यवहार चालायचे. गावाहून तिने निरोप आणलेला होता तो द्यायला तिला अप्पा बळवंत चौकात जायचं होतं.

तिचं माझं जुजबी ओळखीचं बोलणं झालं. तिने विचारले, " येतेस का माझ्याबरोबर?" मलाही पुस्तकांची दुकाने असलेला हा चौक एकदा पाहायचाच होता. दोघी शोधत शोधत गेलो. तिच्याबरोबर मी पहिल्यांदा तिथे गेले आणि मग जातच राहिले. कितीतरी पुस्तकं मी रसिक साहित्य च्या लायब्ररीतून आणून वाचली. तो रस्ता माझा रोजचा पायाखालचा रस्ता झाला.



या आमच्या हॉस्टेलमधे बरेच कडक नियम होते, रात्री आठनंतर बाहेर थांबता यायचं नाही.

मग रात्रीचं जेवता जेवता आणि नंतरही आतच गप्पा चालायच्या.

नसरीन सरकारी नोकरीत होती आणि नोकरी अंतर्गतच कुठलासा नऊ-दहा महिन्यांचा कोर्स करायला पुण्यात आली होती.

उंची बेताची, सडपातळ, निमगोरी, कमरेपर्यंत एक वेणी आणि कायम दोन्ही खांद्यांवरून घेतलेली , व्यवस्थित पिना लावलेली ओढणी, अशी ती असायची.

आमच्याकडे बहुभाषिक मुली असल्याने मुख्यत: बोलणे हिंदीतून चालायचे. पण नसरीन अगदी शुद्ध मराठी बोलू शकायची.

माझ्या वर्गात पाचवी ते सातवी एक मुसलमान मुलगी होती, तिचं आडनाव शेख, आम्ही तिला आडनावानेच हाक मारायचो.

त्यानंतर कुणीही मुस्लिम मैत्रिण मला नव्हती, एक नसरीन वगळता.

औरंगाबादमधे, मुसलमान भाजीवाल्या, दुकानदार, कंडक्टर असा मुसलमानांशी काहीतरी संबंध यायचा.

इथे अजिबातच येत नाही.

दोन जगं वेगळी झालेली.

नसरीनच्या मोठ्या भावांची, मला वाटते एका मोठ्या बहीणीचंही लग्न झालेलं होतं. तिला चार-पाच छोटी भाचरं होती आणि त्यांची तिला आठवण यायची. दोन अडीच महिन्यांनी ती जायची तेव्हा इथून त्यांच्यासाठी काय काय छोटी खेळणी घेऊन जायची. तिला त्या लहानग्यांमधे राहण्याची, त्यांचं करण्याची सवय होती.

हळू हळू मला तिनं पंखांखाली घेतलं.

मी उशीरापर्यंत जागायचे आणि उशीरा उठायचे.

ती नऊला जाताना मला उठवून जायची. लोळत लोळत मी तिचं आवरणं, ओढणीला व्यवस्थित पिन लावणं, बघायचे. नऊ नंतर आमच्याकडे गरम पाणी आंघोळीला मिळायचं नाही. कधी कधी ती माझ्यासाठी पाणी आणून ठेवी आणि ते गार होण्याआत आंघोळ उरकायला सांगून जाई. यात माझ्या आंघोळीच्या काळजीपेक्षाही मिळू शकणारं बादलीभर गरम पाणी का सोडायचं? हा तिचा हिशोब असे. :) कारण आमच्या या हॉस्टेलवाल्या दोन्ही काकवा अतिशय खडूस होत्या आणि अत्यंत हिशेबी!

कधीतरी कॉलेजमधून आल्यावर पाहिलं तर माझं टेबल आवरून ठेवलेलं असे. मी म्हणे, " असू दे गं, मला पसारा चालतो."

एके दिवशी खोलीतल्या लहानशा मोरीच्या टाईल्स चकाचक घासून ठेवलेल्या.

मला म्हणाली, "ओळख. काय वेगळं दिसतंय?"

मला इतका वेळ लागला! :)

तर असले काय काय उद्योग करायला तिला आवडायचं.

कितीदातरी तिचा हात पाहून मी भविष्य सांगितलं असेल. अशी एक दोन पुस्तकं वाचून मी त्यातलं काय काय सांगू शकायचे. :)

" तुला ना नसरीन जुळी मुलं होणारेत! इथल्या रेषा बघ." मी असं सांगितल्यावर तिचे चकाकलेले डोळे मी पाहिले आहेत.

म्हणायची, ’तुला बारशाला नक्की बोलवीन."

आमच्या जुन्या हॉस्टेलमधे महिनाभरासाठीच एक मुलगी आलेली, अनिता! (तिच्यावरही कधीतरी लिहिन.)

तर ही अनिता दुपारी मी कॉलेजला गेलेले असताना , माझ्या कॉटवर बसून केस विंचरायची, कारण माझा पलंग खिडकीजवळ.

चार दिवसांनी माझं डोकं खाजायला लागलं. काही सुचेना.

आई माझ्या केसांची खूप काळजी घ्यायची. शाळेत असतानाही आईने कधी माझ्या डोक्यात उवा होऊ दिल्या नाहीत. रोज फणीने विचंरायची. एखादी बया आली असेल उडून तर लगेच काढली जायची.

इथे काय झालं? मला कळेना.

मग नसरीनने फणीने माझे केस विचंरले, उवा काढल्या. ते लायसील घ्यायला माझ्याबरोबर आली.

अगदी मोठ्या बहीणीसारखं, वर मला म्हणाली की भाच्यांच्या केसांचं मीच बघते.

या घ्यायला येण्यावरून आठवलं.

हॉस्टेलला आल्यावर मी सॅनिटरी नॅपकिन्स वापरायला सुरूवात केली, इथे ती कापडं धुणार कुठे? आणि वाळत कुठे घालणार? म्हणून.

ते मी औरंगाबादहून घेऊन यायची. आई मला आणून द्यायची. औषधांच्या दुकानात जाऊन दुकानदाराला ते मागायला मला खूपच लाज वाटायची.

एकदा इथे आणायची वेळ आली तेव्हा नसरीन माझ्याबरोबर आली आणि तिने घेऊन दिले.

वर मला ऎकवलं, "त्यात काय लाजायचंय?"

हळू हळू माझी भीड चेपली.

या जुन्या हॉस्टेलचं बांधकाम निघालं तेव्हा सुदैवानं आम्हा तिघीचौघींना जवळच एक चांगलं हॉस्टेल मिळालं.

इथे आमच्यावर बंधनं नव्हती. नाटक / सिनेमा पाहून मी बाराला परत येऊ शकायचे. डबाही बाहेरून लावता यायचा.

मग काय आम्ही सुटलोच! पण नसरीन नाही.

इथे भिंतीवरही काही लावलं तर चालायचं.

मग माझ्या भिंतीवर मी काही पोस्टर्स, काही कविता लावल्या. जी. एं च्या पत्रातलं एक वाक्य लिहिलं. NO buddy can go home once again , बाकी मुली खवळल्या. हे काय असलं लिहून ठेवलंय. आम्हांला वाचायला लागतंय वगैरे, नसरीन काही म्हणाली नाही, तिची भिंत आहे, तिला हवं ते करू देत.

मी त्याचा अर्थ काय आहे ते सांगितल्यावरही, मुलींना ते खटकायचंच.

नसरीनकडून मी नमाज पडायला शिकायचं ठरवलं आणि थोडंफार शिकलेही बहुदा.

एकही केस दिसू नये अशी काळजी घेऊन ओढणी कशी बांधायची ते आणि अजूनही थोडंफार काही तरी नियमांविषयी वगैरे असेल.

ती काही फार धार्मिक वगैरे नव्हती.

एकदा अशाच काहीतरी गप्पा चाललेल्या. मुलग्यांविषयी, लग्नाविषयी असेल.

मी नेहमी असायचे तशी जोशात कुठल्याही स्वरूपातील हुंडा घेणार्‍या मुलाशी मी लग्न करणार नाही, लग्नानंतर नाव बदलणार नाही, मला रजिस्टर मॅरेजच करायचंय. काय काय मुद्दे मांडून माझी बाजू पटवून देत असणार.

सगळ्यांसमोर नसरीन काही बोलली नाही.

नंतर मला एकटीला विचारलं, " तू बोलते आहेस हे खरंच की वाद घालण्यापुरतंच? "

मी म्हणाले, "खरंच."

" नाहीच मिळाला मनाजोगता मुलगा तर?"

" तर काय? नाही करणार लग्न."

" हे जमवता येईल?"

" हो. जमवीन. बघ तुला लग्नाला बोलवीन."

हे खरंच सोपं नव्हतं , हे आज कळतंय.

मग म्हणाली, "तुझ्या मनासारखं होऊ दे. विद्या, मलाही हुंडा घेणार्‍या, माझ्या नोकरीकडे पाहून लग्न करणार्‍या मुलाशी लग्न करायचं नाहीये. मलाही रजिस्टर लग्न करायला आवडेल, ते काही शक्य नाही. आपल्याला हवा तसा मुलगा कुठे शोधायचा? अम्मीने एक शोधलाय, हुंडा नकोय त्याला पण तो कधीतरी पितो, मला नाही चालायचं."

नसरीन कोर्स संपवून गावी गेली. त्यापूर्वी आठ दिवस तिची धाकटी बहीण आलेली, प्रचंड उत्साही आणि प्रचंड बडबडी!

तिने स्वत:चा स्वत: नवरा शोधलेला. नसरीन अजून लग्न करत नाही म्हणून थांबलेली......

.

नंतर नसरीनचं एक पत्र आलं होतं. देईन देईन म्हणता उत्तर द्यायचं राहून गेलं.

तिला लग्नाची पत्रिका पाठवली होती.

पुन्हा काहीच संपर्क नाही.

नसरीन, तुला शोधून काढायचंच म्हंटलं तर शोधू शकेनच.

पण जग तसं छोटं आहे. कधीतरी पुढ्यात उभी राहशील.

तेव्हा मला सांगशील की जुळ्या मुलांची नावं काय ठेवलीस ते!

त्यातल्या एकाचं मी ठेवणार होते! :)

 

 

Friday, May 30, 2014

छोट्या छोट्या गोष्टी - ५

आम्ही एका मिश्र गटात गप्पा मारत होतो. चर्चा चाललेली. नोकरी करणारी, वरच्या पदावर असणारी बायको पुरूषांना चालते का? असं काहीतरी चाललेलं.
 तिथे गप्पांमधे लग्न होऊन सहा-सात वर्षे झालेली एक मुलगी काय बोलली ते मला तुमच्यापर्यंत पोचवावसं वाटतं आहे.
ती म्हणाली, " मी एका पारंपारिक घरातून आले आहे. समानतेच्या, माझ्या हक्काच्या बर्‍याच गोष्टी मला नवर्‍याने शिकवल्या. मुलगी लहान दोन वर्षांची असताना, तिच्यासाठी नवरा पूर्णवेळ घरी होता. मुलीला छान सांभाळत होता, घरही सांभाळत होता. मी घरी आले की लगेच घर, मुलगी माझ्या ताब्यात, असं नव्हतं. रात्री उठायला लागलं तर, मुलीचं आजारपणही त्याने बघितलं. आता तो नोकरी करतोय आणि मी मुलगी, घर सांभाळते आहे."
 माझं सासर पुरोगामी विचारांचं आहे.
एकदा माझ्या नवर्‍याच्या मित्राच्या लग्नाच्या स्वागत-समारंभाला मी एकटीच सासरी गेलेले, मी आणि माझे सासरे समारंभाला गेलो. जेवण झाल्यावर सासरे म्हणाले, " मी निघतो, तुमच्या गप्पा चालू देत." मी नवर्‍याच्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारत बसले, पान वगैरे खायला गेलो. निघू असं म्हणून पाहिलं तर रात्रीचे दोन वाजलेले! मी घाबरले. नवर्‍याच्या मित्राला सोबत घेऊनच घरी आले. उद्या काय ते पाहू, असा विचार करून माझ्या खोलीत झोपायला गेले. तिथून मध्यरात्री नवर्‍याला फोन लावला आणि काय झालंय ते सांगितलं. "माझं चुकलं, गप्पांच्या नादात घड्याळाकडे लक्षच गेलं नाही." नवरा म्हणाला, "एव्हढं काय टेन्शन घेतेस? काही झालेलं नाही." ती म्हणाली , " मी काय सांगतेय ते त्याला कळतच नव्हतं.
 दुसर्‍या दिवशी काय कोसळणार? याची मला कल्पना आली. सासरी आलेले असताना, त्यात नवरा सोबत नसताना, खुशाल त्याच्या मित्रांबरोबर (फक्त एका मित्राची बायको होती.) रात्री दोनपर्यंत सुनेने गप्पा मारत बसावं. तेही बाहेर, आणि अपरात्री परत यावं. सगळंच गंभीर होतं. ती म्हणाली, " मी विचार केला की कोणी ओरडायच्या आत आपणच सॉरी म्हणून धार कमी करावी. चुकलेलं तर आहेच!"
 सकाळी उठल्यावर ती सासर्‍यांकडे गेली आणि त्यांना ’सॉरी’ म्हणाली. त्यांनी विचारलं, "सॉरी कशाबद्दल? माझ्या मुलाला या घरात जेवढे अधिकार आहेत, तेव्हढेच तुलाही आहेत. तो रात्री दोनपर्यंत गप्पा मारून घरी येऊ शकतो तर तू का नाही? हो, प्रश्न तुझ्या सुरक्षिततेचा आहे. तर या सगळ्या मुलांना मी लहानपणापासून ओळखतो, ते पोचवायला येणार, मग काळजी कसली?"
.........
अशीही काही घरं आहेत.....
अशीही काही माणसं असतात......
तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून.....

(क्रमश:)

Saturday, March 15, 2014

देव - ८

माणसाला अजूनही निसर्गातली सगळी कोडी सुटलेली नाहीत , हे ही "देव" टिकून राहण्याचं महत्त्वाचं कारण आहे.
तसं बहुदा कधीही होणार नाही.

देवाची व्यवस्था ही हुकूमशाही व्यवस्था आहे.
माणसाचं स्वातंत्र्य गमावणारी आहे.

जन्मत: तुम्ही देव स्वीकारलेला आहे, असंच असतं,
नाकारायचा असेल तर विचारपूर्वक तो नाकारावा लागतो.
ते ही सहज नसतं.
समाजात देव ही कल्पना ऎच्छिक न राहता सक्तीची होते.


माझा माझा देव असं म्हणून प्रत्येकाचा देव वेगळा नाही. बहुसंख्यांचा मिळून एक देव आहे.
समाजाचे नियम, रितीभाती, योग्य-अयोग्य, नीती- अनीति देव ठरवतो.
’देव’ म्हणजे ’देव ज्यांच्या ताब्यात आहे ते मूठभर लोक’ हे ठरवतात.
आणि या व्यवस्थेत सत्ता त्यांच्याकडेच राहते.
ते जनसामान्यांना देवाजवळ पोहचू देत नाहीत.
ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधली गीता प्राकृतात आणली, ही एक मोठी बंडखोरी होती.
ते ज्ञानही सामान्यांसाठी खुलं नव्हतं.

देव प्रत्येकासाठी एक चाकोरी आखून देतो,
ती तुमच्या जात, वय, लिंगानुसार असते.
देव प्रत्येकाची छोटी छोटी स्वातंत्र्येही काढून घेतो.
देव/ धर्म / धार्मिक / पारंपारिक असं ते मिळून पॅकेज आहे.
मी काही विशिष्ट दिवशी काय स्वैपाक करायचा? हे ठरलेलंच असतं.
( उदा, होळी - पुरणपोळी )
मी काही विशिष्ट दिवशी कुठले कपडे घालायचे ते आणखीच कुणीतरी ठरवतं.
(उदा. नवरात्रात ठरवले गेलेले कपड्यांचे रंग)
मी कुठले प्रवास करावेत?
( तीर्थयात्रा --- ठरलेल्या!)
समाजातील बहुसंख्यांना एक चाकोरी लागते हे मान्य करूनही,
लोकांच्या देवभोळेपणाचा फायदा उठवला जातो.
माणसा माणसात प्रतवार्‍या केल्या जातात. हे तर नक्कीच.

आस्तिक आहे, धार्मिक आहे, म्हणजे तो माणूस नैतिक आहे, असं समजणं चुकीचं आहे.
आणि नास्तिक माणूस नैतिक नाहीच, हे ही चुकीचं आहे.
धार्मिकता आणि नैतिकता या वेगवेगळ्या पायांवर उभ्या असतात, हे ठामपणे सांगण्याची गरज आहे.


********

Saturday, March 8, 2014

तुमचं स्वातंत्र्य तुम्हांला जपता येवो


स्वत:चं स्वातंत्र्य जपायचं. त्याविषयी काटेकोर, आग्रही राहायचं. सोपं नसतं.
स्वत:चं एक स्वतंत्र बेट करून नाहीच राहता येत.
तसं एक बेट असतंच म्हणा, प्रत्येकाच्या मनात.
तिथे कुठलं स्वातंत्र्य? तिथे तर आपली हुकूमशाहीच.
आपणच वसवलेलं गाव ते!
माझं गाव तर अस्ताव्यस्तच!
हवं तसं पसरलेलं.
स्वत:ला भेटायला इतरांना किती आवडतं कोण जाणे!
मला खूप आवडतं. दरवे्ळी एकटेपण म्हणाजे एकाकीपण नसतं.
स्वत:बरोबर मजा येते.

विषय चाललाय तो बाहेरच्या जगात स्वातंत्र्य जपण्याचा!
आपल्या समाजात अशी परिस्थिती आहे की लोक सहजच बाई म्हणून गृहित धरतात, मदत करायला येतात, डावलतात.
अशावेळी बरेचदा, एकतर दुर्लक्ष करणं शक्य असतं किंवा तिथल्या तिथे बोलून मोकळं होता येतं.
किंवा आवडलं नाही तरी सोडून देता येतं.
अवघड आहे ते नात्यात स्वातंत्र्य जपणं.
त्यांच्या प्रेमळपणाचं, त्यांच्या काळजीचं काय करायचं?
मी बाई असल्याने मी कुठेही असले तरी कळावं म्हणून मोबाईल हवाच, म्हणणारांचं काय करायचं?
ते आपले आप्त नव्हेतच का?
भावनांच्या बाबतीत इतकी गुंतागुंत असते.
सरळ तोडून टाकायचं म्हणजे कोरडेपणा!
आपल्याला न पटणार्‍या गोष्टी स्वीकारून नात्यातला ओलावा टिकवायचा?
शक्य होत नाही. मग आपलं असणं / आपण ’आपण’ असणं काय ते!
निजखूणच पुसायची?
मग कधी समजावून सांगायचं, कधी हट्टीपणा करायचा, कधी थोडी मुरड घालायची, असं करावं लागतं.

अगदी जवळच्या नात्यात स्वातंत्र्य कसं जपायचं?
तिथे तर हे ही कळत जातं की आपण वाटतो तितके सुसंगत नाही.
कधी कधी विसंबायचं असतं, कधी अधिकाराने आपणच निर्णय घेण्याचा हक्क घेतो, कधी सोपवावंसं होतं.
अशावेळी स्वातंत्र्याचं काय करायचं? त्यांच्याही आणि आपल्याही?
अशावेळी काटेकोर नियम नाहीच लावायचे.
तरी
स्वत्व गमवायचं नाही, स्वातंत्र्यही नाहीच.

जवळची आणि दूरचीही माणसं तर हवीतच.

तुमचं स्वातंत्र्य तुम्हांला जपता येवो, त्या मार्गावर सोबत लाभो, भावनांना वजा करण्याची वेळ न येवो.
शुभेच्छा!

आणि स्वत:च्या आतल्या जगात, तिथे स्वतंत्र असण्याची गरज आहेच हं!
गाभ्याशी स्वातंत्र्य असल्याशिवाय ते बाहेर कसं येणार?
ते लाभो.
शुभेच्छा!

.

 . Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...