सुखदुःखांचे,हळवे,कातर,हसरे,दुखरे,क्षण जपलेले. श्रावणातले जलबिंदू हे तया छेदिती प्रकाशकिरणे. प्रकाशकिरणांचे अंतर्मन नभी उमटवी इंद्रधनु. त्या रंगांचा गोफ साजिरा या गं सयांनो मिळुनि विणू.
Thursday, March 7, 2013
ओझं
पिढ्यां पिढ्या येत रहातात.पण बदल होतातच असं म्हणता येत नाही. जाणीवपूर्वक, एखाद्या विचाराने बदल घडवून आणला जातो असं नाही. इच्छा नसताना मागच्या पिढीची नकोशी वाटणारी ओझी आपण अनेक वर्षे आपल्या खांद्यावर बाळगत रहातो.मनापासून आपल्याला काय वाटते हा विचार बाजूला टाकतो आणि कोणी दुखावू नये म्हणून ते करत रहातो.आत्ता जाऊ दे . आपल्या हातात येईल तेव्हा ही चौकट मोडू. आत्ता वाद होतील,मन दुखावतील,नाती तुटतील....एक ना अनेक गोष्टींच्या भिती पोटी सहन करत रहातो.
आज मी बोलणार आहे ते आमच्या घरातली अशीच एक समाजाच्या दृष्टीने पिढ्यांपिढ्या चालत असलेली चौकट मोडताना मी टाकलेले पाऊल.माझे सासरे गेले.सासूबाई खूपच धार्मिक. जुन्या मताशी चिकटलेल्या.समाजाचे बंधन, का त्यांना स्वत:ला असं आवडायचं, कोणासं ठाऊक.मी विचार करत होते. बाबा गेले त्या क्षणापासून आईंनी त्यांची सौभाग्यलेणी ,त्याचं इथून पुढचं आयुष्य कसं जगायचं? काय करायचं हे त्यांनी स्वत: ठरवावं. कोणी एक व्यक्ती कींवा समाजाच्या दडपणाखाली त्यांनी कोणतीही कृती कींवा यापुढचे त्यांचे आयुष्य जगू नये अशी माझी इच्छा होती. बाबा स्वत: खूप आधुनिक विचाराचे होते.त्यांचा मृत्यूनंतरच्या सर्व विधींवर आक्षेप होता.कशाचे तेरावे चौदावे घालता. गरीबाला जेवायला मिळत नाही. आणि ज्यांना मिळतं त्यांनाच जेवणं घालायची असे ते स्वत: म्हणत. पण प्रत्यक्षात ते गेल्यानंतर आमच्या घरात हे सगळे विधी पार पडले. घरातल्या माणसांची मनं दुखावली जाऊ नये म्हणून पटत नसूनही मी गप्प राहीले. मी माझ्या हातात असणा-या गोष्टींबद्दल कसं लढता येइल याचा विचार करु लागले. एवढं केलं की गुरुजींना सांगितलं की असं काहीही आई करणार नाहीत की तुम्ही एक तो विधी आहे म्हणून त्या जोडवी, मंगळसूत्र,कूंकू,अन्य सौभाग्य अलंकार उतरवायचे, त्याचा तुम्ही उल्लेख टाळला तर बरं होईल. त्यामुळे तसं तुम्ही काही न बोलता जे काही विधी असतील ते करा. गुरुजींनी ऎकलं.हे पंधरा दिवस झाले आणि एक दिवशी मी आईंना घेऊन बसले. आणि त्यांच्याशी बोलले. खरं सांगते मनातून त्या कश्या प्रतिक्रीया देतील याची धाकधूक होती. तरी सुद्धा बोलायचे ठरवले होते. आजपासून तुमचं पुढचं आयुष्य आत्तापर्यंत तुम्ही जसं जगत होता तसंच जगावं अशी माझी इच्छा आहे. कोणी काय म्हणेल तर म्हणू देत काही झालं तर मी तुमच्या बरोबर आहे शेवटपर्यंत. तुम्ही कोणाचंच दडपण घेऊ नका. आईंचं सगळं आयुष्य सहकारनगरच्या त्यांच्या हक्काच्या घरात गेलं. पहीलं सांगितलं की तुम्हाला जिथे रहायला आवडेल , आनंद मिळेल तेथे तुम्ही रहा. तीन मुलं आसून एकट्या रहातात एवढ्या बंगल्यात...असे टोमणे लोकं मारणारच आहेत. महत्वाचं आहे ते तुम्हाला छान कोठे वाटेल याचे. तुम्ही शांतपणे विचार करा आणि ठरवा.लाल कूंकू लावायचं की नाही, जरीच्या रंगीत साड्या घालायच्या की नाही ,हळदीकूंकू यासारख्या सणाचे काय करायच,केसात गजरा माळायचा की नाही अश्या अनेक प्रश्नांवर फुल्या मारा. आपल्या घरापासून त्याची सुरवात करु या. बाबा गेल्यावर सगळे सणवार जसे पूर्वी होत होते त्या पद्धतीने आम्ही केले. कोणी म्हणत होतं यावर्षी तुम्ही गौरी बस्वणार का? गणपती बस्वणार का?दिवाळी साजरी करणार का? या सर्व प्रश्नांवर आम्ही फुली मारली. आम्ही उलट गौरीचे दरवर्षी प्रमाणे हळदीकूंकू केलं.आईंना घेऊन मी सगळ्यांकडे हळदीकूंवाला घेऊन गेले.आवर्जून सांगितलं त्यांना हलदीकूंकू लावा. आम्हाला चालतं.आज बाबा जाऊन एक वर्ष झालं पण आई त्यांचं आयुष्य पूर्वीप्रमाणे आनंदाने जगत आहेत त्यांच्या मर्जीप्रमाणे. त्यांचं असं जगणं बघून मला खूप समाधान मिळतं. मागे जाऊन विचार करते तेव्हा वाटतं की आईंच्या भितीमुळे, त्या काय म्हणतील? समाजाच्या दडपणाखाली मी त्यांच्याशी हे बोललेच नसते तर माझ्या मनावरचं हे ओझं कायमच राहीलं असतं.......
Thursday, February 28, 2013
बलात्कार x x
आपण शील ही जगण्यापेक्षा किमती वस्तू करून करून ठेवली आहे.
जोहार काय? सती काय? काय आहे यांच्या मुळाशी?
बाईनं पवित्र राहिलं पाहिजे. बाई ही घराची, कुटूंबाची एक गौरवाची वस्तू असते,
ती घासून पूसून चकचकीत ठेवायची. मिरवायची. तिच्यावर डाग पडून चालणार नाही.
डाग पडला आणि पुन्हा धुवून टाकला... चालणारच नाही.
ते काचेचं भांडं आहे, तडा गेला की संपलंच!
जन्मभर बाईने प्रामुख्याने काय करायचं आहे? तर स्वत:ला सांभाळायचं आहे.
लहानपणापासून मुलींना काय काय शिकवलं जातं?
माझ्या आईने मी कळती झाल्यावर दोन गोष्टी सांगितलेल्या....
एकदा सांगितल्या, त्यातला गंभीरपणा मला कळला, पुन्हा तिने सगळं माझ्यावर सोडून दिलं.
पहिलं हे होतं की कुठल्याही पुरूषाशी बोलताना थेट डोळ्यात डोळे घालून बोलायचं नाही.
खालमानेने पुरूषांशी बोलायचं? का म्हणून? ते काय आकाशातून पडलेत का?
ह्या! मला नाहीच जमणार आणि नाहीच चालणार!
डोळे हे संवाद साधण्याचं महत्त्वाचं आणि प्रभावी साधन आहे.
आपण जर नीट समोरच्याच्या डोळ्यात बघून बोललो तर आपला आत्मविश्वास पोचतो त्याच्यापर्य़ंत,
आणि बाईला कळतंच ना, समोरचा पुरूष कुठल्या नजरेने पाहतो आहे ते,
अशा पुरूषांना नजरेने तिथल्या तिथे गप्प बसवता येऊ शकतं, नाहीतर सोडून द्यायचं/ द्यायला लागतं.
कोणी पुरूष नकोशा नजरेने माझ्याकडे पाहतो आहे, डॊळ्यांनी सांगून त्याला कळत नाही आहे,
तर त्याला गप्प बसवण्यासाठीचे शब्द मी शोधले पाहिजेत.
माझा प्रॉब्लेम हा आहे की मी शिव्या देऊ शकत नाही. पण कुठले तरी सभ्य अशब्द मला वापरता आले पाहिजेत.
त्या शब्दांमुळे त्यालाही आणि आजूबाजूच्या इतरांनाही माझी नाराजी/ त्रागा कळला पाहिजे.
असे शब्द माझ्या पिढीत माझ्याकडे नव्हते.
तर मला म्हणायचंय असं की पुरूषांच्या नकोशा पाहण्यासाठी मी काहीतरी उत्तर शोधीन पण म्हणून सरसकट सगळ्या पुरूषांच्या डोळ्यात "थेट आणि नीट" न पाहता बोलायचं, हे स्वीकारणार नाही.
मी ते पाळलं नाही.
दुसरं तिने सांगितलेलं की कुठल्याही वयाचा कुठलाही पुरूष आणि आपण असे दोघेच एका घरात असू, खोलीत असू, तर असं थांबायचं नाही. तिथून बाहेर पडायचं.
हे मी पाळलं खूप वर्षं! आता सोडून दिलं.
हे जे सांगणं आहे ना? त्यात अख्य़ा पुरूषजातीबद्दलची बायकांना वाटणारी भीती दडलेली आहे.
यामुळे होतं काय की आम्ही पुरूषांना समजूनच घेऊ शकत नाही.
त्यांच्याशी मैत्रीच होऊ शकत नाही आमची.
अख्खं पुरूषांचं जग अनोळखीच राहून जातं.
अनोळख असल्याने आपसूकच भीती वाटायला लागते.
बाईच्या आयुष्यात येणारा पुरूष म्हणजे नवरा.
त्याच्याशी जर मैत्री करता आली तर जरा खिडक्या उघडू शकतात
अन्यथा अंधारच!
एकाच जगात, पुरूषांचं वेगळं आणि बायकांचं वेगळं अशी दोन जगं आहेत,
एकमेकांना समातंर अशी!
नव्या पिढीत, आपल्या मुलांमधे, मुलामुलींची मैत्री दिसते आहे.
ही दोन जगं मिसळण्याच्या काही शक्यता मला दिसताहेत.
या मैत्रीमुळे पुरूषांच्या जगाचं स्त्रियांच्या जगावरील आक्रमण कमी होईल,
थांबू शकेल.
Saturday, February 16, 2013
बलात्कार x
मी नववीत असेन. आमचं घर जरा गावाबाहेर होतं. आत्यांचं गावात. काहीतरी कारणाने आईला आत्यांकडे रात्री राहावं लागलं. सकाळी लवकर उठून यायला लागणार होतं. आमचे डबे, सकाळची कामं, असं काय काय होतं. तेव्हा सकाळी सहाला आईला यायला बस नव्हती. आई तीन- साडेतीन किलोमीटर अंतर चालत आली. मी विचारलं, " रिक्षाने का आली नाहीस? बस नसली तरी रिक्षा असतात ना!"
ती रिक्षाने आली नव्हती कारण इतक्या पहाटे तिला रिक्षाने यायला सुरक्षित वाटलं नव्हतं. त्यानंतर आम्ही दुपारी निवान्त बोललो तेव्हा ती जे म्हणाली ते माझ्या अजून लक्षात आहे. " माणसांची/पुरूषांची भीती वाटते. त्यांचा काय भरोसा? किडा-मुंगी-सापाची नाही एवढी भीती, फारतर काय?, जनावर चावेल आणि मृत्यू! त्याला काय घाबरायचं? "
मृत्यू चालेल पण पावित्र्यभंग नको, बलात्कार नको.
अशा भावना का रूजलेल्या असतील? जीवन त्यापेक्षा महत्वाचं नाही का?
पावित्र्य न राखता जगायची वेळ आली तर ते जिवंतपणी मरण असं का?
कुणाचे अपघात होतात, हात पाय तोडावे लागतात आणि ते जगत असतात, नव्या परीस्थितीशी जुळवून घेत.
आपली मानसीक घडण अशी झालेली असते की बलात्काराकडे नाही अपघाताइतकं सहज पाहता येत.
तरीही दुर्दैवाने कुणावर तशी वेळ आली तर ती मागे सारून पुढे जाता यायला हवं.
आपण ठरवून टाकूया, कुणावर बलात्कार झाला तर आपण तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहणार नाही .
वागण्यात बदल करणार नाही, तिची पूर्वीची प्रतिष्ठा अबाधित राहील, हे पाहू.
******
बाईच्या पावित्र्यावर, योनिशुचितेवर का समाजाची इतकी नजर असावी?
तिचं स्थान का त्यावर अवलंबून असावं?
बलात्कारांची आकडेवारी अशी आहे की भीती वाटावी.
कोणीही बाई खात्रीने माझ्यावर बलात्कार होणारच नाही, असं नाही सांगू शकणार.
समाजाने ठरवायला हवं तसं बाईनेही ठरवायला हवं.
"माझ्यावर बलात्कार झाला तर मी त्यातून बाहेर येईन.
स्वत:कडॆ अपराधी नजरेने पाहणार नाही.
पूर्वीच्याच प्रतिष्ठेने जगेन. त्यासाठी किमान आजूबाजूचा समाज बदलवेन.
त्यांना मला स्विकारायला लावीन."
तुम्ही वाचक पण यात सामिल व्हा.
आणि ठरवून टाका, की " आजूबाजूच्या, परिचयाच्या, कुठल्याही स्त्रीवर बलात्कार झाला असं समजलं तरीही आम्ही तिच्याशी अपराध्याशी वागावं तसं वागणार नाही, किंवा अतिरीक्त काळजी घेऊन गुदमरून टाकणार नाही."
तिला नाव लपवण्याची वेळ येऊ नये इतकं समाजाने समजूतदार व्हायला हवं.
******
Friday, February 1, 2013
बलात्कार
पंचवीसेक वर्षांपूर्वीचं असेल. तालुक्याच्या गावातील एक डॉक्टर जोडपे. स्कूटरवरून जवळच्या खेड्यात जात होते. स्कूटर बंद पडली. खटपट करूनही सुरू होत नव्हती. थोड्या वेळाने एक ट्रक येत होता, तो थांबवला आणि सोडण्याची विनंती केली. दोघे ट्रकमधे बसले. पुढे गेल्यावर निर्जन ठिकाणी ट्रक थांबवून ट्रकमधल्या दोघातिघांनी त्या बाईवर बलात्कार केला. नवर्याला एकाने धरून ठेवलं.....
दोघेही किती अपमानित झाले असतील. एकमेकांकडे पाहावंसही वाटलं नसेल. नंतरचे काही दिवस किती अवघड असतील..
सगळ्यांना कळलं असेल असं नाही पण काहीजणांना निश्चितच कळलं. त्या डॉक्टर नवर्याने काय काय विचार केला, आणि बलात्कार झालेल्या आपल्या बायकोला घटस्फोट द्यायचं ठरवलं. ती साधी नव्हती. तिने घटस्फोट द्यायला नकार दिला. ती नवर्याला म्हणाली, " मी काय स्वत:च्या मर्जीने गेले का? तुम्ही समोर होता ना? आता घटस्फोट द्यायला निघाला आहात तेव्हा का नाही बायकोला वाचवलंत?"
हटून राहीली .... नाही दिला घटस्फॊट तिने .... तिच्याकडे मुद्दे होते....
दोन माणसांतलं नातं काय असं मुद्द्यांवर असतं का? ते ही लग्नाचं नातं?
बलात्कार झाला, नवरा असहाय.. काही करू शकला नाही. हे तिने पचवलं असेलही पण नंतर घटस्फॊट देऊ इच्छिणार्या नवर्याला त्या बाईनं कसं समजून घ्यायचं?
पवित्र अपवित्रतेच्या समाजातील कल्पनांचा खोलवर पगडा, स्वत:च्या असहायतेनंतर, अपमाना्नंतर, स्वत:ची तथाकथित प्रतिष्ठा सांभाळण्याचा केविलवाणा प्रयत्न असंच काही असणार घटस्फोट घेण्याच्या इच्छेमागे.
शिवाय पुरूषत्वाच्या / पौरूषाच्या चुकीच्या कल्पना.
******
या गोष्टीत ती ठामपणे उभी राहिली म्हणून नंतर संसार झालाही असेल नीट, चारचौघांसारखा...
पण अशा तूटून गेलेल्या नवर्याबरोबर संसार करत राहणे हीसुद्धा शिक्षाच नाही का?
तिने काय विचार केला असेल? सोडण्यापेक्षा राहणं सुसह्य होईल?
******
बलात्कारीत स्त्री समोर काय पर्याय असतात, पुढील आयुष्य जगण्याचे?
समाज काय ठेवतो पुढ्यात?
आयुष्याची सरळ रेष का विस्कळीत होऊन जावी?
आधीच ती मना शरीराने खोलवर दुखावलेली असताना, तिच्या जवळच्यांना तिच्या विरोधात उभे करणारे कसले हे समाजाचे नियम?
कसल्या या पावित्र्याच्या कल्पना?
आपण कधीतरी या तपासणार आहोत का?
Tuesday, January 15, 2013
भय इथले संपत नाही.....
ओळखीच्या वार्या तुझे घर कुठे सांग... या कार्यक्रमाला गेलो होतो. तेंव्हाची गोष्ट.
मध्यंतरानंतरचा कार्यक्रम सुरू झाला. साडेअकरा वाजले होते. हृदयनाथ सांगत होते........पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी.............मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई,............घर थकलेले संन्यासी.......... मी आणि अश्विनी दोघीच असतो तर हे अर्धवट टाकून निघावे लागले असते. उशीरात उशीरा बारापर्यंत घरी. पण नीरज-स्मिताच्या गाडीतून आलो होतो म्हणून थांबता येत होते. माझी दुचाकी त्यांच्या घरी ठेवली होती. कार्यक्रम संपायला एक वाजेल. त्यापुढे स्मिताकडून माझी दुचाकी घेऊन मी घरी कशी जाणार? म्हणजे आज गाडी त्यांच्याकडेच ठेवावी लागेल. उद्या सकाळी रिक्षा करून जा, गाडी घेऊन या, काय कटकट ना! माझ्याऎवजी मिलिन्द असता तर हे प्रश्न आलेच नसते.
हे विचार बाजूला ठेऊन मी ग्रेस काय सांगताहेत ते ऎकू लागले. ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता.... मेघांत मिसळली किरणे सूर्य सोडवीत होता. एकदा हृदयनाथांनी ’ते मेघांत अडकली किरणे” असं म्हंटलं होतं... ” पंडितजी, अडकलेलं सोडविता येण्याची शक्यता असते. ही मिसळलेली आहेत... दारूत काही मिसळलं.....शराबकी नशा अगर दो दिनमें उतर गयी,, तो वो झुटीं हैI नशा तो उतरनीही नही चाहिये.” .......
एकनंतर कार्यक्रम संपला. आम्ही परत यायला निघालो..... मेघांत मिसळली किरणे सूर्य सोडवीत होता....... कर्वे रोडवर आलो. अगदी तुरळक पण वाहने होती. मनात म्हणाले, दीडलाही सुनसान नसतो रस्ता. कदाचित मी घरी माझी गाडी घेऊन जाऊ शकेन. पण बोलले नाही, नकोच. पौड फाट्याला नीरजने गाडी पौड रस्त्याकडे वळवली. मी ठरल्याप्रमाणे त्यांच्याघरून माझी दुचाकी घेऊन घरी जाईन अशी त्याची कल्पना झाली होती का? का बरं? इथे इंद्रधनु वर काय काय लेख लिहित असते म्हणून? नीरजला सांगावे का, मला घरी सोड असं. काही बोलले नाही.
त्यांच्या घरापाशी नीरजने गाडी थांबवली, तो म्हणाला,’ ही एकटी जाईल ना घरी?” स्मिता म्हणाली,” जाशील ना, गं ” मला त्यांच्या सहज साध्या विचारण्याचे कौतुक वाटले. आश्चर्य पण. .... ”सुबोध दुर्बोध ऎसी कोई चीज नही होती जनाब, आपण ती तशी बनवतो.” मी ’हो’ म्हणाले. मी नाही का म्हणाले नाही?..... मी घाबरते एकटी रात्रीबेरात्री पुण्यातल्या रस्त्यांवरून फिरायला.....भय इथले संपत नाही... हे मी नाकारत नाही, हे सहीनीशी लिहून देण्याची माझी तयारी आहे. पण त्या दोघांनी सहजपणे माझ्यावर जो विश्वास दाखवला होता, त्याचं काय करू? कुंडलिका अवरोहण मी करू शकेन असं जगदीशला का वाटलं असेल? कसा त्याने माझ्या क्षमतांवर विश्वास ठेवला? .... ये तो मुझे बढानेवाली चीज है ना? माझा विकास करणारी गोष्ट आहे, ती मला स्वीकारली पाहिजे.
मेघांत अडकली किरणे असंच असेल माझ्याबाबतीत, सोडवता येतीलही...
पेट्रोल संपणे शक्य नाही.. परवाच टाकलेय. गाडी कदाचित किक मारून सुरू करायला लागेल.. ठीक आहे. चाक पंक्चर होऊ शकतं... हो. ते कसं टाळता येईल?... पण त्याचा विचारच करायला नको.
माझ्या मनात रात्री ११/ ११-३० पर्यंत चालेल असं पक्कं आहे, फारतर बारा, तेही एकदाच मावशींकडे नागपंचमीचे खेळ पाहायला गेलो होतो तेंव्हा. ते गणपतीचे दिवस होते, रस्त्यावर वर्दळ होती. रंगत चाललेला कार्यक्रम सोडून आम्ही पावणे बाराला निघालो होतो, तेंव्हाही अश्विनीच सोबत होती. आता दीड!!!!!! म्हणजे त्या वेळेचीच भीती वाटत होती. बारा आणि दीडमधे काय फरक पडतो?
अश्विनी मागे बसली, त्यांच्या गल्लीपाशी म्हणाली,’इथेच सोड’ आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिले आणि कळलेच सगळे. ” पोचलीस की मिस कॉल दे”
मी गुजरात कॉलनीत शिरले, त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून मी कितीदा येते / जाते. आत्ता कुठल्या वळणावर काय दिसेल? भीती वाटायला लागली, तिला मी पोटातून वरतीच येऊ देत नव्हते. मी सुसाट गाडी चालवत होते, एकदम ब्रेक लावायची वेळ आली तर?... हा मधला काळ मला शक्य तितक्या लवकर संपवायचा होता. सुनसान रस्ते, रस्त्यावरचे पिवळे दिवे, घरांघरांत अंधार..... अंधार चुकावा म्हणुनि.... ही दुनिया वेगळी आहे, अपरिचित आहे. .... दगडाच्या बैलाला अंधाराची शिंगे..... बधाईच्या इथलं वळण आलं... चला इथून पुढे रस्ता तरी रुंद आहे..... ऎरवी नुसती इथे तिथे फिरणारी अपरीचित माणसे किती बळ देत असतात. ..... गेटसमोर गाडी थांबवली, वॉचमनने घाईने दार उघडलं, गाडीवरच्या स्टीकरकडे नजर टाकली. मी आत गेले. गाडी लावली. दारासमोर उभी राहून बेल वाजवली .... इतकं बरं वाटलं. मिलिन्दने दार उघडलं. आत आले, घरी पोचणं किती सोपी गोष्ट होती, मी किती घाबरले!
नंतर अश्विनीशी बोलले तर म्हणाली,” तुला म्हणाले खरं, इथेच सोड असं, पण घरी पोहचेपर्यंत मीही घाबरले होते. प्रत्येक बिल्डिंगच्या मागे कुणी मुलं तर उभी नसतील ना? ती एकदम समोर तर येणार नाहीत ना? असंच मनात येत होतं. ..... भय इथले संपत नाही...
कशाचं आहे हे भय? कुणी इतकं रूजवून, मुरवून ठेवलंय आमच्यात? खोल शोधलं तर हे अपरिचित पुरूषांचं भय आहे, आणखी चिरफाड केली तर ही विनयभंग , बलात्काराची भीती आहे. आपण पेपरमधे कसल्या कसल्या बातम्या वाचतो ना? काही झालं तरी रात्री दीडला एकटं फिरणार्या बाईचाच दोष असणार. ती high risk rare possibility होती. म्हणजे खोल दरी आहे, वरून नेहमी मारतो तशीच दोन-अडीच फुटांची उडी मारायची आहे, सहज जमणार आहे, जर का तोल गेला तर मरणच.
मरण का पण? मी आणि मिलिन्द एकदा बोलत होतो. बलात्कार झाला तर त्या बाईची काहीच चूक नसते. एक अपघात झाला समजायचं आणि सोडून द्यायचं. विचारांनी सरळ आहे, प्रत्यक्षात मात्र तुम्हांला चिरडून टाकणारं आहे.....भय इथले संपत नाही... बायकांना असंच वाढवलं जातं ना, आयुष्यात तुम्हांला काय शिकायचंय, कोण व्हायचंय यापेक्षा महत्त्वाचं तुमचं पावित्र्य जपायचंय. हे माझ्या जीवावर मी सांभाळूच शकत नाही, ते मला माझ्या नवर्याच्या, ज्यांच्यावर विसंबू शकेन अशा इतर पुरूषांच्या मदतीने, उरलेल्या असंख्य पुरूषांच्या भरवशावर सांभाळायचे आहे. रात्री दीड वाजता नेहमीच्या रस्त्यावर पाच मिनिटे गाडी चालवणे यांसाठी कुणा पुरूषाची मदत लागत असेल तर मला समानता हवी म्हणण्याचा काही अधिकारच नाही. माझं स्थान दुय्यम आहे आणि मी ते स्वीकारायला हवं. ते मला स्वीकारायचं नसेल तर परीणामांना तोंड देण्याची माझी तयारी असायला हवी.
कसल्या समाजात जगतो आपण?? जिथे बायकांसाठी रात्रीची संचारबंदीच आहे, सतत सतत ५०% माणसं भीती मनात बाळगून जगताहेत?
रूकैय्या हुसेनचं ’सुलतानाज ड्रीम्स’ अशी दीर्घकथा आम्हांला अभ्यासाला होती. त्यातला एक सवाल बिनतोड होता. जर जंगली श्वापदांपासून आपल्याला भीती असेल तर त्यांना पिंजर्यात ठेवायचे की आपणच पिंजर्यात राहायचे? विसाव्या शतकाच्या सुरूवातीला तिने ही कथा लिहिली आहे.
...... भय इथले संपत नाही...... हे वास्तव तर आहेच. पण वेळच आली तर त्याला वळसा घालून जाता येईल हे शिकले.
Subscribe to:
Posts (Atom)
.
. Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...
-
. Epstein files मधून जे जे काही बाहेर येतं आहे ते भयंकर आहे. Jeffrey Epstein हा माणूस आहे का सैतान? त्याने इतक्या बालिकांचं लैंगिक शोषण केल...
-
सुनीता माझ्याकडे केरफरशीला येते.आज इतकी वर्ष आमच्याकडे कामाला येते ,घरातली एक असल्यासारखी.तिचं काम अतिशय चकचकीत, स्वच्छ. फरशी पुसताना फरशीव...
-
अश्विनी, >> उत्सव साजरा करण्याची एक पद्धत यापलीकडे त्याला काही महत्व द्यावं असं मला वाटत नाही. अगदी मान्य! आपण फक्त महत्त्वाच्याच...