http://asvvad.blogspot.in/2013/09/blog-post.html
>>यातील कोणती ओझी सर्वात जड, असह्य होणारी, सर्वव्यापी अशी सांगता येतील? कोणती ओझी झुगारणं तुलनेने सोपं आहे?
जी ओझी व्यक्तिवर अवलंबून असतात ती झुगारणं तुलनेनं सोपं असतं, जरी ती अवघड असली तरी.
जी ओझी इतरांनी लादलेली असतात ती झुगारणं अवघड.
~~~~~~~~
आपण बाईपण विसरलो तरी
बाकीचे विसरत नाहीत.
बाकीच्यांना वगळून
आपल्याला जगता येत नाही.
आपल्या वागण्याचे
अर्थ लावणारे ते असतात.
आपण कितीही मुक्त असलो
तरी चौकटी आखणारे ते असतात.
सगळं कसं नियमबद्ध
ते करु शकतात.
अपवाद म्हणून का असेना
आपल्याला नियमात बसवतात.
नुसते आपण बदलून उपयोग नसतो,
बाकीचे बदलावे लागतात.
~~~~~~
जी वावरतानाची छोटी छोटी ओझी आहेत ती प्रथम झुगारली पाहिजेत, ती तुलनेनं सोपी आहेत. त्याला होणारा विरोधही दुर्लक्ष करण्याजोगा असू शकतो, असेलच असं नाही. पण काच हळु हळू सैलावत नेला पाहिजे, प्रत्येकीच्या घरची परीस्थिती कशी आहे त्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे कुणाकडे कुठलेही कपडे घालण्यावर बंधन नसेल पण मंगळसूत्र घातलंच पाहिजे. कुणाकडे मंगळसूत्र घाल की न घाल पण अंगभर कपडे हवेत, असं असेल.
प्रश्न असा आहे की तिने काय घालायचं काय नाही, हे तुम्ही ( समाज, बाजारपेठ... कोणीही) ठरवू नका, तिचं तिला ठरवू देत. मग ओझं नाही. घरातले किंवा समाज ते ठरवायला लागला की ते ओझं.
मला असं वाटतं की चालण्या, बोलण्या, वागण्याचे नियम मी बर्यापैकी धुडकावलेले आहेत.
समाजाचं कसं असतं ना, की तो तुम्हांला सामावून घ्यायलाच बसलेला असतो, इकडून नाहीतर तिकडून विळखा घालायला तयार. तुमचा अपवाद करून पण तुम्हांला समाजात बसवणारच. आणि व्यक्तिलाही समाजाचे दोर कुठे कापायचे असतात?
म्हणजे माझ्या बाबतीत कसं होतं की काही थोडेसे नियम पाळले नाही तरी लग्न केलं, संसार करते आहे, मुलांसाठी नोकरी सोडून घरी बसले आहे... त्यामुळे मी तर अगदी फिट्ट बसते चौकटीत!
आणि त्याहुनही महत्त्वाचं म्हणजे तिच्या नवर्याला चालतंय ना? मग आपल्याला काय करायचंय?
नवर्याचा विरोध पत्करून मला कुठे कधी झेंडे फडकवायची वेळच आलेली नाही.
"नवर्याला चालतंय ना! त्याला सांभाळून हवं ते करू देत." लोक जेव्हा असा निष्कर्ष काढून मोकळे होतात, तेव्हा काहीही करता येत नाही.
"आदर्श बायको असण्याचं ओझं, नवराबायकोचं कित्ती छान चाललेलं आहे, हे दाखवण्याचं ओझं" हेसुद्धा मी बर्यापैकी झुगारलेलं आहे.
आपण कितीही खरं आणि स्पष्ट बोलायला गेलो ना तरी लोक हवा तसा अर्थ काढतात, मी म्हणते की ’ माझं आणि माझ्या नवर्याचं फार काही छान चाललेलं नाही, खरं आमचं अगदी उत्तम चालू शकतं पण नवरा काही प्रयत्नच करत नाही.’ लोक अर्थ काढतात वा! याचं तर मस्तच चाललंय. उगाच विनम्रता! आपल्याला काही करता येत नाही. आणि उघड्या डोळ्यांनी आजूबाजूचे कितीक संसार पाहिल्यावर, त्या नवरा बायकोंनी नात्याचं काय भयंकर करून ठेवलं आहे हे पाहिल्यावर आमच्यात मैत्री आहे ही पुष्कळच कमाई आहे , हे लक्षात येतं.
माझ्यासाठी तरी खोलवर आणि सर्वव्यापी असणारं ओझं हे बलात्काराच्या भीतीचं ओझं आहे.
ते झुगारून द्यायला जमलेलं नाही.
~~~~~~~
>>> आणखी एक ओझं म्हणजे यशस्वी नवर्याची बायको म्हणून पार्ट्यांना जायचं.
थोडं समजलं, अधिक स्पष्ट करता येईल?
काय स्पष्ट करायचं? यशस्वीच असं नाही नवर्याबरोबर केवळ त्याची बायको म्हणून पार्टीला जाणं, हेमंत जोगळेकरांच्या कवितेत आलं आहे तसं,
http://kavitanchagaon.blogspot.in/2013/10/blog-post.html
मला कधी नटून थटून जावं लागलेलं नाही, म्हणजे मिरवायची बाहुली म्हणून मी कधीच गेलेले नाही,
तरीही तिथे माझी ओळख केवळ अमक्याची बायको हीच असते, तिथे आलेल्या सगळ्या बायकांचीही अशीच असते,
नवर्याच्या मागे मागे हसत फिरायचं किंवा बायकांच्या घोळक्यात शिरायचं, अति औपचारिक बोलायचं.
नको होतं.
तिथे असणार्या इतर बायकांना ते काचत असेलच याची मला खात्री नाही.
मुळात मुलींना वाढवलं जातं तेच अशा बाहुल्या व्हायला.
मग नटून थटून मिरवणं, हा एक बहुमानच वाटायला लागतो/ वाटत असावा.
...... आपल्याला काहीच करता येत नाही.
*******
पियू,
तू लिहिलेले सगळे मुद्दे खरे आहेत.
अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी लढण्यात किती एनर्जी जाते.
काय करणार?
आपल्याला जर निमूट सहन करायला जमणार नसेल तर तक्रार करत/ विरोध नोंदवत राहिलं पाहिजे.
खूप दमायला झालं तर काही दिवस विश्रांती घ्यायची, त्यांच्या मनासारखं वागायचं.
घरी काय आणि दारी काय माणसं हीच आहेत!
तरी आपल्या पूर्वीच्या पिढीतल्या बायकांपेक्षा आपलं खूप बरं चाललंय.
*******
>>>> प्रौढ कुमारीकांना, परित्यक्तांना, विधवांना आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवत बसण्याचं एक ओझं असतं. विवहितांपेक्षा कुठल्याही पुरूषाशी वागताना त्यांना फारच काळजी घ्यावी लागते.
>>अगदी खरं आहे. निमशहरी गावात, खेड्यात विवाहितेलाही हे ओझं असतं.
हो. विशेषत: एकटा पुरूष आणि एकटी बाई भेटले तर नैतिकतेचं काय होईल? म्हणून सारा समाज त्यांच्यावर डोळे ठेवून असतो. उघडपणे कुठल्याही बाईला नवर्याव्यतिरीक्त कुठल्याही (भाऊ, वडील या नात्याचे पुरूष वगळता) पुरूषाला एकट्याने, एकट्याला सहज, गप्पा मारायला वगैरे भेटणं ( आणि उलटही, म्हणजे कुठल्याही पुरूषाला , कुठल्याही बाईला भेटणं) ही जवळपास अशक्य गोष्ट आहे.
निमशहरी गावात किंवा खेड्यात तर अशक्यच आहे.
*******