Wednesday, April 16, 2025

सुनीता

 सुनीता माझ्याकडे केरफरशीला येते.आज इतकी वर्ष आमच्याकडे कामाला येते ,घरातली एक असल्यासारखी.तिचं काम अतिशय चकचकीत, स्वच्छ. फरशी पुसताना फरशीवरून प्रेमाने हात फीरवणारी.जशी कामाला लागली तशी अशीच .कधीही कामचुकारपणा नाही, उरका मारणं नाही. मनापासून काम करणारी.अतिशय प्रामाणिक.मला जरा बरं वाटत नसेल तर नुसत्या माझ्या चेहऱ्याकडे बघून हिला कळतं.वहिनी तुम्ही पडा मी काय करून देऊ?संध्याकाळच्या पोळ्या भाकरी देऊ का करून?तुमचे पाय चेपून देऊ का?बाहेरून काही आणून हवं असेल तर मला फोन करा मी कामाला येताना आणून देईन तुम्हाला. एक न हजार कामांची मदत करायला तयार.

सध्या तिला मेनोपॉजचा फारच त्रास होतोय.चिडचिड, थकवा,कामातला उत्साह कमी झालाय.आमच्या गप्पा सध्या याच.भरपूर प्रश्न विचारत असते.वहिनी दोन वर्षांपूर्वी मी इतकी काम करायची,कामांचा सपाटा नुसता,कधी बसलेली मला मी आठवत नाही. आणि आता काहीही करावंसं वाटत नाही. जाऊ दे मरु देत सगळं असं वाटतं, वहिनी तुम्हाला पण असं सेम होतं का?मी हसून ,अगं हो गं मला ,तुला,सगळ्या बायकांना या वयात असंच होतं. पाळी जाणं सोपं नाही. जशी येताना शरीरात बदल होतात तसं पाळी जातानाही शरीरात होणाऱ्या बदलामुळे असे वेगवेगळे त्रास होतात.काही वर्ष होईल असं पण पुन्हा उत्साह येईल बघ.मी माझ्या मना बरोबर तिचीही समजूत काढत होते.

आता सुनीता मला आणि मी सुनीताला समजून घेण्याचा काळ सुरू झाला आहे.तिने मला म्हणावं आणि मी तिला म्हणावं,"बाई गं राहू दे ते काम"आधी स्वतःकडे लक्ष दे.कधी माठातलं घोटभर थंडगार पाणी ,फ्रीजमध्ये तयार करून ठेवलेलं गार ताक,कापलेल्या कलिंगडाच्या चार गार फोडी.... आता माझ्याकडे कामाला आल्यावर पंख्याखाली बसून सुनीताच्या आणि माझ्या घटकाभर मारलेल्या गप्पा हा नित्यनियमाचा कार्यक्रम झाला आहे.दोन्ही मुलींची लग्न झालीत ,त्यांच्या खुशालीच्या गप्पा,गावाकडे एकत्र कुटुंब,शेती,उन्हाळा पावसाळा,पिकं, नवऱ्याच्या तक्रारी,.....एक ना दोन .काय सांगू आणि किती सांगू असं होतं तिला अगदी.आली की सगळं मनातलं बोलून टाकते.वर म्हणते आपलं काम करून गेलं न वहिनी की फ्रेश वाटतं, पुढची कामं करायला उत्साह येतो.

सुनीतासारख्या असंख्य बायकांचं मला कायम कौतुक वाटतं.कोणत्याही परिस्थितीत न डगमगता, कष्ट करून,स्वतःच्या जीवावर, घरातल्या अनेक जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडतात.ती म्हणते खरं आमचं काम करून तिला उत्साह येतो पण मी उलट म्हणते सुनीताकडे बघितलं तर मला कायम हुरूप वाटत आला आहे.

Saturday, March 8, 2025

वाचण्याचा सोहळा

 


हे चित्र मला फार आवडलं आहे.

ही तरुणी पाय पोटाशी घेऊन पुस्तक वाचत बसली आहे.

छान सजून, तयार होऊन बसली आहे.

आपण पुस्तक वाचायला असं सज - धजके बसतो का? नाही.

 जर कुणी पुस्तक वाचण्याचा सोहळा करण्या आधी आवरत असेल तर भारीच!!

  आपण असं तयार कधी बरं होतो? काही सण, समारंभ, कार्यक्रम असेल तर... नवीन कपडे.. सळसळते... नाजूकसा गजरा..अंबाड्याभोवती... हातात बांगड्या, छानशी अंगठी... ओढणी सुद्धा घेतलेली आहे...

 हिच्याही घरी तसंच काही असेल कदाचित , एखादा सण...

 कदाचित तिचं लग्न झालेलं आहे... कदाचित नाही.

 ती कुठल्या जाती, धर्माची आहे? कुठल्याही... महत्त्वाचं.. ती स्त्री आहे आणि ती वाचत बसली आहे.

  नुसती वाचते आहे असं नाही.. शेजारी वाफाळता कप आहे... वाचण्याचा सोहळा सुरू आहे.

 सणादिवशी सगळे जमले आहेत, नातेवाईक.. मित्र - मैत्रिणी... काहीतरी हसणं, खेळणं.. मजा चालू असेल... बाहेरच्या खोलीत, अंगणात...

  हिला मात्र ओढ लागलेली पुस्तकातल्या गोष्टींची.. कदाचित पुढे काय होईल? ची... आपली ही नायिका आहेच नादिष्ट.. मन मानेल तसं करणारी... त्या बाहेरच्या सगळ्यांना सोडून ती आतल्या खोलीत आली आहे... स्वतः च्या, स्वतः ला हव्याशा जागेत... घरातल्या आणि मनातल्याही!! येताना मस्त गरम चहा किंवा कॉफीचा  कप घेऊन आली आहे .

   किती सुंदर चित्र आहे हे!!!


तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना असं आपल्या या नायिकेसारखं, मनाला वाटेल तेव्हा... वाचनाचा सोहळा करता यावा,  याच महिला दिनाच्या शुभेच्छा!! 🌹🌹
- विद्या कुळकर्णी 

( हे बोहो पद्धतीचं चित्र आहे, प्रीती या चित्रकर्तीचं, हे मला नेटवर भेटलं.)

सुनीता

 सुनीता माझ्याकडे केरफरशीला येते.आज इतकी वर्ष आमच्याकडे कामाला येते ,घरातली एक असल्यासारखी.तिचं काम अतिशय चकचकीत, स्वच्छ. फरशी पुसताना फरशीव...